Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२४ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
देवेंद्र
फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध
दाखल याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र, राज्य सरकार तसंच फडणवीस आणि अजित
पवार यांना नोटीस बजावली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाला
आव्हान देणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या याचिकेवर सर्वोच्च
न्यायालयात उद्या सकाळी साडे दहा वाजता पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एन. व्ही.
रमण, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं त्यावेळी राज्यपालांची
या संदर्भातील पत्रं सादर करावीत, असे निर्देश महाअभिवक्ता तुषार मेहता यांना दिले
आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडे राज्य विधानसभेतील बहुमत
असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते नसल्याचं या तिन पक्षांची बाजू मांडताना विधिज्ज्ञ
कपील सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं.
****
राज्याच्या
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी एकशे पासष्ट आमदारांचं पाठबळ शिवसेना, राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांकडे असल्याची माहिती शिवेसनेचे नेते संजय राऊत यांनी दिली
आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील
सरकार स्थापन करण्यासाठी बनवाट कागदपत्रांचा आधार घ्यायला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी परवानगी दिली, असा आरोप त्यांनी केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्ष फोडता यावे
यासाठीच येत्या तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळ नेते अजित पवार यांना बदलण्यात आलं असल्याचं पत्र
पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज राजभवानामध्ये जाऊन दिलं आहे. राज्यपाल मुंबईत नसल्याचं
राजभवानातील अधिकाऱ्यांनी नमुद केलं आहे. नव्या विधीमंडळ नेत्याची निवड होईपर्यंत जयंत
पाटील यांच्याकडे सर्व घटनात्मक अधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अजित पवार यांचा व्हीप जारी करण्याचा अधिकारही
काढून घेण्याचा ठराव पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपचे देवेंद्र
फडणवीस आणि अजित पवार यांनी शनिवारी सकाळी नाट्यमय राजकीय घडामोडींदरम्यान अनुक्रमे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या एका बैठकीमध्ये हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार हे रविवारी सकाळी
आपल्या चर्चगेटजवळील खासगी निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी नंतर त्यांचे कार्यकर्ते
आणि काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
****
`मन की
बात` च्या एकोणसाठाव्या श्रुंखलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी
संवाद साधला. आजच्या राष्ट्रीय छात्र सेना दिवसाच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या
आणि काही राष्ट्रीय छात्र सैनिकांशी संवाद साधला. सात डिसेंबरला सशस्त्र सेनादलाचा
ध्वजदिन साजरा केला जातो. केवळ सन्मान नको तर या दिवशी प्रत्येक नागरिकाचा सशस्त्र
सेना दिवस साजरा करण्यात सहभाग असायला हवा असं मोदी यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्रांनी
हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष जाहीर केलं आहे, आपण सर्वांनी आजपासूनच आपल्या
बोलीभाषेचा वापर सुरु करुन आपल्या भाषेचा सन्मान करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
सर्व राज्यांमधल्या शाळांनी आपल्या शाळेत येत्या डिसेंबर महिन्यात
तंदुरुस्ती सप्ताह साजरा करावा जेणेकरुन विद्यार्थी दशेपासूनच सर्वांना शरीरस्वास्थ्याचं
महत्व कळेल, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
प्रेम, शांतता आणि सुसंवाद या त्रिसुत्रीचा प्रसार व्हावा,
अशी अपेक्षा बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केली आहे . ते आज औरंगाबाद इथं
जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करत होते. सर्व
समस्यांचं समाधान गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशात असल्याचं ते यावेळी म्हाणाले.
बौद्ध धर्मानं करुणा आणि सुसंवादाची तत्त्वं शिकवत जगभरात या तत्वांचा प्रसार केला
असं ते म्हणाले. आत्मपरिक्षण आणि अभ्यास म्हणजेच बौद्ध धर्म, वैज्ञानिक देखील आता बुद्धांच्या
तत्त्वांसंदर्भात संशोधन करत असल्याचं ते म्हणाले. भारतीय संस्कृती आणि इथल्या धार्मिक
सुसंवादाला हजारो वर्षांचा इतिहास आहे असे गौरवोद्गार दलाई लामा यांनी यावेळी काढले.
****
No comments:
Post a Comment