आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधानसभेचं दोन
दिवसाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल.
आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा
अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी काल आपल्या पदाचा
पदभार स्वीकारला. अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून
देतील, त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा
अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी
३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.
दरम्यान,
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार
असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं.
****
विधानसभा अध्यक्ष पदासाठी
काँग्रेस नेते नाना पटोले अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब
थोरात यांनी दिली. आज दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी
अर्ज भरायचा आहे. तर, उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता सभागृहात विधानसभाध्यक्ष पदाची
निवडणूक होणार आहे. भाजपनेही विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला
आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजप उमेदवार असणार आहेत.
****
माजी मंत्री आणि सलग तीन वेळा आमदार झालेले तुकाराम
दिघोळे यांचं आज पहाटे नाशिक इथं दीर्घ आजारानं
निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक
शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष
म्हणून त्यांनी काम पाहिलं. आज दुपारी तीन वाजता त्यांच्यावर नाशिक इथं अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment