Friday, 22 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२२ नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेनं पुढं आगेकूच करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातल्या तथाकथित चाणक्यांवर मात केली असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीचं सिंहासन राज्याला स्वतःसमोर झुकवू शकलं नाही, जयमहाराष्ट्र, असं पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी या संदर्भातील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना त्यांनी या संदेशाद्वारे लक्ष्य केल्याचं मानलं जात असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यासंदर्भात एकमत न झाल्यानं भाजप, शिवसेना महायुती फुटल्याच्या पार्श्वभूमीवर आता चोपन्न आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चव्वेचाळीस आमदार असलेला काँग्रेस पक्ष शिवसेनेसह आघाडी करून   सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. सरकार स्थापनेसाठी कोणताही पक्ष पुढं न आल्यानं गेल्या बारा तारखेपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
****
शिवसेनेचे नेते आणि आमदारांची आज मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं मत व्यक्त केल्याचं वृत्त आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज होत आहे. काँग्रेस आमदारांची बैठकही विधीमंडळात होणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लीकार्जुन खरगे आणि सचिव  वेणुगोपाल या बैठकीत सहभागी होणार असून यावेळी पक्षाच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे. तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
परभणी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे यांची निवड झाली आहे. काँग्रेसचेच भगवान वाघमारे उपमहापौरपदी निवडले गेले आहेत. नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानं कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथल्या बाजार समितीत काल कांद्याला सात हजार ४५१ रूपये क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊनही बाजार सावरण्याची अपेक्षा होती; मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. 
****
अवकाळी पावसानं महाराष्ट्रात झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं पथक तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग या पथकाचं नेतृत्व करणार असून विदर्भातल्या नागपूर आणि अमरावती भागात हे पथक उद्यापासून पाहणी करणार आहे. आज सायंकाळी केंद्रीय पथक अकोल्यात दाखल होणार आहे. उद्या हे पथक पिक नुकसानीची पाहणी करेल.
****
बौध्द धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबाद इथं जागतिक धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय भिक्खुसंघाच्यावतीनं शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात ही धम्म परिषद होणार आहे. श्रीलंकेचे महानायका महाथेरो यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचं काही वेळापुर्वी शहरात आगमन झालं. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यावेळी त्यांचं स्वागत केलं. या धम्म परिषदेसाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागातून वीस ज्यादा शहर बस सोडण्यात आल्या आहेत.
****
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हिंगोली वाहतूक शाखेतर्फे काल कळमनुरी शहरात बसस्थानकासमोर मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी दोनशे पाच वाहनांवर कारवाई करून, चौसष्ट हजार सातशे रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. बिना क्रमांक, बिना कागदपत्र आणि व्यवस्थित क्रमांक नसलेल्या वाहनांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
****
बांगलादेश संघानं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर हा सामना दिवस-रात्र रंगणार असून पहिल्यांदाच लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूनं खेळवण्यात येत आहे.
***

No comments: