आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र
विधानसभेच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाला आज सकाळपासून प्रारंभ झाला. हंगामी अध्यक्ष
कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. दोनशे
अट्ठ्याऐंशी सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, अशोक
चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी झाला असून,
अन्य सदस्यांचा शपथविधी सुरू आहे.
राज्यातल्या
गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते
म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव काल संध्याकाळी निश्चित झाल्यावर
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे
गटनेते बाळासाहेब थोरात यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा
दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि ३
डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं.
दरम्यान
सरकारच्या खातेवाटपाबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष येत्या दोन
दिवसात चर्चा करून निर्णय घेतील, असं काँग्रेसचे राज्यप्रदेशाध्यक्ष तसंच गटनेते बाळासाहेब
थोरात यांनी सांगितलं आहे. ते आज शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी राजभवनात राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. उद्या
२८ नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
****
भारतीय
अवकाश संशोधन संस्था-इस्रो-नं भारताच्या कार्टोसॅट ३ या अत्याधुनिक उपग्रहासह अमेरिकेच्या
तेरा लघु उपग्रहांचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही ४७ या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात
आलं.
****
ट्रांसजेंडर
अर्थात लिंगबदल केलेल्या व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं
आहे. राज्यसभेत काल आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेनं याआधीच या विधेयकाला
मंजूरी दिली आहे. ट्रान्स्जेंडर व्यक्तीचा, घराचा भाग असण्याचा आणि घरात राहण्याचा
हक्क, या विधेयकानं बळकट केला आहे.
****
No comments:
Post a Comment