Tuesday, 19 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.11.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 राज्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. यात सोलापूर आणि जालना जिल्हा परिषदेची अध्यक्षपदं अनुसूचित जातीसाठी राखीव ठरली आहेत तर नागपूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेची अध्यक्षपदं अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी; नंदुरबार, हिंगोली अनुसूचित जमातीसाठी; नांदेड, पालघर, रायगड अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी; लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती इतर मागास प्रवर्गासाठी; बीड, ठाणे, सिंधुदूर्ग, सांगली, तसंच वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे. रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा खुल्या प्रवर्गासाठी तर  औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या वर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे.
****

 महामार्गांवरच्या वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशानं राज्यात वाहतुक पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक अशा ब्याण्णव इंटरसेप्टर गाड्या देण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या वाहनाचा वेग, दिवे आणि काचांची स्थिती तसंच चालकाचं विना सीट बेल्ट असणं किंवा मोबाईलवर संभाषणं सुरू असणं, अशा बाबींवर देखरेख ठेवता येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनाची माहिती या इंटरसेप्टर गाडीतल्या यंत्रणेद्वारे मुंबई मुख्यालयात पोहोचून कारवाईचा संदेश लगेच संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे.
****

 केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातली एक लाख बत्तीस हजार चौऱ्यांशी कुटुंबं पात्र ठरली आहेत. त्यात शहरी भागातली एकोणीस हजार तर ग्रामीण भागातली एक लाख बारा हजार कुटुंबं आहेत. जिल्ह्यात सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या शस्त्रक्रिया आणि आरोग्यसेवा या योजनेतून देण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद शहरातल्या दहा ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्तीसाठी राज्य पुरातत्व विभागानं पाच कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्चाचं नियोजन केलं आहे. या निधीतून शहरातली प्रसिद्ध पाणचक्की, दिल्ली गेट, मकई गेट आणि भडकल गेट हे तीन ऐतिहासिक दरवाजे तसंच काळी मशीद, चौक मशीद, शहागंज मशीद आणि लाल मशीद या चार मशीदींसह लाला हरदौल समाधी आणि नवखंडा महाल या ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार केला जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी दिली आहे.
****

 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज मंत्रालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थित मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
****

 मराठा आरक्षणा संदर्भातल्या सगळ्या याचिकांचं एकत्रीकरण करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. या संदर्भातली पुढची सुनावणी येत्या बावीस जानेवारीला होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, येत्या पंचवीस तारखेला कार्टोसॅट-३ या भारतीय उपग्रहासह अमेरिकेच्या तेरा व्यावसायिक लघु उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरुन   पीएसएलव्ही-सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं हे प्रक्षेपण होणार आहे.
****

 उस्मानाबाद शहरात आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानी भूगर्भातून मोठा आवाज झाला. लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग आणि जळकोट परिसरातही असा आवाज झाला. हा भूकंप नसून, भूगर्भातल्या हालचालींमुळे हा आवाज येत असल्याची माहिती लातूर इथल्या भूकंपमापन केंद्रानं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव येत्या एकवीस ते चोवीस तारखांदरम्यान होणार आहे. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी आज औरंगाबाद इथे वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यात सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ सात व्यासपीठांवर छत्तीस कलाप्रकार सादर करणार आहेत.
****

 चौदावं अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन येत्या तेवीस ते पंचवीस तारखां दरम्यान यवतमाळ इथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर महेंद्र भवरे यांची निवड करण्यात आली आहे.
*****
***

No comments: