Thursday, 28 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, शिवसेनेचा एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन सदस्यांनाही मंत्रीपदाची शपथ
** उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला
** दमण आणि दिव तसंच दादरा आणि नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या विलीनीकरण विधेयकाला लोकसभेची मंजुरी
आणि
** आशियायी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योतिसुरेखा वेण्णम जोडीला मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यांच्या समवेत शिवसेनेचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यही शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यभरातून ५०० शेतकरी या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असतील. 
शपथविधिच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
दरम्यान, शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सुरक्षेच्या मुद्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मंनोरंजनाचं, असा प्रश्न उपस्थित करणार्या याचिकेवर काल सुनावणी घेताना न्यायालयानं, सार्वजनिक जागेवर असे कार्यक्रम घेण्याची प्रथा पडता कामा नये, असं म्हटलं आहे. या कार्यक्रमाबद्दल काहीही बोलणार नसून, यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये, अशी प्रार्थना करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.  ३ डिसेंबरपूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत केला जाईल, आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या २८८ पैकी २८ नवनिर्वाचित आमदारांनी काल विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तर, दोन आमदार गैरहजर राहिल्यानं त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. काल सकाळी आठ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना शपथ दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण,  अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे या ज्येष्ठ सदस्यांसह प्रथमच निवडून आलेले आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, अदिती तटकरे आदी सदस्यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा, याबाबत योग्य वेळ आल्यावर बोलू असं काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेलं सरकार चौथ्या दिवशी कोसळलं, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून, याच पक्षात राहू, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, हे आपले नेते असल्यानं त्यांची भेट घेतल्याचं सांगत, गेल्या काही दिवसातल्या घटनांबाबत आपण योग्य वेळी बोलू, असं पवार यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला विरोध करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्ष यापुढे कधीही सत्तेवर येऊ नये, यासाठी नव्या सरकारला पाठिंबा असल्याचं पक्षानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. सत्ता स्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरुन पक्षपाती भूमिका घेतल्यामुळे राज्यपालांना पदावरुन काढून टाकण्याची मागणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आपल्या पत्रकात केली आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनंही महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
दमण आणि दिव तसंच दादरा आणि नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशाचं विलीनीकरण करण्याच्या विधेयकालाही लोकसभेनं काल मंजुरी दिली. विलीनीकरणामुळे या दोन प्रदेशांचा विकास झपाट्यानं होईल, असं सकरारनं म्हटलं आहे. आवाजी मतदानानं हे विधेयक मंजुर झालं.
****
ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी एक वर्षाची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लातूर शहरासाठी स्वतंत्र जल धोरण निर्माण केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. येत्या ३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला लातूर इथं होणाऱ्या जल परिषदेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पाणी टंचाईग्रस्त जिल्हा अशी लातूर जिल्ह्याची ओळख कायमस्वरुपी पुसण्यासाठी जल परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचं ते म्हणाले. जल परिषदेच्या माध्यमातून पाणी बचत आणि संवर्धनाच्या विविध उपायांची माहिती मिळणार आहे. जल धोरणामध्ये पाण्याचं नियोजन, पुनर्वापर, मीटर बसवणं, नवीन जोडणी देणं, प्रत्येक नळाला समदाबानं पाणी पुरवठा करणं आदि बाबींचा समावेश राहील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत नव्वद टक्के शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईचं अनुदान वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख तेवीस हजार रुपयांचा पहिला हप्ता सरकारनं जारी केला होता. यातून जिल्ह्यातल्या एक लाख त्रेपन्न हजार आठशे बारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे अनुदान जमा करण्यात आलं असल्याचं
जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव इथल्या मानार प्रकल्प पाटबंधारे उपविभागात काल नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांनी पाणीवापर संस्थेनं करावयाची कालवे दुरुस्ती आणि त्यासाठी परताव्यापोटी मिळणारं अनुदान याविषयावर मार्गदर्शन केलं. पळसगावच्या शिवसांब पाणी वापर संस्थेमार्फत शासनाकडून प्राप्त होत असलेल्या रकमेतून रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी मायनर आणि शेतचाऱ्यांची दुरुस्ती होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तसंच इतरही पाणी वापर संस्थांकडून मायनर दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं अभियंत्यांनी सांगितलं.
****
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सोयाबीन तारण कर्ज योजनेचा शुभारंभ काल सभापती ललितकुमार शहा यांच्या हस्ते झाला. शेतकऱ्यांना वेळोवेळी अडचणीच्या काळात सातत्यानं बाजार समितीनं सहकार्याची भूमिका ठेवण्याचं काम केलं असून, तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सभापतींनी यावेळी केलं.
****
बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं काल जाहीर केला. सलामीवर शिखर धवनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आलं आहे. धवन ऐवजी संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना सहा डिसेंबरला हैदराबादला, आठ डिसेंबरला दुसरा सामना तिरुवनंतपुरम इथं तर तिसरा सामना अकरा डिसेंबरला मुंबईत होणार आहे.
****
बँकॉक इथं सुरू असलेल्या एकविसाव्या आशियायी तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योतिसुरेखा वेण्णम या जोडीनं मिश्र दुहेरी प्रकारात काल सुवर्णपदक जिंकलं. या जोडीनं चिनी तैपेईच्या प्रतिस्पर्धी जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. या स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण, दोन रजत आणि चार कांस्य पदकं जिंकली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं आदिवासी विभागाच्या वतीनं आयोजित, शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांना कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना आणि औरंगाबाद जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्यातर्फे गंगापूर इथं राज्य युवा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. येत्या एकोणतीस तारखेपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातल्या आठ विभागांचे एकशे ब्याण्णव खेळाडू, बत्तीस प्रशिक्षक आणि तीस पंच या स्पर्धेत सहभागी होणार असून केरळ राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्र राज्याचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे.
****
लातूरचे नवनियुक्त महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी काल पदभार स्वीकारला. निवडणुकीपूर्वी जाहिर केलेला संकल्पनामा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढचे अडीच वर्ष उपमहापौरांना विश्वासात घेउन काम करणार असल्याचं गोजमगुंडे यावेळी म्हणाले.
****


No comments: