Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा
राजीनामा दिला आहे. आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा
राजीनामा सादर केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून
काम पाहावं, असं राज्यपालांनी फडणवीस यांना सांगितलं. त्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार
परिषदेत फडणवीस यांनी, राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे
आपल्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ राहिलेलं नाही. इतर पक्षांचे आमदार फोडण्याची
किंवा घोडेबाजार करण्याची आपल्या पक्षाची भूमिका नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
देत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान आज सकाळी सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस यांना
उद्या सायंकाळपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. शिवसेना-काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार
स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र आता फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाला पूर्णविराम
मिळाला आहे.
फडणवीस यांचा राजीनामा हा राज्यातल्या अकरा
कोटी नागरिकांचा विजय असल्याची
भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. ते आज सायंकाळी
मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी शिवसेना-काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला राज्यात सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं,
अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे. ते आज दिल्लीत बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या घडामोडी पाहता, राज्यपालांची भूमिका संशयास्पद
ठरत असल्याची टीका तिवारी यांनी केली.
दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांनी आज सायंकाळी शपथ घेतली. राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
कोळंबकर उद्या विधानसभेच्या उर्वरित दोनशे सत्त्याऐंशी
नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ नगरपंचायत अंतर्गत रिक्त झालेल्या
उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतल्या
काँग्रेसच्या उमेदवार वत्सलाबाई देशमुख यांची उपनगराध्यक्ष पदी निवड
झाली. त्यांनी भाजपाचे उमेदवार मोतीराम राठोड यांचा पराभव केला. राज्यातल्या बदलत्या सत्ता समीकरणांनुसार औंढा नगरपंचायती मध्ये शिवसेना, आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी काँग्रेसच्या वत्सलाबाई देशमुख
यांना उपनगराध्यक्षापदासाठी पाठिंबा दिला होता. वत्सलाबाई देशमुख यांना १३ तर भाजपाचे मोतीराम राठोड यांना फक्त चार मतं मिळाली.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या
एका कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी
मारहाण केली. या कंपनीतले स्थानिक कामगार आणि व्यवस्थापनामध्ये दोन आठवड्यांपासून वाद
सुरू असल्यामुळे कामगारांनी संप पुकारला. त्यामुळे कंपनीनं दुसरीकडून बोलावलेले हे
कामगार आज सकाळी कंपनीकडे कामासाठी जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून
मारहाण केली. या प्रकरणी १२ जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
त्यापैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
७० वा संविधान दिन सर्वत्र
विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले सभागृहात संविधानातल्या
उद्देशिकेचं सामुहिक वाचन केलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं संविधान
जनजागृतीपर दुचाकी फेरी काढण्यात आली.
जालना नगरपालिका आणि
संविधान बचाव कृती समितीच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात
आलं.
परभणी महानगर पालीकेच्या
महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे यांनी महापालिकेतले पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
संविधानाची शपथ दिली. जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड, सोनपेठ
आदी ठिकाणी विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला.
****
कोलकता इथं सुरु असलेल्या
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी रिकर्व्ह आणि कंपाऊंड मिश्र प्रकारात
दोन पदक निश्चित केली आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment