Wednesday, 1 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01.04.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** दिल्लीतल्या एका धार्मिक संमलेनात सहभागी झालेल्या २४ जणांना कोरोना विषाणूची लागण
** राज्यातल्या लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय
** दूध उत्पादकांना दिलासा  देण्यासाठी २५ रुपये प्रतिलिटर दरानं राज्य सरकार दररोज दहा लाख लिटर दुधाची खरेदी करणार
** एप्रिल फुलच्या पार्श्वभूमीवर आज कोणत्याही प्रकारची अफवा, चेष्टा न करण्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
 आणि
** लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर पोलिसांचे निर्बंध
****
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं आहे. राज्यातल्या जनतेला काल त्यांनी संबोधित केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

एअर कंडिशनर वापर कमी करा थंड पाणी थंड पेय ते पेऊ नका घरात बसले काय करायचं तर उघडला फ्रीज आणि बाटली लावली तोंडाला अजिबात करू नका जे काय आपलं साधं नेहमीच टेंपरेचर पाणी प्या गरम पेय प्या एकूणच एलर्जी पासून दूर राहा नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ नका आपल्या शासकीय यंत्रणा जी सयासाठी आहे कोरोनासाठी उघडलेली आहेत तिकडे जाऊन त्याची तपासणी करा
इतर राज्यातल्या बेघर मजुरांनी स्थलांतर करण्याची गरज नाही, त्यांच्या राहण्याची, आणि जेवणाची सोय राज्य सकारनं केली असल्याचं, त्यांनी सांगितलं. राज्यात जिवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्याचा साठा पुरेसा असून, याची वाहतूक हळूहळू सुरु होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
कोरोनाचा प्रतिबंध आणि उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात, गेल्या दोन दिवसांत, १२ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून, तसंच देणगी स्वरुपात, कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे, अनेक उद्योग तसंच संस्थानी मदत देणं सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी, मुख्यमंत्री मदत निधीत २५ लाख रुपये जमा केले, अभिनेता विकी कौशल याने, मुख्यमंत्री मदत निधी तसंच पंतप्रधान मदत निधीत मिळून, एक कोटी रुपये जमा केले आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्माने कोरोना प्रतिबंध आणि उपचारासाठी, सुमारे ऐंशी लाख रुपये मदत दिली आहे. यापैकी ४५ लाख रुपये पीएम केअर निधीत, २५ लाख रुपये महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत, पाच लाख रुपये झोमॅटो फिडींग इंडिया फंडात, तर पाच लाख रुपये, भटक्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी दिले आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी,त एक कोटी अकरा लाख रुपये मदत दिली आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, पंतप्रधान मदत निधीत शंभर कोटी रुपये जमा केले आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीशकुमार यांनी ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड, दत्त शिखर संस्थानच्यावतीनं, ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे काल सुपुर्द करण्यात आला.
****
देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून, १३ शासकीय आणि आठ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून, दररोज साडेपाच हजार चाचण्या करता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. राज्यात आतापर्यंत सहा हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, पाच हजार ९११ जणांचे नमुने, निगेटिव्ह आल्याचं  त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना विषाणूला सामोरं जाण्यासाठी, आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.  .
****
राज्यात कालच्या एका दिवसात ८२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. काल मुंबईत ५९, नगरमध्ये तीन, तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई- विरारमध्ये, प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळून आले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधित ३९ रुग्णांना, उपचारानंतर प्रकृतीत सुधार पडल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, यापैकी चौदा जण मुंबईतले आहेत. पिंपरी चिंचवडमधून नऊ, पुण्यातून सात, नागपूर चार, यवतमाळ तीन, आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद इथल्या एका रुग्णाला, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या सर्वांना त्यांच्या घरी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त राज्यभरात साडे चार हजारावर रुग्णांना, विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****
लॉकडाऊनच्या काळात घरी राहताना, कंटाळा घालवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, किंवा मद्यसेवन टाळण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकात, अशा अंमली पदार्थांच्या सेवनानं, शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, तसंच मानसिक आरोग्यालाही बाधा पोहोचू शकते, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
दिल्लीतल्या निजामुद्दीन इथं, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या एका धार्मिक संमलेनात, दोन हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते. यात विदेशातल्या नागरिकांचाही समावेश होता. यापैकी २४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं, काल उघडकीस आलं. यामुळे आता सरकारनं देशभरातून या संमेलनात सहभागी झालेल्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. राज्यातले १०९ भाविक या संमेलनात सहभागी झाल्याचं निदर्शनास आलं असून, या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या संमेलनाचे आयोजक मौलाना साद यांच्याविरोधात, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर कलमांखाली, गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरची आव्हानं लक्षात घेऊन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसंच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचं, मार्च महिन्याचं वेतन, दोन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागानं जारी केला. राज्यातलेआणिवर्गातले अधिकारी-कर्मचाऱ्यांना, मार्च महिन्यासाठी देय वेतनाच्या, ५० टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल, तरवर्गाच्या कर्मचाऱ्यांना, ७५ टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘वर्गाच्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीधारकांना, पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या सर्वांचे उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचं, अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ‘कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे, राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी, राज्य सरकार दररोज दहा लाख लिटर दुधाची, २५ रुपये प्रतिलिटर दरानं खरेदी करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. खुल्या बाजारात दुधाचे दर घसरल्यामुळे, हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. येत्या काही दिवसात हे संकलन सुरु होईल, आणिकोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत ही खरेदी सुरु राहील, असं पवार यांनी सांगितलं. या सर्व दुधाची भुकटी करुन, नंतर ती ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी, साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
संपूर्ण देश हा कोरोनाशी लढतो आहे. अशा या युध्दजन्य परिस्थितीमध्ये, आज एप्रिल फुलच्या दिवशी, कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा, चेष्टा करू नये असं आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते म्हणाले..

आज एक एप्रिल दरवर्षी आपण एप्रिल फूलच्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांशी आपल्या मित्रांशी चेष्टा करतो मस्करी करतो पण आज संपूर्ण भारत देश हा कोरोनाशी लढतोय आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये एप्रिल फूल दिवशी आपण कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारची चेष्टा आपण करु नये यासाठी आपण सहकार्य करावे याबाबतीत जर कोणी सहकार्य करणार नाही आणि अफवा जरा पसरेल तर त्याच्यावर सायबर क्राईम माध्यमातून कारवाई करण्यात येईल
दरम्यान, लॉकडाऊनच्या परिस्थितीत, राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब, भुकेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही, गृहमंत्र्यांनी दिली आहे. देशमुख यांनी काल मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या, निवारा छावण्यांना भेट देऊन, स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांना अन्नधान्याचं वाटप केलं.
****
कोविड १९ च्या रुग्णांच्या  विलगीकरणासाठी, आवश्यकता भासल्यास तीन लाखांहून अधिक खाटा तयार असाव्यात, यासाठी २० हजार डबे सज्ज ठेवण्याची तयारी, रेल्वेनं दर्शवली आहे. रेल्वेनं याआधीच पाच हजार रेल्वे डब्यांचं विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याचं काम सुरू केलं आहे. एका डब्यात १६ खाटा, याप्रमाणे ८० हजार खाटांची क्षमता या डब्यांमध्ये आहे. 
****
कोरोना विषाणू बद्दल आणि राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी, अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून, आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे. त्यासाठी एक्क्याण्णव वीस सव्वीस बारा त्र्यॅहत्तर चौरॅण्णव या क्रमांकावर "Hi" असा संदेश पाठवून, अद्ययावत माहिती मिळवता येईल.
****
नोवेल कोरोना विषाणु संसर्गाविरुद्धच्या लढ्यात विविध स्तरांवर सरकारनं उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांचा पुरवठा चालू आहे. त्याच्या वितरणात एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, या सरकारी तेल कंपन्यांनी, पाच लाख रुपये त्याच्या कुटुंबाला द्यायचं जाहीर केलं आहे. शोरुम, गोदाम कर्मचारी, डिलीव्हरी बॉईज आणि मेकॅनिकचा त्यात समावेश आहे. संवेदनशील परिसरात काम करणाऱ्या अडीच लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह, प्रत्येकी १ लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरात काल रात्रीपासून वाहनांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हे मनाई आदेश जारी केले. यानुसार रात्री रात्री बारा वाजेपासून, चौदा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत, सायकल अथवा स्वयंचलित दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहनं, रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. आपत्कालीन सेवा, पोलिस, आरोग्यसेवा, रुग्णसेवा तसंच माध्यम प्रतिनिधींना, या मनाई आदेशातून सूट असेल. मात्र अशा वाहनचालकांनी, आपली ओळखपत्रं तसंच कार्यालयानं दिलेलं पत्र, सोबत बाळगणं आवश्यक आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आता, ड्रोन पेट्रोलिंग सुरू केली आहे. जिल्ह्यातल्या सिल्लोड, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर या उपविभागांच्या माध्यमातून, २३ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागात, ही पेट्रोलिंग करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात १०० टक्के लॉक डाऊन होण्यास मदत होणार असल्याचं, पोलिसांनी सांगितलं.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या, नांदेड शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर, कडक कारवाई करावी, तसंच शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी, बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष, भागवत देवसरकर यांनी केली आहे. भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्यानं, शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचं, त्यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी मेमोरियल शासकीय रुग्णालयास, व्हेन्टिलेटर, मास्क, औषधी आणि आवश्यक सोई सुविधांसाठी, दोन कोटी ९० लाख रूपयांचा निधी काल देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं, यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या रूग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही, चव्हाण यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं, आठवडी बाजार बंद असतांनाही, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
दरम्यान, हिंगोलीत कोरोनाचा दुसरा संशयित आढळला असून, त्याच्या घशातल्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथं तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात संचारबंदीचा भंग करुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहनं जप्त करण्यात येत आहेत. पोलिसांनी काल लातूर इथं तीस दुचाकी आणि दोन चारचाकी ताब्यात घेतल्या. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरच, ही वाहनं परत करण्यार येतील, असं लातूर शहरचे पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी सांगितलं.
****
लॉलडाऊनच्या काळात गरीब, गरजु, कामगार, घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात उमरी व्यापारी महासंघाच्या वतीनं २२० जणांना खिचडी वाटप, नांदेडच्या लॉयन्स क्लबच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालय आणि रेल्वे स्टेशन परिसरात २७० जणांना जेवणाचे डबे, नांदेड इथं गौरव बिल्डर यांच्याकडून ४००  जणांना खिचडी वाटप करण्यात आली. नांदेड शहरात शिक्षण घेत असलेल्या तामिळनाडू राज्यातल्या ४० विद्यार्थ्यांनी काल नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली. या मुलांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या बेघर निवारा गृहात ६० बेघर तसंच प्रवासात अडकून पडलेल्या लोकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही व्यवस्था करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं काल गरजुंना जेवणाची पाकीटं वितरीत करण्यात आली.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं गरजू तसचं मजुरी करणाऱ्या कुटुंबांना श्रीगणपती नागरी सहकारी पतसंस्था आणि राजाभाऊ देशमुख मंडळाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंच्या २ हजार ५०० कीटचं वाटप करण्यात येत आहे. धान्यासह इतर आवश्यक वस्तुंचा या कीटमध्ये समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात लॉकडाऊन दरम्यान एक दिवसाआड बाजरपेठेतली गर्दी काही कमी होत नसल्यानं आमदार मेघना बोर्डीकर यांनी काल बाजरपेठेत भेट दिली. यावेळी प्रशासनाला गर्दी टाळण्यासाठी दररोज चार ठिकाणी भाजी मंडी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाजीविक्रेते आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 
****
कोरोना आजारावर घ्यावयाची खबरदारी, उपाय याबाबत माहिती देण्यासाठी औरंगाबाद इथल्या शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय - घाटी, जिल्हा सामान्य रूग्णालयात महापालिकेच्यावतीनं नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून कोरोना आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
****
लॉकडाऊनमुळे सध्या वाहनांची संख्या कमी झाल्यानं आणि उद्योग बंद असल्याचं शहरांमधलं प्रदूषण कमी झाल्याचं दिसून येत आहे. टाळेबंदीत वाहतूक आणि उद्योगांचं काम हे  महत्त्वाचे प्रदूषण करणारे घटक नसल्याने प्रदूषणाचं प्रमाण कमी झालं  आहे, असे मुंबईच्या आयआयटीएम सफरचे संचालक डॉ. गुफरान बेग यांनी आकाशवाणीला सांगितलं.
****
लॉकडाऊनमुळे लातूर जिल्ह्यात अन्य राज्यातले कामगार अडकून पडले आहेत. जिल्ह्यातले अनेक उद्योग सध्या बंद असले तरीही या सर्व कामगारांची काळजी घेण्याचं आणि त्यांचे पगार वेळीच देण्याचं आश्वासन लातूर जिल्हा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बलदवा यांनी दिलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ८ झाली असून यापैकी एकाला उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
****
कोरोना लॉकडाऊन मुळे राज्यातील बरेचशे मजूर परराज्यात अडकले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि कंधार तालुक्यातील सत्तर मजूर तेलंगणा राज्यात ऊसतोड आणि मिरची तोडण्यासाठी गेले होते. त्यांना जलस्वराज्य परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी शासकीय मदत मिळवून दिली. याबद्दल त्यांनी दिलेली ही माहिती.

सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी ई-मेल द्वारे संपर्क केला अर्धा तासात दार संपर्क तहसीलदार त्यांचा मला फोन आला औषधी अन्नधान्य औषधी कर्मचारी औषधी तहसीलदार डॉक्टर आरोग्य कर्मचारी आरोग्य कर्मचारी पोलिस पोलिस तलाठी ग्रामसेवक सरपंच ग्रामसेवक सरपंच सर्व पोहोचले त्यांनी पंधरा दिवसाच्या अन्नधान्य व औषधी मजुरांना या उपलब्ध करून दिल्या त्यामुळे त्यांचा उपासमारीचा फार मोठा प्रश्न आहे  सुटलेला आहे
****
लॉकडाऊनच्या काळात शेती कामासाठी शेतकरी आणि मजुरांना अटकाव करू नये, तसंच ग्रामीण भागात रात्री सिंगल फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी शासनाकडे केली आहे.
****
जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. विलगीकरण कक्षात आजपर्यंत दाखल ८९ पैकी ८३ रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. या कक्षात सध्या ११ रुग्ण उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नव्यानं तयार करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. हे रुग्णालय तातडीनं कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांना दिल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ इथं जानेवारी महिन्यापासून एका विदेशी नागरिकाला घर भाड्याने देणाऱ्या आणि त्याची माहिती दडवणाऱ्या घरमालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा परदेशी नागरिक इंग्लंड इथून पर्यटन व्हीसावर औरंगाबाद इथं  आला आहे. विदेशी नागरिक घरात भाडेकरू म्हणून राहत असताना ही माहिती दिली नाही आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा या घरमालकाविरूध्द दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित सर्व महाविद्यालयातल्या प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं आवाहन कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केलं आहे. या संदर्भात संलग्नित सर्व महाविद्यालयांना कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी परिपत्रक पाठवलं आहे.
****
सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसल्याची तक्रार विरोधी पक्षातून होत होती. काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती.
****
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राला काल सकाळी लागलेली आग, दीड ते दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आलं. या आगीमध्ये महत्त्वाची अनेक कागदपत्रं तसंच संगणक आदी साहित्याचं मोठं नुकसान झालं. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या रजापूर, ढोरकीन इथं काल मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. जालना शहरासह परिसरातल्या नागेवाडी, इंदेवाडी, जामवाडी, गोंदेगाव, वंजारउम्रद, तांदुळवाडी, विरेगाव, रामनगर, या भागात काल दुपारी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकांसह फळबागांचं नुकसान झालं.
****
औरंगाबाद इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागातले उपअभियंता श्रीराम बिरारे याला एक लाख रुपयाची लाच घेताना काल पकडण्यात आलं. हर्सुल कारागृहात केलेल्या बांधकामाचं प्रलंबित बील मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या सरपंच प्रज्ञा कांबळे यांच्यासह त्यांचे पती दयानंद कांबळे आणि ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. शौचालयाच्या कामाचं बील काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. 
****

No comments: