Tuesday, 26 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२६ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार
** शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा
** राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे संसदेतही पडसाद; दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प
आणि
** विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नऊ सिंचन प्रकल्पांची चौकशी बंद करण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निर्णय
****
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांशी झालेल्या पत्रव्यवहारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले, यामध्ये अजित पवार यांनी दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेल्या पत्राचाही समावेश आहे. न्यायालयानं या सरकारला तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणी दरम्यान केली आहे. काल सुनावणीनंतर न्यायालयानं आपला निर्णय  आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत राखून ठेवला आहे.
****
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल आपल्याकडे १६२ आमदारांचं संख्याबळ असल्याचं सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे सदनात ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेनेला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त विधीमंडळ गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीने सादर झालेल्या या निवेदनासोबत या तिन्ही पक्षांच्या १६२ आमदारांच्या स्वाक्षरीची यादी जोडण्यात आली आहे.
****
राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद काल संसदेतही उमटले. राज्यसभेत काँग्रेस, डावे पक्ष तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरुन दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावले, त्यानंतर विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ वाढत गेल्यानं, सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत, आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेतही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकावले. अध्यक्षांच्या मनाईनंतरही फलक झळकावणारे हिबी एडन आणि टी एन प्रतापन या दोन खासदारांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलद्वारे सदनाबाहेर काढलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजित पवार यांनी मात्र काल उपमुख्यमंत्री पदाचा अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव तसंच अर्थ सचिवांशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
****
संविधान दिवस आज सर्वत्र साजरा केला जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीनं तयार केलेलं संविधान, २६ नोव्हेंबर १९४९ ला संसदेने स्वीकारलं होतं, या घटनेला ७० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांची एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या बैठकीला संबोधित करणार आहेत. या बैठकीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प, यासह एकूण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून, लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी सुरू होती. भविष्यात शासनानं किंवा न्यायालयानं आदेश दिल्यास, चौकशी पुन्हा सुरू केली जाईल, असं याबाबत जारी पत्रात म्हटलं आहे. या सर्व नऊ प्रकरणांचा २०१३च्या सिंचन घोटाळ्याशी संबंध नसल्याचा खुलासाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केला आहे.
चौकशी बंद करण्याच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षानं टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं पाठिशी घालणं, हाच भाजपचा सत्यनिष्ठेचा मार्ग असल्याची उपरोधिक टीका एका ट्वीट संदेशातून केली आहे, मात्र ही प्रकरणं पुराव्याअभावी बंद केली असून, त्या प्रकरणांशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं  विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपूंजी असल्याचं सांगत, शिवसेनेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढले. जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना एक निवेदन सादर केलं.
****
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सातारा जिल्ह्यात कराड इथं जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.
****
यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नांदेड इथं काल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं व्याख्यान झालं. जो नेता साधन सुचितेचा आग्रह न धरता, त्यावर न चालता, राजकारणात पदस्थ होतो, त्याचे कौतुक करणारा समाज निर्माण झाला आहे, असं ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य जगदीश कदम यांचंही काल नांदेड इथं व्याख्यान झालं. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत वारसा निर्माण केला, तो आजच्या काळात जोपासला जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
****
औरंगाबाद इथल्या कृषी तंत्र विद्यालयाच्या मैदानावर मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीनं २९ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान सहाव्या महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात शेती, शेतीपूरक उद्योगांशी संबंधित विषयांवर नामवंतांचं मार्गदर्शन आणि शेती पीक प्रात्याक्षिकाचा अभिनव उपक्रम असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या दहा प्रगतशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहरलाल गांधी शेतकरी पुरस्कारनं गौरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ पंचायत समितीमधल्या कनिष्ठ लेखा अधिकारी मुख्तार मणियार याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी काल रंगेहात पडकण्यात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कर्मचार्याला प्रवास भत्ता फरक देयकाची तपासणी करुन स्वाक्षरी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबादचं लोकसंपर्क कार्यालय- फिल्ड आऊटरिच ब्युरोच्यावतीनं जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या वरूड बुद्रुक इथं आज संविधान दिवस आणि एकवेळ उपयोगात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी या विषयावर विशेष प्रचार कार्यक्रम आणि रॅली काढण्यात येणार आहे.  
नांदेड इथं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय संविधान रॅली काढणार आहे. सकाळी नऊ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू होईल. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सकाळी अकरा वाजता संविधान उद्देशिकेचं सामूहिकपणे वाचन होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भुमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सोनवणे यांच्या हस्ते काल झालं.
****
उस्मानाबादचे उगवते क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर आणि अभिषेक पवार यांची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित कुचबिहार ट्रॉफी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या कृषी पदविकेच्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती देण्याची मागणी कुलसचिव रणजीत पाटील यांच्याकडे शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीनं निवेदनाद्वारे केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात काल जिल्हा परिषदेतर्फे सशक्‍त विद्यार्थी अभियान राबवण्यात आलं. जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत उपस्थित बालकांना लोह आणि ब-जीवनसत्व युक्त  औषध- गोळ्या देण्‍यात आल्‍या.
****

No comments: