Sunday, 24 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या याचिकेवर आज सकाळी साडेअकरा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; घोडेबाजार टाळण्यासाठी २४ तासांच्या आत बहुमत चाचणी घेण्याची याचिकेत मागणी
**  अजित पवार यांना गटनेते पदावरून काढले, जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदाचे अधिकार
** राजस्थान मधल्या नागौर जिल्ह्यात मिनी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू, मराठवाड्यातल्या आठ जणांचा समावेश
आणि
** बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर
****
राज्याच्या राजकारणात काल प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापनेची चर्चा सुरू असतानाचं काल सकाळी अचानक भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना सकाळी साडेअकरा वाजता ही सुनावणी घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची आणि घोडेबाजार टाळण्यासाठी २४ तासांच्या आत तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
या पक्षांनी दाखल केलेल्या अन्य एका यचिकेत या तीन पक्षांना बहुमत सिद्ध करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. शक्ती परिक्षणाचं व्हिडिओ रेकॉर्डींग करावं, त्याची प्रत न्यायालयासमोर सादर करावी आणि शक्ती परिक्षणाच्या कारवाईचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
****
शिवसेनेनं राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात वेगळी याचिका दाखल केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परवा रात्री राज्याच्या राजकीय पटलावर अनेक वेगवान घडामोडी झाल्या. भाजपचे गटनेते फडणवीस यांनी रात्री साडेआठ वाजता राजभवनावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला, त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता पाठिंब्याचे पत्र  राज्यपाल कोश्यारी यांना सोपवले. पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती भवनाला अहवाल पाठवला. त्यानंतर पहाटे पावणे सहा वाजता राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि लगेचच आठ वाजेच्या सुमाराला राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांनी, फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
आपलं सरकार पूर्ण पाच वर्ष अत्यंत ताकदीनं आणि मजबुतीने काम करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतल्या मध्यवर्ती कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी बोलतांना व्यक्त केला.
शपथविधीनंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेला कंटाळून आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. भाजपसोबत सरकार स्थापन करण्याबाबतची भूमिका आपण पक्षाच्या बैठकीत सुरूवातीपासून मांडली होती, असंही ते म्हणाले.
****
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांची ही भूमिका पक्षविरोधी असल्याचं स्पष्ट केलं. या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राजकारणाचा लाजिरवाणा खेळ सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
त्यानंतर सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच त्यांचे व्हीप जारी करण्याचे अधिकारही रद्द झाले आहेत. विधीमंडळ गटनेता पदाचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.
****
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी प्रक्रियेत राज्यघटनेची अवहेलना झाली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. पक्षाच्या काल मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ही भूमिका मांडली. भाजप बहुमत सिद्ध करु शकणार नसून भविष्यात महाविकास आघाडीचंच सरकार येईल असा दावाही त्यांनी केला.
****
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा संबंध हा गेल्या आठवड्यात झालेल्या शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी जोडता येईल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल अकोला इथं वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली होती, यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्या बैठकीत संशयास्पद चर्चा झाली होती, हे आता स्पष्ट झाल्याचं आंबेडकर म्हणाले.
****
राज्यात अचानक आणि अनपेक्षित घडलेल्या या घटनेनंतर  राज्यभरातून सर्वच पक्षांचे नेते तसंच कार्यकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसंच औरंगाबाद इथं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र सोलापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला. वर्धा इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवार यांच्या निर्णयाचा निषेध केला. पालघरमध्ये शिवसेनेनं भाजप, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या ‘मन की बातया कार्यक्रमातून देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकोणासाठावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल. तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑम ए आय आर या मोबाईल ॲप वरुनही हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
राजस्थान मधल्या नागौर जिल्ह्यात काला भाटा जवळ काल पहाटे मिनी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज्यातल्या ११ जणांचा मृत्यू झाला, त्यात मराठवाड्यातल्या आठ जणांचा समावेश आहे. मृतामंधले सहा जण लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले, तर बीड आणि  परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उर्वरित तिघा मृतांपैकी दोघे सोलापूरचे तर एक जण सांगली जिल्ह्यातला रहिवासी आहे. हे सर्व भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना सर्व वैद्यकीय मदत देण्याची विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथं सुरु असलेल्या जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या अनुषंगानं काल बौध्द धर्म गुरू दलाई लामा यांनी शहरानजिक चौका इथल्या लोकुत्तरा महाविहारात बौध्द भिक्खुंना मार्गदर्शन केलं. यावेळी श्रीलंकेचे महानायक थेरो वारकागोडा धम्मसिध्दि उपस्थित होते.
दरम्यान, मिलिंद महाविद्यालयाजवळच्या क्रीडा संकुलात ‘बौध्द धर्माचे पुनरूज्जीवन आणि मजबुतीकरणात आमची भूमिका’ या विषयावर विविध देशातून आलेल्या बौध्द भिक्खुंनी काल उपस्थित उपासक उपासिकांना मार्गदर्शन केलं.
दरम्यान, दलाई लामा यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हिंसेबद्दल आपण व्यथित असल्याचं ते म्हणाले. केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणुस घडणार नाही, तर बुदधांच्या तात्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा, अहिंसा, मानवतावाद यावरचं भारतीय प्राचीन तत्वज्ञानातलं शिक्षण देण्याची गरज असल्याचं दलाई लामा यांनी सांगितलं.
आज सकाळी साडेनऊ वाजता मिलिंद महाविद्यालयाजवळच्या क्रीडा संकुलात दलाई लामा यांचं विशेष चर्चासत्र होणार आहे. या परिषदेचा आज विविध कार्यक्रमांनी समारोप होईल.
****
बांग्लादेशविरुद्ध कोलकाता इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्याच्या काल तिसऱ्या दिवस अखेर बांग्लादेशच्या सहा बाद १५२ धावा झाल्या. पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या इशांत शर्मानं दुसऱ्या डावातही चार बळी घेतले. उमेश यादवनं दोन गडी बाद केले. तत्पूर्वी, भारतानं आपला पहिला डाव नऊ बाद ३४७ धावांवर घोषित केला. कर्णधार विराट कोहलीनं १३६ धावा केल्या. भारताकडे अजून ८९ धावांची आघाडी असून विजयासाठी त्यांना आणखी चार गडी बाद करावयाचे आहेत. 
****
  ऊसाच्या चालू गाळप हंगामात एकरकमी रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीसह अधिक दोनशे रूपये प्रति टन पहिली उचल मिळावी, असा ठराव अठराव्या ऊस परिषदेत संमत झाला आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर इथं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली. महापुरात बुडालेल्या ऊसाची कोणतीही कपात न करता प्राधान्याने तोड देण्यात यावी, २०१८-१९ या वर्षांत एफआरपी न दिलेल्या कारखान्यांच्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांचा सातबारा विनाअट कोरा झाला पहिजे, यासह विविध ठराव या परिषदेत घेण्यात आले.
****
अवकाळी पावसानं झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय पथकानं काल बीड जिल्ह्यातल्या पाच तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. बुलडाणा तसंच जळगाव जिल्ह्यातही या पथकानं पाहणी केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. आज हे पथक जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या गावांना भेट देणार आहे.
****

No comments: