Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी केलेला
पत्र व्यवहार आज सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नोटीस
** आपण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचा अजित पवार यांचा दावा. तर, अजित पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचं
शरद पवार यांचं स्पष्टीकरण
** भारतातला सर्वधर्म समभाव जगासाठी आदर्श - नोबेल पुरस्कार प्राप्त बौद्ध धर्मगुरू दलाई
लामा
आणि
** डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा समारोप; २७ पारितोषिकं मिळवणारा औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट
****
राज्यात
सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करताना राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांच्याशी केलेला पत्र व्यवहार आज सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात सादर करण्याचे
आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. त्याचबरोबर न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकार,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नोटीस बजावली आहे.
राज्यात
सरकार स्थापन करण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल, रविवारी सुटीच्या दिवशी सर्वोच्च
न्यायालयात सुनावणी झाली. वादी आणि
प्रतिवादीचं म्हणनं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं हे आदेश दिलें. शिवसेना, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दाखल केलेल्या या याचिकेत फडणवीस सरकारला २४ तासाच्या आत
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यपालांनी
बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस यांना ३० नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचं भारतीय
जनता पक्षान स्वागत केलं आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ
नेते असल्याच्या भाजपच्या दाव्याला बळकटी देणारे हे आदेश असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना भाजप येत्या तीस तारखेला
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या चाचणीत अयशस्वी होईल, असं म्हटलं आहे.
****
आमदारांचं आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे
भाजप राज्यात बहुमत सिद्ध करण्यापासून दूर पळत असल्याचा आरोप करताना, विधानसभेत संख्याबळाची चाचणी तात्काळ
व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. संख्याबळाची तात्काळ चाचणी व्हावी, याकरता
सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस
पक्षांनी संयुक्तपणे दाद मागितली असल्याचं काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी म्हटलं आहे. सध्याचं सरकार अवैध असून संख्याबळाची चाचणी हा त्यावर एकमेव
उपाय असल्याचं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. भाजप आणि
अजित पवार हे संख्याबळ सिद्ध करण्याचं टाळत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष विधीमंडळ नेते अजित पवार यांना बदलण्यात आलं असल्याचं पत्र पक्षाचे नेते
जयंत पाटील यांनी काल राज्यपाल कार्यालयाला सादर केलं. नव्या विधीमंडळ नेत्याची निवड
होईपर्यंत जयंत पाटील यांच्याकडे सर्व घटनात्मक अधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अजित पवार यांचा व्हीप जारी करण्याचा
अधिकारही काढून घेण्याचा ठराव पक्षाच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान,
अजित पवार हे काल सकाळी आपल्या चर्चगेटजवळील निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी नंतर
त्यांचे कार्यकर्ते आणि काही नेत्यांच्या भेटी घेतल्या.
****
आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत आणि
याच पक्षात राहू, तसंच शरद पवार हेच आपले नेते आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
ट्विटर संदेशाद्वारे म्हटलं आहे. अजित पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह
भाजपच्या अन्य केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या अभिनंदनाला ट्विट करून आभार मानले. अजित
पवार यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय फिरवावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असल्याचं त्यांच्या ट्विट संदेशावरून
स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या ट्विटला राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं असून त्यांनी राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात
भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी
म्हटलं आहे. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून, जनतेची दिशाभूल करणारं असल्याचं
ते म्हणाले.
****
भारतीय जनता
पक्षाच्या राज्य विधीमंडळ सदस्यांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक
पार पडली. या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यासाठीची रणनिती आखण्यात आल्याचं पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. त्याचबरोबर या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.
****
सत्ता टिकवण्यासाठी
भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलतांना काल केला. आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले
आहे, त्याच हॉटेलमधल्या काही कक्ष भाजपच्या लोकांनी आरक्षित केले आहेत, यावरून घोडेबाजार सुरू झाल्याचे संकेत मिळत असल्याचं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
येत्या सात डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या सशस्त्र सेना
दलाचा ध्वजदिन साजरा करताना केवळ सन्मान न करता या दिवशी प्रत्येक नागरिकानं यात सहभागी
व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. `मन की बात`च्या एकोणसाठाव्या
भागाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी काल जनतेशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी
हे आवाहन केलं. काल राष्ट्रीय छात्र सेना दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी सर्वांना
शुभेच्छा दिल्या आणि काही राष्ट्रीय छात्र सैनिकांशी संवाद साधला. सर्व
राज्यांमधल्या शाळांनी आपल्या शाळेत येत्या डिसेंबर महिन्यात तंदुरुस्ती सप्ताह
साजरा करावा जेणेकरुन विद्यार्थी दशेपासूनच सर्वांना शरीरस्वास्थ्याचं महत्व कळेल,
असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
ज्या बौद्ध धर्माचा भारतात जन्म झाला, त्याच भारतात इतर
अनेक धर्म-संप्रदायांचा एकोपा दिसून येतो. हा भारतातला सर्वधर्म समभाव जगासाठी आदर्श
असल्याचं, नोबेल पुरस्कार प्राप्त बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
इथं जागतिक बौद्ध धम्म परिषदेत ते काल, बोलत होते. या तीन दिवसीय परिषदेचा काल समारोप
झाला. प्रेम शांतता आणि सुसंवाद या त्रिसूत्रीचा प्रसार जगभरात व्हावा. सर्व समस्यांचं
समाधान गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशात असल्याचं लामा यांनी यावेळी सांगितलं.
आत्मपरिक्षण आणि अभ्यास म्हणजेच बौद्ध धर्म, वैज्ञानिक देखील आता बुद्धांच्या तत्त्वांसंदर्भात
संशोधन करत असल्याचं ते म्हणाले. भारतीय संस्कृती आणि इथल्या धार्मिक सुसंवादाला हजारो
वर्षांचा इतिहास आहे असे गौरवोद्गार दलाई लामा यांनी यावेळी काढले.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या चार
दिवसीय युवा महोत्सवाचा काल पारितोषिक वितरणानं समारोप झाला. या महोत्सवात औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाच्या संघानं २७ पारितोषिकं मिळवत
सर्वोत्कृष्ट संघाचा किताब पटकावला. कन्नडचं शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
हे ग्रामीण भागातलं सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलं. नृत्य विभागात तुळजापूरच्या तुळजाभवानी
महाविद्यालयाच्या संघानं उत्कृष्ट संघाचं पारितोषिक मिळवलं. विजेत्या संघांना अभिनेते सुमित राघवन, रोहीत देशमुख आणि कुलगुरू
डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. या महोत्सवात औरंगाबाद,
जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला.
****
लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतले बंडखोर
नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांना भारतीय जनता पक्षानं निलंबित केलं आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी ही माहिती दिली. या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाच्या
विरोधात जाऊन काँग्रेसशी हात मिळवणी केली. त्यामुळे बहुमत असूनही महापौर पदाच्या निवडणुकीत
भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला.
****
कोलकाता इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं
बांग्लादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. या विजयाबसोबरच भारतानं दोन सामन्यांची
मालिकाही दोन - शून्यनं जिंकली आहे. काल बांग्लादेशचा संघ दुसऱ्या डावात १९५ धावांवर
सर्वबाद झाला. उमेश यादवनं पाच, तर इशांत शर्मानं चार गडी बाद केले. इशांत शर्मानं
पहिल्या डावातही पाच गडी बाद केले होते.
****
जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीपातल्या
पिकांची केंद्रीय पथकानं काल पाहणी केली. भोकरदन, बदनापूर, जाफ्राबाद, पळसखेडा या तालुक्यात
या पथकानं भेट दिली. पथकात सदस्य व्ही. के. बुक्का, डॉक्टर मनोहरन यांचा समावेश होता.
जालन्याचे जिल्हाधिकारी रवीन्द्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
नीमा अरोरा, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे या पथकासोबत उपस्थित होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं बिरसा मुंडा जयंतीनिमित्त
काल सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. या
मिरवणुकीत मोठ्या संख्येनं पारंपारिक वेशात आदिवासी महिला आणि पुरूष सहभागी झाले होते.
****
लातूर शहराला भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे.
यामुळं लातूर महापालिका शहरातील पाण्याच्या नळाला मिटर बसवणार आहे. यासाठी येत्या ३०
नोव्हेंबर आणि १ डिसेंबर दरम्यान शहरात पाणी परिषद घेण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment