Monday, 25 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.11.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत झालेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार तसंच राज्यसरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून, सत्ता स्थापनेच्या प्रकियेवर आक्षेप घेत, चोवीस तासात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.
****
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. ते आज कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय असून, त्याचा पक्षाशी संबंध नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
****
बहुमत नसतांनाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली भाजपचे ही खेळी लोकशाहीला घातक असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परत आले आहेत असं सांगून विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही त्यांना पुरून उरू अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी दिली. भाजपपेक्षा आमच्याकडे १० आमदार जास्तच आहेत असं सागून सत्तेसाठी कोणत्या थराला जातात हे जनता बघत आहे असंही त्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी अजित पवार यांच्याशी दीड तास चर्चा केली आणि त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केले. यावेळी बोलतांना भुजबळ यांनी सत्ता येते आणि जाते पण घर फुटता कामा नये अशी प्रतिक्रिया दिली.
****


No comments: