Saturday, 23 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****

Ø मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाविकासआघाडीची सहमती
Ø   वकाळी पावसामुळे नुकसाग्रस्त मराठवाड्यासाठी आठशे एकोणीस कोटी रुपये निधी मंजूर
Ø   औरंगाबाद शहरात प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं आश्वासन
Ø  औरंगाबाद इथं जागतिक बौद्ध धम्म परिषदेला कालपासून प्रारंभ
Ø आणि
Ø  लातूर तसंच परभणी महापालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी
****

      राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात काल मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीत काही मुद्यांवर सहमती झाली, काही मुद्यांवर चर्चेसाठी आज या तिन्ही पक्षात पुन्हा बैठक होणार आहे. काल बैठक संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वांची सहमती असल्याचं सांगितलं. किमान समान कार्यक्रमावर अजून चर्चा होईल, असं ते म्हणाले. ठाकरे यांनी मात्र सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर माहिती दिली जाईल, असं वार्ताहरांना सांगितलं. कॉग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना, तिन्ही पक्षांमध्ये काही मुद्यांवर आज बैठक होईल, त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असं सांगितलं.

       आज होणाऱ्या बैठकीत सर्व मुद्यांचं निराकरण झाल्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. 
****

       अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य प्रशासनानं आठशे एकोणीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यात सर्वाधिक एकशे चव्वेचाळीस कोटी अठरा लाख रुपये निधी बीड जिल्ह्याला मंजूर झाला आहे. औरंगाबादसाठी एकशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख तर नांदेडसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले आहेत. जालना आणि लातूरकरता अनुक्रमे एकशे दहा कोटी एकवीस लाख आणि शंभर कोटी अडूसष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. उस्मानाबादसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणीस लाख, हिंगोलीसाठी त्रेपन्न कोटी श्यहात्तर लाख तर परभणीसाठी सत्त्याऐँशी कोटी बासष्ट लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.
****

       अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकानं काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यातल्या गावांना भेट दिली.
       
       आज हे पथक बीड जिल्ह्यातल्या गेवराई, माजलगाव, धारूर आणि वडवणी, या गांवांमध्ये पीक नुकसानीची पाहणी करणार आहे. तर उद्या हे पथक जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या गावांना भेट देणार आहे.
****

       एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं सर्व मंत्रालयं आणि राज्यांना दिशा निर्देश जारी केले आहेत. पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.
****

 औरंगाबाद शहरातल्या प्रदूषणाच्या समस्यांच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण तसंच माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिलं. औरंगाबाद इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरच्यावतीन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद शहर हे सर्वाधिक प्रदूषित १०० शहरांच्या यादीत आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाचे दोन अधिकारी औरंगाबाद शहरात येऊन प्रदूषणाच्या समस्येचा अभ्यास करतील, त्यानंतर याबाबतच्या उपाययोजना केल्या जातील असं ते म्हणाले. वाहनांपासून होणारं प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनेबाबत बोलतांना जावडेकर म्हणाले..
   [$045DE464-6AC7-48ED-A90D-89DACE71ED0A$JAWADEKAR - JAWADEKAR - ]
वाहनापासून होणार प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल  एक एप्रिल पासून पीएस-६ रेट मिळायला लागेल. हे जगातील सर्वोत्तम  पेट्रोल आणि डिझेलचे दर असेल. त्याने प्रदूषण कमी होतं, आणि पीएस-६ कम्पाल्ट व्हेईकल वाहनं सुद्धा मिळतील. मग ती दोन चाकी असोत, तीन चाकी असोत , चार चाकी चाकी असोत सगळी वाहनं एक एप्रिल पासून आता पीएस-६  कम्पाल्ट असेल आणि त्याचा मोठा परिणाम वाहणाचं प्रदूषण कमी होईल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

        औरंगाबाद इथं जागतिक बौद्ध धम्म परिषदेला काल सुरुवात झाली. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन झालं. तत्पूर्वी परिषदेवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सामूहिक वंदनेत अखिल भारतीय भिक्खु संघाचं स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचं औरंगाबाद इथं आगमन झालं. परिषदेचे आयोजक डॉ हर्षदीप कांबळे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर दलाई लामा यांनी औरंगाबाद शहरानजिक चौका इथं उभारलेल्या लोकुत्तरा बुद्धविहार आणि प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. उद्या रविवारी या परिषदेत दलाई लामा मार्गदर्शन करणार आहेत.
****

       मराठवाड्यात लातूर आणि परभणी या दोन्ही महापालिकांच्या महापौर पदांच्या निवडणुका काल झाल्या, या दोन्ही महापौर पदांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे.

        लातूर महानगरपालिकेत भाजपचे चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन नगरसेवकांनी कॉग्रेसला मतदान केल्यामुळे काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे विजयी झाले. विक्रांत गोजमगुंडे यांना पस्तीस तर भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांना तेहतीस मतं पडली.
उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत बिराजदार निवडून आले.

        भाजप नगरसेवक शकुंतला गाडेकर या मतदान प्रक्रियेला अनुपस्थित राहिल्या. तर वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणूक लढवलेले राजा मणियार यांनीही कॉग्रेसला मतदान केलं.

       नवनिर्वाचित महापौर लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

       दरम्यान, जनाधार असणाऱ्या पक्षात तोडफोड करून कॉंग्रेसनं महापौरपद मिळवल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
****

       परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे हे विजयी झाले. त्यांनी अनुक्रमे भाजपच्या मंगला मुद्गलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोकिंद खिल्लारे यांचा पराभव केला. मंगला मुद्गलकर यांना आठ तर अनिता सोनकांबळे यांना ३७ मतं मिळाली, तर १४ सदस्य तटस्थ होते.
****

       राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी, मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, पुण्याच्या महापौरपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ, नागपूरच्या महापौरपदी भाजपाचे संदीप जोशी, अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे चेतन गावंडे, उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान, चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपाच्या राखी कंचर्लावार, तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपाच्या उषा ढोरे यांची निवड झाली आहे.
****

       जालना जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये मंठा तालुक्यातल्या नायगाव ग्रामपंचायतीनं प्रथम पुरस्कार पटकावला आहे. रोख पाच लक्ष रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. जिल्ह्यातल्या ७९९ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये अंबड तालुक्यातल्या पाथरवाला बुद्रुक आणि बदनापूर तालुक्यातल्या वरुडी ग्रामपंचायतीनं अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्कार पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते काल जिल्हा परिषदेच्या सभागृहात या पुरस्करांचं वितरण करण्यात आलं.
****

       राज्य सरकारच्या विविध पदभरतीच्या परीक्षा ‘महापरीक्षा पोर्टलमध्ये अनेक गैरप्रकार होत असून, हे पोर्टल तात्काळ बंद करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांचं या गैरप्रकारांमुळे नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****

       मराठी वृत्तपत्रसृष्टीत अग्रलेखांचे बादशाह अशी ओळख असलेलं दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक नीकंठ खाडिलकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

        रंगभूमी तसंच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचं काल वार्धक्यानं निधन झालं, त्या ९३ वर्षांच्या होत्या. बाजार, उमरावजान आणि सलाम बॉम्बे चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. कैफी ॲण्ड आय या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकावर त्यांच्या कन्या शबाना आझमी यांनी सादर केलेल्या कैफी और मैं या नाटकाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
****

       अहमदनगरचे माजी खासदार दादापाटील शेळके यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. दादा पाटील शेळके हे १९७८ ते १९९४ या दरम्यान चार वेळा आमदार होते, तसंच दोन वेळा खासदारपद भूषवलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज खारे खर्जुने इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****

       उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं सुरु असलेल्या तगर महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. काल या महोत्सवात तेर आणि परिसरातल्या विविध शिलालेख आणि प्राचीन स्थळावर आढळणाऱ्या ब्राम्ही लिपीच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा घेण्यात आली.
****

       भारत आणि बांग्लादेशदरम्यान कोलाकाता इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीन बाद १७४ धावा झाल्या. विराट कोहली ५९, तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी बांग्लादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. कसोटीत भारत ६८ धावांनी आघाडीवर आहे.
*****
***

No comments: