Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
विधानसभेत महाविकास आघाडी सरकारनं १६९ विरोधी शुन्य अशा मतांनी
बहुमत ठराव जिंकला. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षानं सभागृहाचा त्याग केल्यानं ठरावाच्या
विरोधात शुन्य तर चार सदस्य तटस्थ राहीले. तत्पूर्वी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर पुन्हा अधिवेशन बोलवण्यासाठी
राज्यपालांच्या समन्सची गरज असते. मात्र, हे अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांनी समन्स
काढले नसल्यामुळे सदरचे अधिवेशन नियमबाह्य असल्याचा दावा केला. तसंच मंत्र्यांचा शपथविधी
कायद्यानुसार झाला नाही आणि अगोदर निवड केलेले हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांची
निवड का रद्द केली, असा मुद्दाही फडणवीस यांनी मांडला. यावर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे
पाटील यांनी हंगामी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो त्यामुळे हे अधिवेशन
कायदेशीर असल्याचं सांगत फडणवीस यांचे सर्व आक्षेप फेटाळले.
त्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेत विश्वासदर्शक
ठराव मांडला. त्याला शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी अनुमोदन केलं. त्यानंतर सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आवाजी मतदानानंतर सदस्यांना उभे करून त्यांच्या मतांची
मोजणी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे आणि एमआयएम या पक्षांचे ४ सदस्य
ठरावावेळी तटस्थ राहीले.
या ठरावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हंगामी
अध्यक्षांनी घोडेबाजार रोखल्यामुळं त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
देखील सर्व सदस्यांचे आभार मानले.
****
पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे
प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या
तुकडीचं दीक्षांत संचलनाच्या वेळी उपस्थित होते. जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर
पाकिस्तान एकटा पडला असल्याचं त्यांनी सांगितलं. सशस्त्र सेना दल देशाची ताकद असून
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सशस्त्र सेनेचं योगदान महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यांनी
सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे
नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. राहुल गांधी
यांनी आपल्याला दहशतवादी संबोधल्याचा आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. आपल्याविरोधात
न्यायालयात कोणतेही दोषारोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी विशेषाधिकाराचा
भंग केला आहे असं सांगत प्रज्ञा सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी केली
आहे.
****
झारखंड विधानसभेच्या पहिल्या फेरीत सहा जिल्ह्यातल्या १३ मतदारसंघासाठी
आज शांततेत मतदान पार पडले. दुपारी तीन वाजता मतदान संपले तेव्हा ६२.८७ टक्के मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला होता.
****
जिल्हा प्रशासन आणि लातूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन दिवसांच्या
जलपरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेचं उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या
हस्ते करण्यात आलं. पाणी काटकसरीनं वापरणं, नळाला मीटर बसवणं आणि पाण्याचं धोरण निश्चित
करण्यासाठी ही जलपरिषद महत्वाची ठरणार असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं.
पाणी वापर मोजण्यासाठी वापरात येणारं मीटर आणि इतर यंत्र सामग्रीचं प्रदर्शनही भरवण्यात
आलं आहे.
****
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. वैयक्तिक,
सामाजिक आणि शासकीय पातळीवर जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध आणि
नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, बीड मार्फत जागतिक एड्स दिन निमित्त प्रभातफेरीचं
आयोजन करण्यात आलं होतं. प्रभातफेरीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय,यांच्या
हस्ते जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आलं.
****
केंद्र सरकार सोन्याची दागिने आणि सोन्यापासून बनवलेल्या शोभेच्या
वस्तूंमधील शुद्धता टिकवण्यासाठी १५ जानेवारी २०२१ पासून त्यावर हॉलमार्क बंधनकारक
करणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश येत्या १५ जानेवारीला काढण्यात येणार असल्याचं ग्राहक
व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. सदर नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी
व्यापाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला असल्याचं पासवान यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment