Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२३
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्याचे मुख्यमंत्री
म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी
राजभवनात फडवणीस आणि पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेले काही दिवस राज्यात
सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या बैठका सुरु होत्या. काल रात्री पर्यंत शिवसेना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. त्या
पार्श्वभूमीवर आजची घडामोड मोठी धक्कादायक मानली जात आहे. नव्या सरकारच्या स्थापनेमुळे
राज्यात गेल्या महिन्यांपासून सत्तास्थापनेबाबतच्या नाट्याला नवे वळण लागले आहे.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
ट्वीटरद्वारे पक्षाचा अजीत पवार यांच्या निर्णयाला पाठिंबा नसून तो त्यांचा वैयक्तिक
निर्णय असल्याच म्हटलं आहे. तर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हाटस्ॲप स्टेटसवर कुटुंबात
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच पक्षाचे
प्रवक्ते नवाब मलीक यांनी महाआघाडी अद्याप एकत्रच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या
पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची एक बैठक पार
पडली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजित पवार यांची विधीमंडळ
पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली आहे.
****
भारतीय जनता पक्षाला
राज्यातून स्पष्ट जनादेश मिळाला आहे आणि राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचं
मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर
बोलत होते. राज्यात २४ ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सत्तास्थापनेचा तिढा
सुरू होता. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांसह अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे स्थिर सरकार
स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना, राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण
सभागृहात संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार
यांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तसंच अजित पवार यांच्या सभेत पक्षाचा कोणताही नेता हजर राहणार नसल्याचं ते म्हणाले.
तसंच अजित पवार यांनी शिस्तभंग केला असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
तसंच जे नेते जातील त्यांचं सदस्यत्व धोक्यात येईल असं ते म्हणाले. जे पक्ष सोडून जातील
ते निवडून कसे येतील असं निर्वाणीचा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.
या बैठकीनंतर तिन्ही
पक्षांचे नेते संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करून त्यांची भूमिका स्पष्ट करणार
आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे अध्यक्ष
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण
आणि अशोक चव्हाण हे देखील उपस्थित आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विटरद्वारे
अभिनंदन केलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नव्या सरकारला
राज्यात विकास कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
दरम्यान, अजित पवारांनी
महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, मात्र
या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही, हे ठामपणे सांगू शकतो, असं
राऊत यावेळी म्हणाले. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला असा आरोप त्यांनी यावेळी
लगावला. तर राज्यपालांनी ज्या पद्धतीने हा शपथविधी केला आहे तो चुकीचा असून शरद पवार
यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या घडामोडीची
पूर्वकल्पना आली होती, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी
दिली आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेते दिद्विजय सिंह यांनी भाजपने अजित पवारांच्या सोबत
स्थापन केलेल्या सरकारवर टिका केली आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पद आणि गोपनियतेची शपतह घेतल्यानंतर राज्यभरातून
विविध पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगाबाद इथं राज्यमंत्री अतुल
सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत, मिठाई वाटप करत
जल्लोष साजरा केला. हिंगोलीत देखील भाजपातर्फे मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र या जल्लोषात
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
धुळे शहरातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल. पालघरमध्ये
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध केला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री शौकत
आझमी यांचं काल संध्याकाळी निधन झालं.त्या ९३ वर्षांच्या होत्या. प्रख्यात कवी कैफी
आजमी यांच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या त्या मातोश्री होत्या.
*****
***
No comments:
Post a Comment