Thursday, 28 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
$F8B7D50A-C9BE-4C04-839F-1D0C7D00C1E
 महाविकास आघाडीने आज आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला. यिवसेनेचे एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. सामान्य नागरिकांना दहा रुपयांत जेवण, आर्थिक दुर्बल तसंच शेतकरी पाल्यांना बिनव्याजी कर्ज, पिकाला योग्य भाव, बेरोजगार भत्ता, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींसाठी मोफत शिक्षण, तालुकास्तराव एक रुपयात आरोग्य तपासणी, पीक विमा योजनेची पुनर्रचना, आदी मुद्यांचा या किमान समान कार्यक्रमात समावेश आहे. सरकारी नोकऱ्यांपैकी रिक्त पदांवर तत्काळ भरती प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकरी कर्जमाफी तसंच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीबाबतही विधानसभेत बहुमत चाचणीनंतर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय घेतला जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
****

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ, जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून, अनेक नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसंच सर्वसामान्य नागरिक शिवाजी पार्क मैदानावर जमण्यास प्रारंभ झाला आहे.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला.महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे आणि कचरा वाहतुक कामगारांचे थकीत वेतन तत्काळ मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.या महामोर्चानंतर कामगारांचे किमान वेतन पुढील ३ आठवड्यात देण्याचे लेखी पत्र महापालिका प्रशासनानं मनसेला दिलं.
****

 गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी नक्षल्यांनी आलापल्ली-भामरागड मार्गावर झा़डे आडवी टाकुन रस्ता अडवला.त्यामुळं काही काळासाठी वाहतुक ठप्प झाली होती. पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मीच्या पीएलजीए स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादांनी हि कारवाई केली असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 भारतीय जनता पक्षाचे जळगावचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचं आज सकाळी अमळनेर इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आमदार स्मिता वाघ यांचे ते पती होत. वाघ यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी अमळनेर तालुक्यात डांगर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

 स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 जालना नगरपालिकेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून फुले यांना अभिवादन केलं. धुळे शहरातही फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विविध मान्यवरांनी अभिवादन केलं.
****

 जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईसाठी प्राप्त अनुदान वाटपाचं ९१ टक्के काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात सरकानं ११० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****

 परभणी तालुक्यात झरी इथल्या प्रयोगशील शेतकरी मेघा देशमुख यांना महाऍग्रोचा सहावा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा मानाचा बॅरिस्टर जवाहर गांधी शेतकरी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या शुक्रवारी २९ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तसंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 दरम्यान, या सहाव्या कृषी प्रदर्शनाला उद्यापासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. पैठण रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्र मैदानावर आयोजित या चार दिवसीय प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिकांसह विविध विषयावर चर्चासत्र तसंच आधुनिक शेती औजारं पहायला मिळणार आहेत.
*****
***

No comments: