Monday, 4 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.11.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - ०४ नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
·      शेतीच्या नुकसानाचे पंचनामे पुढच्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·      शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाईची शिवसेना पक्षप्रमुखांची मागणी.
·      सतराव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे डॉ. सुरेश सावंत यांची निवड.
·      स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर आणि इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार प्रदान.
आणि
·      टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात बांग्लादेशचा भारतावर विजय; जर्मनी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन विजेता.
****
शेतीच्या नुकसानाचे पंचनामे पुढच्या तीन दिवसांत म्हणजेच सहा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल अकोला जिल्ह्यात नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामं करावं, आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषी विद्यापीठांतल्या उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यात काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्यात काही मर्यादा असतात, त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच नव्या सरकारची स्थापना  होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस होत आले तरी नव्या सरकारच्या स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.
****
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात कानडगाव आणि वैजापूर तालुक्यात गारज इथं झालेल्या नुकसानाची ठाकरे यांनी काल पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यानंतर ते औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यात राज्य सरकार कमी पडत असेल, तर केंद्र सरकारने कर्तव्य भावनेतून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असून, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोचले असून, सत्तेचं गणित जुळून आल्यावर माध्यमांसमोर मांडू, असं त्यांनी सांगितलं. भाजपाला हरियाणामधे सत्तेचं गणित जुळवण्यासाठी केवळ दोन दिवस लागले, मात्र महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी ऐवढा वेळ का लागत आहे, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना आणि भाजपामधे आता केवळ मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं ते म्हणाले. शिवसेना भाजपात युती करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेतला होता, राज्यात सत्तास्थापनेसाठीही त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता, असं राऊत म्हणाले.
****
मुख्यमंत्री पदाची शिवसेनेनं केलेली मागणी अवास्तव असल्याचं मत, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेनं भाजपला केवळ उपमुख्यमंत्री पद दिलं होतं, त्यामुळे भाजप पेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या तरच मुख्यमंत्रीपदाची शिवसेनेची मागणी रास्त ठरली असती, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात युती झालीच तर ती अनैसर्गिक युती ठरेल असंही ते म्हणाले.
****
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता नव्या जोमानं उभं रहावं, कमी मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांनी आत्मपरिक्षण करून, आगामी शिक्षक तसंच, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावं, अशी सूचनाही पवार यांनी कार्यकर्त्यांना केली.
****
जळगाव इथं आयोजित सतराव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीनं आयोजित हे संमेलन १७ नोव्हेंबरला होणार आहे. संमेलनाचे उद्घाटक गिरीश पाटील हे असून, यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, यांच्यासह अनेक साहित्यिकांची प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानचे ‘श्यामराव बोधनकर पुरस्कार’ आणि ‘इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार’ काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आले. राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांना श्यामराव बोधनकर पुरस्कार तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.दुलारी कुरेशी यांना इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि.देशपांडे आणि ताराबाई लड्डा यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
भारत-बांग्लादेश यांच्यात काल दिल्लीत झालेला पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना बांग्लादेशनं सात गडी राखून जिंकला. भारतानं दिलेलं १४९ धावांचं आव्हान बांग्लादेशनं विसाव्या षटकाचे तीन चेंडू शिल्लक असतानाच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करुन विजय मिळवला तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.
****
जर्मनीत सारब्रुकन इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं चीनच्या हाँग याँग वेंग याला १७-२१, २१-१८, २१-१६ असं पराभूत केलं. लक्ष्य सेनचं हे डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेपाठोपाठ, सलग दुसरं तर, या वर्षातलं तिसरं विजेतेपद आहे.
****
ज्या शेतकऱ्यांनी पावसाअभावी सोयाबिन वाळलं म्हणून काढून टाकलं किंवा जाळलं आहे, त्यांनाही पीक पेरा प्रमाणपत्राच्या आधारावर नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारनं तलाठ्याला सूचना द्यावी, अशी मागणी लातूर इथले प्रगतीशील शेतकरी अनिल दुडीले यांनी केली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतातून काढलेलं सोयाबीनही पावसात भिजल्यामुळे वाया गेलं आहे. या नुकसानाचीही पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी काल जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकाच्या नुकसानाची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी, जिल्ह्यात जवळपास ३० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित शेतीचे पंचनामे सुरू असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी सर्वेक्षणाची कामं संवेदनशीलतेनं वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश रामदास कदम यांनी दिले. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही कदम यांनी दिली.
दरम्यान, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून, ते पीक परिस्थिची पाहणी करणार आहेत.
****
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल जालना आणि घनसावंगी तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, नुकसानीच्या मोबदल्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, तसंच या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशा सूचना लोणीकर यांनी प्रशासनाला दिल्या. 
****
बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी काल बीड, गेवराई, वडवणी आणि परळी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असा दिलासा दिला. कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या सुकळी खूर्द परिसरात आलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी नऊ पथकं सेनगाव तालुक्यात दाखल झाली आहेत. या पथकाकडून वाघाच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या वाघानं तरुणावर हल्ला केल्यानंतर वनविभाग सतर्क झाला आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सूर्यभान सुखदेव गडाख यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आज सकाळी ९ वाजता सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गडाख हे १९७८ मध्ये अपक्ष तर १९८० मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानं हिंगोली जिल्ह्यात, सेनगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीला शनिवारी रात्रीपासून मोठा पूर आला आहे. या पुराचं पाणी धानोरा गावात घुसल्यामुळे, पावसाच्या माऱ्यातून बचावलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळं खडकी नदीला काल पूर आला होता. पिशोर-सिल्लोड रस्त्यावरचा पूल या पुरात वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. जालना शहरातही वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. येत्या सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
****
संत नामदेव महाराज यांची जयंती येत्या आठ तारखेला पंजाब राज्यात घुमान इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी नांदेड इथून काल सकाळी घुमान यात्रा रवाना झाली. यात्रेचं यंदाचं हे सहावं वर्ष आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...