Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२९ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार
स्वीकारत आहेत. ते मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्वीकारत
आहेत. त्यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात
मंत्रिमंडळाची बैठक घेतली. राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती
आपण मुख्य सचिवांकडून मागवली असल्याचं ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी
बोलताना सांगितलं आहे.
****
राज्यात सत्तर अब्ज अमेरिकी डॉलर्सचा तेल शोधणारं संयत्र बसवण्याबाबत
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चर्चा झाली आहे. दररोज बारा लाख बॅरल तेल
उत्पादन करण्याची क्षमता या प्रकल्पात असणार आहे. अबूधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन
झायद अल नह्यान आणि सौदी अरेबियाचे राजकुमार
मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ आणि इतर अधिकाऱ्यांच्या अबुधाबी इथं झालेल्या दुसऱ्या
बैठकीत ही चर्चा झाली. या बैठकीत चार सामंजस्य करारावर सह्या झाल्या. जगातील या दोन प्रमुख तेल समृद्ध
देशांमध्ये भारतीय बाजारपेठेत प्रतीदिन किमान सहा लाख बॅरल कच्चे तेल पाठवण्याच्या
उपायांवरही चर्चा झाली.
****
रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो, असं राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई विद्यापीठ आणि भागवत परिवार यांच्यातर्फे
मुंबईत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलन उदघाटन प्रसंगी बोलत होते. रामायण
जीवनाचा आधार असून रामायण विश्र्वबंधुत्वाचा संदेश देतं, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी
यावेळी म्हटलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे
यांच्यात आज नवी दिल्ली इथं हैदराबाद हाऊसमधे होत आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय
संबंध अधिक मजबूत करण्याचे मार्ग तसंच सहकार्याच्या विविध क्षेत्रांबाबत उभय नेत्यांमधे
यावेळी चर्चा होत आहे. राजपक्षे त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.
तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी राजपक्षे काल संध्याकाळी नवी दिल्लीला पोचले. राष्ट्रपती
भवनात त्यांचा स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संपला
असून या अंतर्गत सहा जिल्ह्यांतील तेरा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. एक्क्याऐंशी
सदस्य असलेल्या झारखंड विधान सभेसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. मतमोजणी तेवीस डिसेंबरला
होणार आहे. या मतदान प्रक्रियेत प्रथमच टोकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे आणि यामुळे
मदरांना खूप वेळ रांगेत उभं रहावं लागणार नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
****
मुंबई - पुणे महामार्गावर आज पहाटे एका भीषण अपघातात चार जण जागीच
ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
एका मोटारीनं टँकरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींना पनवेल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या जातील, तो सोन्याचा दिवस ठरेल,
असं औरंगाबाद चे महापौर महापौर नंदकुमार घोडेले,
यांनी म्हटलं आहे. महाअग्रो या सहाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद
इथं प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, परभणीच्या वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या
उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. मराठवाड्यातल्या दहा प्रगतीशील शेतकऱ्यांना
बैरिस्टर जवाहर गांधी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली
आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर, सौरभचा
सामना थायलंडच्या कुणलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल. युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतलं
आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास
यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ गेममधे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठ्ली
आहे.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या एकवीसाव्या आशियायी तिरंदाजी स्पर्धेत
रिकर्व्ह या प्रकारात भारताच्या दीपिका कुमारीनं सुवर्ण तर अंकिता भक्तनं रौप्य पदक
पटकावलं आहे. दीपिकानं अंतिम लढतीत अंकिताला सहा - शून्य असं सहज हरवलं. या दोघींनीही यापुर्वीच टोकयो ऑलम्पिकसाठी
आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment