Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 November
2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहा मंत्र्यांना शिवतीर्थावर
शपथ
** शिवसेनेचे
एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे
बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश
** राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी
२० कोटी रुपये मंजूर; शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचं वास्तववादी चित्रण मंत्रिमंडळासमोर
दोन दिवसात सादर करण्याचे मुख्य सचिवांना आदेश
** शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी आणि स्थानिक युवकांना नोकरीत ८० टक्के आरक्षणाचा, महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात समावेश;
१० रूपयात थाळीही देणार
आणि
** गोव्यातल्या
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
****
शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी काल राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना
पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि
नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबईत शिवाजी
पार्कवर झालेल्या या समारंभाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे
देशभरातले अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या
उज्वल भविष्यासाठी पूर्ण मेहनत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्धारे
व्यक्त केला.
****
ठाकरे
यांच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. बीड शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची
आतषबाजी झाली तसंच लाडू आणि पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद शहरातही
ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून, दुचाकी फेरी काढून आणि मिठाई वाटप करुन आनंद साजरा
केला.
लातूर
शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गंजगोलाई इथं आई जगदंबेची महाआरती करण्यात आली.
त्यानंतर विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, फटाके
फोडून जल्लोष करण्यात आला.
****
शपथविधीनंतर
लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी
२० कोटी रुपये मंजुर करणाच्या निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांना
दिलासा देण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत जाहीर झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचं वास्तववादी
चित्रण मंत्रिमंडळासमोर दोन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना
दिले. या सादरीकरणानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
महाराष्ट्र
विकास आघाडीनं काल आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
आणि राज्यात राहणाऱ्या युवकांना नोकरीत ८० टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याचं या कार्यक्रमात
नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि
नवाब मलिक यांनी काल मुंबईत आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेतकऱ्यांच्या
मालाला योग्य भाव, बेरोजगार भत्ता, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींसाठी मोफत शिक्षण,
तालुकास्तरावर एक रुपयात आरोग्य तपासणी, पीक विमा योजनेची पुनर्रचना तसंच दहा रुपयात जेवण देण्याच्या मुद्यांचाही या किमान समान कार्यक्रमात समावेश
आहे. सरकारी नोकऱ्यांपैकी रिक्त पदांवर तत्काळ भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं यावेळी
सांगण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी तसंच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकच्या
मदतीबाबतही विधानसभेत बहुमत चाचणीनंतर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय घेतला जाईल, असं
यावेळी सांगण्यात आलं.
****
महाराष्ट्रात
महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची कुचेष्टा केल्याचं, काँग्रेसच्या हंगामी
अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या काल दिल्लीत काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या
बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात राज्यपालांची भूमिकाही निषेधार्ह असल्याची टीका गांधी
त्यांनी केल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
आक्षेपार्ह
वक्तव्य प्रकरणी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरूद्ध भारतीय जनता पक्षानं कारवाई
केली आहे. ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरून हटवण्यात आलं असून,
संसदेच्या या सत्रात त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात
आली आहे. ठाकूर यांचं वक्तव्य तसंच विचारधारेचं भाजप कधीही समर्थन करत नसल्याचं भाजप
कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं, ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात
राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढवाव्यात, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर
यांनी केली आहे. ते काल लोकसभेत शून्यकाळात बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या
पुरेशा शाखा नाहीत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याही अनेक शाखा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह
सर्वसामान्यांना विमा रक्कम भरण्यासह इतर बँक व्यवहार करण्यात अडचणी येतात, याकडे चिखलीकर
यांनी लक्ष वेधलं.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
गोव्यातल्या
५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. यावेळी दक्षिण भारतातील
प्रख्यात संगीतकार इलायाराजा यांच्यासह प्रेम चोप्रा, मंजु गोरा, रुपा गांगुली, रमेश
सिप्पी आदी मान्यवर उपस्थित होते. फ्रान्सच्या ब्लेस हॅरिसन यांच्या पार्टीकल या चित्रपटाला
उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर प्राप्त झाला. मारिघेला या चित्रपटासाठी स्यू
जॉर्ज यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा, जल्लीकट्टू या सिनेमासाठी लिजो पेलिसार्री यांना
उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर ज्युरींचा विशेष पुरस्कार बलून या सिनेमासाठी दिला गेला.
अभिषेक शाह यांच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हेलारू या सिनेमालाही विशेष पुरस्कारानं
गौरवण्यात आलं. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार माई घाट या चित्रपटासाठी उषा जाधव या
मराठी अभिनेत्रीला देण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात
अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईसाठी प्राप्त अनुदान वाटपाचं ९१ टक्के
काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात सरकानं
११० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये
१०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
परभणी तालुक्यात
झरी इथल्या प्रयोगशील शेतकरी मेघा देशमुख यांना महाॲग्रोचा सहावा राज्यस्तरीय कृषी
प्रदर्शनाचा मानाचा बॅरिस्टर जवाहर गांधी शेतकरी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. आज
औरंगाबाद इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे.
दरम्यान, या
सहाव्या कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. पैठण रस्त्यावर कृषी
विज्ञान केंद्र मैदानावर आयोजित या चार दिवसीय प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिकांसह विविध
विषयावर चर्चासत्र तसंच आधुनिक शेती औजारं पहायला मिळणार आहेत.
****
स्त्री शिक्षणाचे
प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं काल सर्वत्र त्यांना अभिवादन
करण्यात आलं. औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
जालना नगरपालिकेत
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातल्या
मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून फुले यांना अभिवादन केलं.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी
आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी पाच डिसेंबरला आदिलाबाद
इथून सकाळी सात वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद मार्गे दादर इथं सहा
डिसेंबरला पहाटे तीन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सहा डिसेंबरला मध्यरात्री
साडे बारा वाजेनंतर दादर इथून निघेल, आणि मनमाड, औरंगाबाद, परभणी, नांदेड मार्गे आदिलाबादला
परतणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
लातूर इथं
उद्या आणि परवा होणाऱ्या जल परिषदेचा उद्देश पाणी टंचाई दूर करण्यासाठी जनजागृती करणं,
हा असल्यांचं महापालिका आयुक्त एम डी सिंह यांनी सांगितलं. आयुक्तांनी काल लातूर इथं
या परिषदेमागची भूमिका विषद केली.
दरम्यान,लातूर
महानगरपालिकेनं शहरातल्या सर्व नळांना मीटर्स बसवण्यासंदर्भात ठराव पारित केला आहे.
नागरिकांना जलमापकांची विविध प्रकारांची, तंत्रांची माहिती व्हावी, त्याचे फायदे लक्षात
यावेत यासाठी जलपरिषदेबरोबरच जलमापकांचं प्रदर्शनही भरण्यात येणार आहे.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीनं
मराठवाडा विभागातल्या शेतकऱ्यांकरता आयोजित सेंद्रीय शेतीवरच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाचं
उद्घाटन काल प्युअर ऑरगॅनिक ग्रुपच्या अध्यक्षा तथा यशस्वी महिला शेतकरी स्वाती शिंगाडे
यांच्या हस्ते झालं. केवळ शेतमाल पिकवणं महत्वाचं नसून तो विकता आला पाहिजे तरच शेतकऱ्यांचं
उत्पन्न वाढेल, असं त्या म्हणाल्या. शेतीतल्या निविष्ठांची खरेदी, पिकांची लागवड, शेतमालाची
प्रतवारी आणि शेतमालाची विक्री आदी सर्व कामं एकटा शेतकरी करू शकत नाही, यासाठी शेतकरी
गट स्थापन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment