Saturday, 2 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी शासनानं दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ.अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, महादेव जानकर आणि डॉ.सुरेश खाडे हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. राज्यातल्या तिनशे पंचवीस तालुक्यांत अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानीचं पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात केंद्र सरकारकडून मदत मागणार असून, या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याला उपसमितीनं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या पन्नास लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून, त्यांचा पैसाही शेतकऱ्यांना मिळावा याकरता विमा कंपन्यांशी बोलणी सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात सात नोव्हेंबरपर्यंत भाजप-शिवसेना-रिपाई आणि मित्र पक्षांच्या महायुतीचंच सरकार स्थापन होईल यात आपल्याला तिळमात्र शंका नसल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. जी जाऊ शकते ती नाराजी, नाराजी किंवा कोणतेही प्रश्र्न एकत्र बसून चर्चा केल्यानंच सुटू शकतात, असं शिवसेनेच्या नाराजीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्र्नाच्या उत्तरात मुनगंटीवार म्हणाले. भाजप आणि शिवसेनेची तीन दशकांची मैत्री असूनही मैत्री कायम टिकून रहावी, असा भाजपचा ठाम निर्धार असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केलं. 
****
शिवसेना राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात `युतीचा धर्म` पाळेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील विविध पर्याय चर्चिले जात आहेत. शिवसेनेनं सत्ता स्थापनेत बरोबरीच्या वाट्याची मागणी केल्यानं महायुतीतील या दोन्ही पक्षांदरम्यान तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. शिवसेनेनं महायुतीमध्ये निवडणूक लढवली आणि आपला पक्ष या संदर्भातील आपला धर्म अंतिम क्षणापर्यंत पाळेल, असं राऊत यासंदर्भात म्हणाले. शिवसेनेनं सरकार स्थापनेसंदर्भातील बोलणी थांबवलेली नसून ती सुरुचं झालेली नसल्याचंही राऊत यांनी यावेळी नमूद केलं.
****
अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात झालेल्या पिक नुकसानीची पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांनी आज पाहणी केली. संकटाच्या काळात शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं ते यावेळी म्हणाले. प्रशासनानं प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा व्हावा, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही निलंगेकर यांनी केल्या.
दरम्यान, लातूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. त्यांनी तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसानं केलेल्या नुकसानीच्या पार्श्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भऱपाईची मागणी केली आहे. दरम्यान, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यावेही उपस्थित होत्या.
****
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
****
अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी वाशिम जिल्ह्यात, राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यात महसूलराज्यमंत्री संजय राठोड यांनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा पिकाचं अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे. दिंडोरी तालुक्यातल्या वणी बाजार समितीत कांद्याला या हंगामातील उच्चांकी सुमारे सहा हजार सोऴा रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही जेमतेम हाच भाव पहायला मिळाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात तहसिलदार बालाजी शेवाळे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज शहरात अनेक भागात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.  
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील सुकळी इथं वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. वाघाच्या हल्ल्यातील गंभीर जखमी सुनील कबाडे यांच्यावर सेनगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघाला पकडण्यासाठी पथकं तैनात केली असल्याचं वनविभागानं म्हटलं आहे. 
****

No comments: