Saturday, 30 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३० नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****

 महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आज दोन वाजता बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. यासाठी थोड्याच वेळात विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे सभागृहाला त्यांच्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देणार आहे. विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.  

 दरम्यान, विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. 
****

 विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी सर्वांच्या संमतीनं या पदासाठी पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर, उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता सभागृहात विधानसभाध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. एकमतानं अध्यक्षपदासाठी पटोले यांचं नावं निश्चित करण्यात आलं असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपनेही विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजप उमेदवार असणार आहेत.
****

 महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहा मत्र्यांनी शपथ घेताना त्यांच्या नेत्यांची नावं घेणं नियमबाह्य असल्यानं सदरचा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. जर राज्यपालांनी या प्रकरणी न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबरकर निवड करण्यात आलेली आहे. अशा वेळी त्यांच्या ऐवजी दिलीप वळसे पाटील यांची निवड करणे नियमबाह्य असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.
****

 दरम्यान, शपथ घेताना नेत्यांची नाव घेणं नियमबाह्य असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलीक यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करू नये, अन्यथा आम्ही जर त्यांचे आमदार फोडले तर भाजप रिकामा होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सत्तेची लालसा दाखवून भाजपनं अनेक नेत्यांना प्रवेश दिला ते सर्व आमदार आज आमच्याकडं येण्यास उत्सुक असल्याचंही मलीक यावेळी म्हणाले.
****

 झारखंड विधानसभेच्या पहिल्या फेरीतल्या निवडणुकीत सहा जिल्ह्यातल्या १३ मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान सुरू आहे. अकरा वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३५ हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं आहे.
****

 धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी भरधाव पिकअप व्हॅन नदीपुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघात सात  जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक आणि कामगारांना घेऊन जाणार ठेकेदार पसार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्‍या वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण करण्याचं आवाहन, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे.

      हिमायतनगर तालुक्‍यात जवळगाव इथं शौचालय बांधकामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं. गावस्‍तरावर बांधण्‍यात आलेल्‍या शौचालयाच्या वापराबाबत सरपंच, ग्रामसेवक, विविध समित्‍या, महिला बचतगट यांनी पुढाकार घेवून जनजागृती करावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे
****

 सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळं ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळं जिल्ह्यातील पूर बाधित १४ हजार शेतकऱ्यांच १७६ कोटी  रुपयांचे कर्ज माफीसाठी, तर बिगर कर्जदार ९२ हजार शेतकऱ्यांना १३० कोटी रुपयांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनानं एक अहवाल तयार केला आहे. सदरचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे.
*****
***

No comments: