Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२७ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या
२८८ पैकी २८२ नवनिर्वाचित आमदारांनी आज विधानसभेत सदनाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
तर, पाच आमदार गैरहजर राहिल्याने त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. सकाळी आठ वाजता विधानसभेच्या
विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना
शपथ दिली. देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह
अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे या ज्येष्ठ नेत्यांनी तसंच प्रथमच
निवडून आलेले आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख आदी सदस्यांनीही सदस्यत्वाची शपथ
घेतली.
****
आपण राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षात असून, याच पक्षात राहू, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं
आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, हे आपले नेते असल्यानं त्यांची भेट घेतल्याचं सांगत, गेल्या
काही दिवसातल्या घटनांबाबत आपण योग्य वेळी बोलू, असं पवार यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं
दिलं आहे.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाल वाढवण्याला मंत्रिमंडळाच्या
अर्थविषयक समितीनं मंजुरी दिली. या आयोगाला २०२०-२०२१ या पहिल्या आर्थिक वर्षाचा अहवाल
सादर करण्यालाही या समितीनं मंजुरी दिली आहे.
अन्नधान्य
आणि साखर भरण्यासाठी ज्यूटच्या पारंपारिक पोत्यांचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय
या वर्षीसाठीही कायम ठेवण्यासही समितीनं मंजुरी दिली. यामुळे ज्यूट उद्योगाला लाभ होणार
आहे.
भारतीय खाद्य मंडळाचं भांडवल सध्याच्या साडेतीन हजार कोटी
रुपयांवरून दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यालाही अर्थविषयक समितीनं आज मंजुरी दिली.
****
कार्टोसॅट
३ या अत्याधुनिक भारतीय उपग्रहासह अमेरिकेच्या अन्य तेरा लघु उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो-चं अभिनंदन
केलं आहे. या यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं आपण मन:पूर्वक अभिनंदन करतो, असं पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. कार्टोसॅट ३ हा पृथ्वीची उत्कृष्ट छायाचित्रं घेऊ शकणारा
तिसऱ्या पिढीचा निरीक्षण उपग्रह आहे.
****
ज्येष्ठ
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक मधु शेट्ये
यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते एकोणनव्वद वर्षांचे होते. 'चले
जाव चळवळ', 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ', तसंच गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग
नोंदवला होता.तर, पत्रकारितेत त्यांचं पाच दशकांचं योगदान होतं. मुंबई प्रेस क्लबचे
ते संस्थापक होते.
****
राज्यात
थंडी जाणवण्यास सुरुवात झाली असून, अहमदनगर इथे काल राज्यातलं सर्वात कमी, म्हणजे बारा
पूर्णांक पाच अंश सेल्शियस इतकं किमान तापमान नोंदलं गेलं. मराठवाड्यातलं सरासरी किमान
तापमान पंधरा अंश सेल्शियस इतकं होतं.
दरम्यान,
नांदेड इथे आज सकाळी अतिशय दाट धुकं पडल्याचं वृत्त आहे. गेल्या अनेक दशकांत पाहण्यात
न आलेल्या अशा प्रकारच्या दाट धुक्यामुळे तुरीच्या पिकाचं नुकसान होण्याची भीती शेतकरी
व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वाशिम
जिल्ह्यातल्या जयपूर इथल्या छोट्या बंधाऱ्याचं काम यावर्षी पूर्ण झालं असून, पहिल्याच
वर्षी हे धरण पूर्ण भरलं असल्याचं वृत्त आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामाच्या पिकांच्या
सिंचनाची सोय झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
बांग्लादेशाविरुद्ध
टी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयने आज जाहीर केला.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातल्या या संघातून
गुडघ्याच्या
दुखापतीमुळे शिखर धवनला वगळण्यात आलं आहे. धवन ऐवजी संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात
आला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना सहा डिसेंबरला हैदराबादला, आठ डिसेंबरला
दुसरा सामना तिरुवनंतपुरम इथं तर तिसरा सामना अकरा डिसेंबरला मुंबईत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment