Wednesday, 27 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार
**  शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या स्थापनेची घोषणा
** सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही- उद्धव ठाकरे
** सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा
आणि
** देशभरात संविधान दिन उत्साहात साजरा
****
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या २८ नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या आमदारांची काल सायंकाळी मुंबईत बैठक झाली, या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीतले इतर घटकपक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लोकभारती आणि अपक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. आघाडीमध्ये समन्वयासाठी एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, दुर्लक्षित घटकांच्या समस्या, यासारख्या मुद्यांवर काम करण्यासाठी आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं किमान समान कार्यक्रमात नमूद करण्यात आलं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्याचा ठराव मांडला, या ठरावाला तिन्ही पक्षांनी अनुमोदन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. आपलं सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही, असं सांगत त्यांनी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन वेगळ्या विाचरधारेचे पक्ष एकमेकांवर विश्वास ठेऊन देशाला वेगळी दिशा देत असल्याचं सांगितलं. गेले ३० वर्ष ज्या पक्षासोबत राहीलो त्यांनी नाही, तर ज्यांच्यावर टीका केली त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
या बैठकीनंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, महाराष्ट्र विकास आघाडीला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सोपवलं. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं.
****
तत्पूर्वी, काल सकाळी सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस यांना आज बुधवार सायंकाळपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकारणात काल वेगानं घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. वैयक्तिक कारणावरून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं, असं राज्यपालांनी फडणवीस यांना सांगितलं. त्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी, राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे आपल्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ राहिलेलं नाही, इतर पक्षांचे आमदार फोडण्याची किंवा घोडेबाजार करण्याची आपल्या पक्षाची भूमिका नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
अवघ्या चार दिवसात फडणवीस सरकार कोसळल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी फडणवीस यांचा राजीनामा हा राज्यातल्या अकरा कोटी नागरिकांचा िजय असल्याची भावना व्यक्त केली.
****
दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांनी काल सायंकाळी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
कोळंबकर आज िधानसभेच्या उर्वरित दोनशे सत्त्याऐंशी नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. सकाळी आठ वाजेपासून विधानसभेच्या या सत्राला प्रारंभ होईल.
****
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.
****
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल अकरा वर्ष झाली. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संसदेनं संविधान स्वीकारण्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहांची काल संयुक्त सभा घेण्यात आली. या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संविधानानं दिलेल्या हक्कांचा वापर करण्यासोबतच संविधानानं नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट जारी करण्यात आलं. 

दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभेवर बहिष्कार टाकत, संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष तसंच द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदारांचा समावेश होता.
****
७० वा संविधान दिन राज्यातही विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले सभागृहात संविधानातल्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन केलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं संविधान जनजागृतीपर दुचाकी फेरी काढण्यात आली.
जालना नगरपालिका आणि संविधान बचाव कृती समितीच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.

परभणी महानगर पालिकेच्या महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे यांनी महापालिकेतले पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाची शपथ दिली. जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला.

लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला. संविधानदिनानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यान तसंच माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले. याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविद्यालयांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केलं. भारत हा सार्वभौम लोकशाही असणारे गणराज्य असून इथली शांतता आणि बंधुतेच्या वातावरणात सर्व धर्म शांततेने नांदत आहेत असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी केलं.

नांदेड शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती. जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन, संविधान आणि त्यासंबंधीत साहित्य, ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर आणि नांदेडच्या विभागीय रेल्वे कार्यालयातही संविधान दिन साजरा करण्यात आला.
****
औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, राज्य किसान आंदोलन - स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं काल संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कष्टकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. माथाडी कायद्याची काटेकोर अंमबलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं, शेतीमालास खर्चाचे दीडपट हमी भाव द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या
****


No comments: