Monday, 20 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२० एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत आजपासून काही प्रमाणात व्यवहार सुरू; मात्र, जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Ø कुठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायअसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Ø राज्यात काल सर्वाधिक ५५२ कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. १९ रूग्णांचा मृत्यू
Ø औरंगाबादमध्ये आणखी दोन जणांचा अहवाल सकारात्मक; लातूर जिल्हा कोरोना विषाणू मुक्त
आणि
Ø कोरोना विषाणू विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
****

 राज्यात आजपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरू केले जाणार आहेत. मात्र, जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावर राज्यातल्या जनतेशी संवाद साधला, ते म्हणाले, 

 खास करून ग्रीन झोनमध्ये आणि आँरेज झोनमध्ये आपण माफक स्वरूपामध्ये उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत. तुम्ही तुमच्या मजुरांची, कर्मचाऱ्यांची काळजी  त्या आवारात घेत असाल. आम्ही धान्य पुरवठा करू तुमचं रॉ मटेरियल येईल. सगळी कामं तुम्ही करा. मजुरांची ये - जा होता कामा नये. कृषी याच्यात पहिलेही बंधन नव्हतं आताही राहणार नाही. जीवनावश्यक वस्तू त्यांचा पुरवठा, उत्पादन याच्यात कुठेही रूकावट येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडत नाही आहोत. फक्त माल वाहतूक होत राहिल आपण तर घरातचं रहायचं आहे.

 नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावं, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप-सर्दीसारखी लक्षणं दिसली, तर लगेच फीव्हर क्लिनिकमध्ये दाखवावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बऱ्याच वेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी काही जणांचे मृत्यू झालेले आहेत. अशांसाठी आपण इच्छा असूनही काही करू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 टाळेबंदीच्या कालावधीत महिलांवर घरात अथवा बाहेर अत्याचार होत असतील, तर १०० या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. याशिवाय मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी १८०० १२० ८२ ००५० या क्रमांकावर संपर्क साधावा, तसंच आदिवासी विकास विभागाअंतर्गत १८०० १० २४० ४० या मदत वाहिनीवर संपर्क साधावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील परंतु घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुंबई, पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल, असं ते म्हणाले.
****

 देशात सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना - मनरेगासह, कृषी, औद्योगिक, उत्पादन, आणि बांधकाम व्यवसायाअंतर्गत सुरहोणाऱ्या कामांमध्ये सहभागी करून घेताना, त्यांची ये-जा करण्यासंदर्भात, केंद्रीय गृहमंत्रालयानं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार या मजुरांची केवळ ते आहेत, त्या राज्यांतर्गतच ये - जा होऊ शकते, त्यांना राज्यांची सीमा ओलांडायची परवानगी नसेल, कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी या मजुरांची तपासणी केल्यानंतर आजाराची कोणतीही लक्षणं नसलेल्या मजुरांनांच कामावर जाता येईल, या मजुरांच्या प्रवासासाठीच्या बसचं निर्जंतुकीकरण करणं, बसमध्ये सामाजिक सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल, प्रवासादरम्यान मजुरांच्या खाण्या आणि पाण्याची सोय स्थानिक प्राधिकरणांना करावी लागणार आहे, असं गृह मंत्रालयानं सूचित केलं आहे. 
****

 कोविड१९  आजाराची लागण कोणताही धर्म, पंथ, रंग, जात, भाषा पाहत नाही. कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. अशावेळी भारतीयांनी एकता आणि बंधुत्वाची तत्व जपायला हवीत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात कामं करण्याची पद्धत बदलू लागली आहे, अशावेळी सळ्यांना सहज अवलंबंता येईल असं जीवनमान आणि व्यावसायिक कामाचं स्वरुप विकसित करणं ही काळाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****

 कुठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या फवारणीची शिफारस केली नसल्याचं मंत्रालयानं काल स्पष्ट केलं आहे.
****

 राज्यात काल सर्वाधिक ५५२ कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या चार हजार दोनशे एवढी झाली आहे. काल दिवसभरात १९ रूग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेणाऱ्या ५०७ रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या चाचण्या, रूग्णांची शोध मोहीम आणि नैसर्गिक प्रसाराच्या कारणांमुळे रूग्ण संख्या वाढल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं.
****

 औरंगाबाद शहरात काल दोन जणांचा कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आला. यामध्ये समतानगर भागात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय व्यक्तीला तसंच आरेफ कॉलनीतल्या एका ५५ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. यामुळे आता औरंगाबादेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३झाली आहे.

 दरम्यान, औरंगाबाद इथले पाच कोरोनाबाधित रुग्ण काल कोरोना विषाणू मुक्त झाले. चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा अहवाल काल नकारात्मक आला. या पाच जणांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं.

 मुंबईहून औरंगाबादेत येऊन प्रसूत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या नवजात मुलीचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी शनिवारी या महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली होती.
****

 आतापर्यंत औरंगाबाद इथले आठ जण यशस्वी उपचार करून कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात १९ रूग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
****

 जालन्याच्या जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल दहा कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण दाखल झाले. दोन दिवसांत भरती झालेल्या १७ रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. या तरुणाचा मृत्यू डेंग्यू सदृश्य आजारामुळे झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली.
****

 नाशिक शहरात उपचार सुरु असलेला एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. गोविंदनगर भागातला हा रुग्ण आग्र्याहून परतल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. काल मालेगावमधल्या आठ रूग्णांचे अहवाल सकारात्मक आले, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ९९ इतकी झाली आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल काल सकारात्मक आला. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला नसल्यानं, त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.
****

 सोलापूर शहरात ६९ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा काल मृत्यू झाला. ७० फूट मार्ग परिसरातल्या या महिलेच्या मृत्यूनंतर हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या वाढत आहे.
****

 पालघर जिल्ह्यात काल दोन नवे कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात ९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
****

 अकोला जिल्ह्यात एका सतरा वर्षीय मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांना या विषाणूची लागण झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
****

 जळगाव जिल्ह्यात एका ६० वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा दोन दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूमुक्त झाला होता. याआधी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण होते, त्यापैकी एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला, तर एकाचं निधन झालं होतं.
****

 सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आणखी २ तर जावली तालुक्यात एक १७ वर्षीय  कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला आहे.


 सांगलीत मिरज  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना विषाणू बाधित रूग्णाचं निधन झालं. 
****

 कोल्हापूर शहरात काल कोरोना विषाणूचा आणखी एक रूग्ण सापडला आहे. मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या कंटेनर चालकाचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या सात झाली आहे.
****

 यवतमाळ इथं दोन जणांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल सकारात्मक आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
****

 लातूर शहरातल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना विषाणू बाधित उपचार घेणारे परराज्यातले आठ रूग्णांचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे हा जिल्हा कोरोना विषाणू मुक्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रूग्ण आढळून आला नाही. यामुळे आजपासून या जिल्ह्याला टाळेबंदीच्या काही नियमात सवलत मिळणार असल्याचं पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे. मात्र जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 देशासह राज्यात  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी शासन तसंच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या लढाईला जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं असून सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल देशमुख यांनी, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

 रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

 माज माध्यमांवर अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात येत असल्याचं सांगताना ते म्हणाले.

 आफवा पसरवण्याचे काम आणि खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुद्धा सोशियल मिडियाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी केले त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं काम या निमित्ताने यंत्रनेच्या माध्यमातंन झाली आहे.  की समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे हे जे आहेत किंवा अफवा पसरून एकमेकांपासून वातावरण खराब करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात.

 गृहमंत्र्यांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना तसंच कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेऊन, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****

 दरम्यान, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं काल गृहमंत्र्यांकडे केली.  बँकेकडून आणि वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करून व्याजदर कमी करावा, वीज देयकात ५० टक्के सूट द्यावी, यासह अन्य मागण्या महासंघानं दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****

 औरंगाबाद शहरात टाळेबंदी अधिक कडकपणे अंमलबजावणी करण्यात येत असून वैद्यकीय सेवा आणि परवानगी देण्यात आलेल्या सेवा वगळता अन्य सर्व प्रकारच्या आस्थापना दुपारी दीड वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केले आहेत.
****

 परभणी शहरात गेल्या तीन दिवसांपासून लागू असलेली संचारबंदी आज सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत शिथिल करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं. याकाळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी करता येईल.
****

 जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं औरंगाबाद मधल्या झोपडपट्टी भागात कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. शहरातल्या किराडपुरा भागामध्ये काल जनजागृती करण्यात आली. यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी नागरिकांना टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं.
****

 परभणी शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडला त्या भागात औषध फवारणी आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. शहरातल्या सर्व नागरिकांनी आपल्या घरातच राहून सहकार्य करावं आवश्यक असल्यासच बाहेर पडावं असं आवाहन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी केलं आहे.
****

 नांदेड इथले सेवानिवृत सहकार अधिकारी एम. डी. नल्लावार यांनी काल कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांच्या निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्याकडे सुपूर्द केले.
****

 परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वतीनं गरजुंना  जिवनावश्यक वस्तु, अन्नधान्याच्या कीटचं काल वाटप करण्यात आलं. आमदार सुरेश देशमुख यांनीही शहरातल्या गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप केलं. 
****

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं ए.टी.एम. व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना  बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार म्हणाले,

 शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन .टी.एम. व्हॅनची सेवा देत आहे. कुठल्याही  बँकेचे एटीएम कार्ड या मोबाईल वेटिंग वर चालतं याशिवाय निराधरांचे पेमेन्ट त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन करण्याचं काम मायक्रो ए.टी.एम आणि  मोबाईल .टी.एम. व्हॅन द्धारे केलं जात. काही गाव लॉकडाऊन आहेत, कुठल्याही बिसीसी बँकेला तुम्ही जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती मध्ये ज्या दूसऱ्या गावच्या त्या बँचला अट्याचं गावांमध्ये जाऊन राहिलेला पिक विमा त्यांच काम पण या मोबाईल .टी.एम. व्हॅनद्धारे चालू आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी विनंत करतो.
****

 जालना शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिकेनं दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालिकेच्या पथकानं दहा जणांवर कारवाई करत प्रत्येकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचं मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितलं. उस्मानाबादमध्येही अशाच प्रकारे ४३ नागरिकांकडून १६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितलं.
****

 जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठीचे विशेष रुग्णालय, विलगीकरण कक्षासह शासकीय कार्यालयांमध्ये काल सोडियम हायड्रोक्लोरिनची फवारणी करण्यात आली. जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी इथल्या ग्रामसेविका अनन्या भालके यांनी गावात स्वत: ट्रॅक्टर चालवत निर्जंतुकीकरण फवारणी केली. या गावातल्या एक हजार ७८ नागरिकांचं सर्वेक्षणही वैद्यकीय पथकानी पूर्ण केलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आखाडा बाळापूर इथं जिल्हा मध्यवर्ती बँक उघडण्याआधीच नागरिक रांगा लावत आहेत. यामुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल धूरमुक्त असलेल्या गुळहळ्ळी गावात सरपंच मिरा घोडके यांच्या हस्ते ११५ कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे सिलेडर्स
मोफत वाटप करण्यात आले.
****

 टाळेबंदीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार विविध स्तरावर जनतेला मदत करीत आहे. सरकारच्या या मदतीबाबत उस्मानाबाद जिल्ह्यात समाधान व्यक्त केलं जात आहे.

मेरा नाम शान नवाब शोदागर है. मैं उस्मानाबाद का रहनेवाला हू. आणि लॉकडाऊन ज्या सिजन मै गरीब की बहोत हाल हो रहे है. मोफत जावल मिले हे.  केंद्रसरकारच्या मै दिल से आभार मानतो हू.

माझे नाव दत्तू नरसिंग पूरी. प्रधानमंत्री मेडिकल या योजनेच्या माध्यमातून मला 20 किलो तांदूळ मोफत मिळालेला आहे. त्या तांदळाचा उपयोग मला या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये चांगल्याप्रकारे झालेला आहे.

मी तेजस्वी देशमुख राहणार उस्मानाबाद इथली आहे. मला १५ किलो तांदूळ मोफत मिळाले आहे. आणि उज्ज्वला योजनेतील सिंलेडर पण मोफत मिळाले आहे. ५०० रूपये जन-धन योजनेतून मिळालेले आहेत. असल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये येवढा लाभ मिळाल्या बद्दल मी सरकारचे मनापासून आभारी आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं राबवण्यात येत असलेल्या शिवभोजन योजनेचा अनेक गरजू आणि गरिबांना लाभ मिळत आहे. टाळेबंदी दरम्यान पाच रुपयात संपूर्ण जेवण देण्याची सुविधा या योजनेत करण्यात आली आहे, मात्र माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर हे स्वखर्चातून गरजूंना जेवण देत आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत या केंद्रावर सर्वांना मोफत जेवण दिलं जात आहे.
****

 रास्त भाव दुकानातून अन्नधान्याचं वाटप झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या रास्तभाव दुकानाच्या बाहेर आणि ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याच्या सूचना लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. याद्या प्रसिद्ध केल्यामुळे प्रत्यक्षात किती धान्य आलं आणि त्याचं वाटप कोणाला झालं याचा तपशील राहील, त्यामुळे काळाबाजार होणार नाही आणि कुठलीही माहिती दडपण्याचे प्रकार होणार नाहीत, असं देशमुख यांनी स्पष्ट केल आहे.

 दरम्यान, उस्मानाबाद शहरात मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही वेळ गाराही पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 नांदेड तालुक्यातल्या बाभुळगाव इथं स्वस्त धान्य दुकानातून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ काल आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते झाला. गावातले अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी तसंच केशरी रेशन कार्डधारक आणि शेतकरी, शेतमजूर यांना धान्य कमी पडणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना आमदार हंबर्डे यांनी स्वस्त धान्य दुकानदारास केली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या दाती गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इतर गावातल्या कोणासही गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत असलेल्यांनीही गावात प्रवेश करू नये, असे सूचना फलक लावून गावात बाहेरून येणाऱ्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या आडगाव बाजार इथल्या वासुदेव समाजावर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष देन मदत करण्याची मागणी या समाजातल्या नागरिकांनी केली आहे.
****

 रबी पिकाच्या काढणीचा हंगाम सध्या सुरू असून हे काम करणारे शेतमजुर यावर्षी पैशाऐवजी धान्याच्या स्वरूपात कामाचा मोबदला मागत आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या ज्वारी काढणी सुरू आहे. यासंदर्भात माहिती देतांना अर्धापूर तालुक्यातल्या पार्डी गावचे शेतकरी नामदेवराव देशमुख म्हणाले.

 सध्या शेतीची कामे चालू आहेत. खळे संपली नाही तर ज्वारीचे खळे चालू आहेत. हळदी काढणी चालू आहे, बाहेरील मजूर आलेले आहेत, त्याच्या हाताने चालू आहेत.  सद्या त्यांची मागणी अशी आहे की, आम्हाला पैसे या वर्षी नको आहे. धान्याच्या रूपात आम्ही गुहू, ज्वारी, या स्वरूपात कामे करून घ्या.

 यवतमाळ जिल्ह्यातला शेत मजुर लखन सध्या अर्धापूर तालुक्यात गहू, ज्वारी काढणीची कामं करत आहे. शेतात काम करुन वर्षभर पुरेल एवढं धान्य जमा करणार असल्याचा संकल्प त्यानं केला आहे. तो म्हणाला,
 माझं नाव लखन आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातून इथं काम करण्यासाठी आलेलो आहोत.  पहिला आम्ही गव्हाची खळी केलीत. आता ज्वारीची खळी चालू आहेत आमची. आता ज्वारीची खळी खोदण चालू आहे सर्व. याचा नंतर आम्ही ज्वारीचं आणि गहू होऊन जाणार आहे. कारण की आम्हाला पैस्यांपेक्षा ज्वारी आणि गहू हा महत्त्वाचा आहे. पैस्यांपेखा धान्यालाचं महत्त्व जास्त आहे आम्हाला.
****

 लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या कारेपूर, यशवंतवाडी, तळणी आदी परिसरात काल पहाटे गारांचा अवकाळी पाऊस झाल्यानं रब्बी पिकं, फळबागा तसंच भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. जिल्हा प्रशासनानं या  नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी केली आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या तल्लारी - झळकवाडी जंगला लगत असलेल्या शेतात काल एका बिबट्याचा मृतदेह आढळला. याच परिसरात तीन दिवसांपूर्वीही एका बिबट्याचा मृतदेह सापडला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन  केल्यानंतर बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
****

 लातूर शहरातल्या औसा रोडवरच्या प्रिया नावेल्टी या भेट वस्तुंच्या दुकानाला काल शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आग लागल्यानंतर दुकानाच्या समोरच्या विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्यानं सूर्यनारायण मंगल कार्यालयाच्या जिन्यालाही आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबाने काही वेळानंतर आग आटोक्यात आणली.
*****
***

No comments: