Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२६ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न
करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संसदेनं संविधान स्वीकारण्याला
सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहांची आज संयुक्त सभा
घेण्यात आली. या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या
नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संविधानाने दिलेल्या
हक्कांचा वापर करण्यासह संविधानाने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं
नमूद केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची
सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल
तिकिट जारी करण्यात आलं.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र महाराष्ट्रातल्या
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभेवर बहिष्कार टाकत, संसद भवन परिसरात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष तसंच द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदारांचा
समावेश होता.
****
संविधान दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या
माध्यमातून साजरा होत आहे. लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला. गडचिरोली
इथं संविधान जनजागृती फेरी काढण्यात आली. संविधानदिनानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यान तसंच
माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले. याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविद्यालयांमधून
संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं.
****
राज्यसरकारची बहुमत चाचणी उद्या बुधवारी घेण्याचे
निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान
देणारी याचिका परवा रविवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, या याचिकेवर आज निर्णय
सुनावताना, न्यायालयानं उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहुमत
चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हंगामी अध्यक्षांद्वारेच ही चाचणी घेण्यात यावी,
त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं. ही चाचणी
गुप्त मतदान पद्धतीद्वारे न घेता, या प्रक्रियेचे थेट प्रसारण करण्यासही न्यायालयानं
सांगितलं आहे.
****
या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री
तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस तसंच शिवसेनेच्या सदस्यांनी आपण विधानसभेत बहुमत
सिद्ध करू असा विश्वास व्यक्त केला.
*****
भारतीय जनता पक्ष उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करेल,
असा विश्वास, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत
पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन तसंच आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी
उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या
प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात आली. आज सायंकाळी भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत
बैठक होणार असल्याचं, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब
थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन
खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा
केली.
****
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी
हल्ल्याला आज अकरा वर्ष होत आहेत. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे
जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या
या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, यांच्यासह अनेक
मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली.
****
औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ,
राज्य किसान आंदोलन - स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं आज संविधान
दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment