Friday, 22 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा
** घटक पक्षांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची आज बैठक
** सत्तास्थापनेच्या नाट्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
** औरंगाबाद इथं आजपासून तीन दिवसीय जागतिक धम्म परिषद
आणि
** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ
****
राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काल रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीत दोन दिवस विविध बैठकांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती पवार यांनी ठाकरे यांना दिली. खासदार संजय राऊत आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. 
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये गेल्या आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यातत्त्वतः मान्यता दिली आहे. या बैठकीत पूर्ण एकमत झालं असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. आज मुंबईत काँग्रेस आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असून, त्यांना आतापर्यंतच्या चर्चेची माहिती दिली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. या चर्चेनंतर शिवसेनेशी संयुक्त चर्चा केली जाईल आणि ती बोलणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार स्थापनेसंदर्भात जे निश्चित होईल, त्याचा तपशील जाहीर केला जाईल, असंही ते म्हणाले.
तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीनं काल राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास संमती दिली. नवी दिल्लीत काल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याआधी झालेल्या चर्चेची माहिती कार्यसमितीला दिल्याचं पक्षाचे नेते के के वेणुगोपाल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे.
****
राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. हे षडयंत्र जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रोज प्रादेशिक, राजकीय तसंच भावनात्मक चर्चा आणि विवाद सर्वत्र केला जात आहे, असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या धर्तीवर राज्याचं त्रिभाजन, मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्ट्रातून विदर्भ  वेगळा करण्याची चिन्ह दिसत आहेत, शिवसेनेला नामशेष करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या खेळामध्ये आपापला अथवा परस्पर हिताचा कार्यभाग साधून घेतील, हा या षडयंत्राचा भाग आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
****
भाजपनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचं स्वागतच करेल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते. किमान समान कार्यक्रम बघून सरकारमध्ये  सहभागी व्हायचं  की नाही हे जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांचा आजपासून गळित हंगाम सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गाळप सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र  रास्त हमीभाव न दिल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या तेवीस साखर कारखान्यांचे परवाने स्थगित करण्यात आले आहेत. गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी नव्व्याण्णव कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयानं आतापर्यंत परवानगी दिली आहे.
****
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची आजपासून केंद्र सरकारचं पथक पाहणी करणार आहे. औरंगाबादसह नागपूर आणि अमरावती या महसूल विभागात झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करील. केंद्रातले अतिरिक्त सचिव डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. के मनोहरन हे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या १६ गावांना भेट देणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आज सकाळी या पथकासमोर विभागातल्या नुकसानीचं सादरीकरण करणार आहेत.   
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद इथं जागतिक धम्म परिषदेचं आज संध्याकाळी सहा वाजता बौध्द धर्म गुरू दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय भिक्खु संघाच्यावतीनं शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात ही धम्म परिषद होणार आहे. श्रीलंकेचे महानायका महाथेरो यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागातून वीस जादा शहर बस सोडण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्यात सरकार स्थापन होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद शहरात कलावंत घडवणाऱ्या संत एकनाथ रंगमंदिराचं लवकरात लवकर नूतनीकरण व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिनेते शंतनू गंगणे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी युवक महोत्सवाच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. समाजातल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी देखावे सादर केले होते.
****
औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार उदगीरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटीया यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.बी वराडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात करण्यात आला. शाल, स्मृती चिन्ह आणि २५ हजार रूपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी समाजातल्या र्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लखोटीया यांनी पुरस्काराला उत्तर देतांना केलं.
****
परभणी आणि लातू महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. परभणी महापौरपदाची निवडणूक आज सकाळी ११ वाजता होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या उपस्थितीत  विशेष सभा घेतली जाईल. परभणीत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु आहे. लातूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे.
****
ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची काल बिनविरोध निवड झाली.
****
खराब हवामानामुळे यंदा ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं राज्यात साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचं काल महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी औरंगाबाद इथं सांगितलं. मात्र, साखरेचा पुरेसा साठा असल्यामुळे देशात साखरेच्या किमती वाढणार नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.
****
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी काल लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. राज्यपालांनी  जाहीर केलेला निधी  शेतकऱ्यांचा  खात्यावर जमा होईल, त्यामधून कुठल्या प्रकारच्या कर्जाची वसुली होणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
जागतिक वारसा सप्ताह आणि महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व विभाग संचलित तेर इथल्या रामलिंग आप्पा लामतुरे पुराण वस्तुसंग्रहालयाला ५१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कालपासून तगर महोत्सव सुरू झाला. यानिमित्त काल तेर इथ वारसा फेरी काढण्यात आली.  याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

तगर महोत्सवाच्या निमित्ताने तगर परिसरात आढळलेल्या हस्तिदंती बाहुली तगर लक्ष्मीच आणि ते परिसरातल्या चित्र आणि वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालं दोन दिवस चालणाऱ्या या हस्तिदंती बाहुली आणि विविध वस्तू प्रदर्शनात तेर परिसरात आधारलेली सातवाहनकालीन नाणी पाण्यावर तरंगणारी वीट विविध शिलालेख संसारोपयोगी वस्तू देवदेवतांच्या मूर्ती आदि सह तेर आणि रोमन साम्राज्याशी असणारे व्यापारी संबंध पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या विविध वस्तू चित्र असणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेचे प्रमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अंबाजोगाई इथं हवामान बदल: समस्या आणि उपाय, शेतीत करावयाच्या सुधारणा या विषयावर आज आणि उद्या राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या ब्राम्हणगाव इथं काल नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतामध्ये स्वयंचलित यंत्राद्वारे हरभरा बियांची पेरणी आणि बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी प्रल्कप विषेश तज्ञ दिपक विभूते यांनी पोकरा या योजनेबद्दल माहिती दिली. तसंच समूह सहाय्यक सय्यद जिशान अली  यांनी बीज प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
****

No comments: