Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०१ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी
औषधांचा तुटवडा अजिबात भासणार नाही असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं नमूद केलं
आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाल्यापासूनच देशातल्या औषधनिर्मितीवर
सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं, तसंच लॉक डाऊनच्या काळातही औषधं आणि वैद्यकीय
उपकरणांची निर्मिती विनाअडथळा कशी सुरू राहील याचीही काळजी घेत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची
उपलब्धता, वितरण आणि पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याकडेही केंद्र सरकारचे इतर संबंधित विभाग,
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यानं कटाक्षानं लक्ष ठेवून असल्याचंही आरोग्य
विभागानं स्पष्टं केलं आहे. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी, मालवाहतूक आणि इतर
संबंधित सुविधांमध्ये समन्वय राखण्याकरता, मंत्रालयानं केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारला
असून केंद्रीय औषध मूल्य नियामक प्राधिकरणानं हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे. १८००
११ १२ ५५ हा हेल्पलाईन क्रमांक जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे.
****
भारतीय स्टेट बँकेचे दोन
लाख ५६ हजार कर्मचारी आपलं दोन दिवसांचं वेतन पंतप्रधान मदत निधीला देणार आहेत, कोरोना
विषाणूशी लढण्यासाठी मदत म्हणून हा निधी वापरला जाणार आहे, मदतीचा हा आकडा जवळपास १००
कोटी रूपये असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय हॉकी संघटनेनंही पंतप्रधान
मदत निधीत २५ लाख रुपये मदत दिली आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती
योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण
११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी ही माहिती दिली. काल मंगळवारपर्यंत जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख
४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार ४०७ कोटी १३ लाख जमा करण्यात आले. तर,
व्यापारी बँकांच्या माध्यमातून आठ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार
५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर अकोला टपाल विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक आणि ज्या कुटुंबात तरूण नाहीत
अशा कुटुंबांना पोस्ट ऑफिसमार्फत बँकांची सेवा प्रदान केली जाणार आहे. राष्ट्रीयकृत
बँकेमध्ये ज्यांची खाती आहेत त्यांना दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम स्वतः पोस्टमन
काढून देतील असं टपाल विभागाने सांगितलं आहे. संबंधित ग्राहकांना टपाल खात्याच्याही
विविध सेवा आणि किराणामाल आणून देण्याची सेवाही दिली जाणार आहे. या सेवा अकोला आणि
वाशिम या दोन्ही जिल्ह्यात पुरवल्या जाणार असल्याची माहिती, अकोला इथल्या प्रवर अधीक्षकांनी
दिली आहे.
****
कोल्हापूर इथलं छत्रपती प्रमिला
राजे शासकीय रुग्णालय आजपासून फक्त कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. या
रुग्णालयातले अन्य आजारांचे रुग्ण कोल्हापूर शहरातल्या २४ खाजगी रुग्णालयात स्थलांतरित
करण्यात आले आहेत, याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रियांसह सर्व औषध उपचार मोफत करण्यात
येणार आहेत.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या
हातकणंगले तालुक्यातल्या नरंदे इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक
संतोष डिग्रजे यांनी काल कारखान्यावरचे ऊस तोडणी मजूर आणि इतर कर्मचाऱ्यांना पत्र देऊन
त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली, यामुळे त्यांच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा
दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. त्याआधारे डिग्रजे यांच्याविरोधात
हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र
पाटील यड्रावकर सध्या या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, संचार बंदीचा आदेश झुगारून देत सामुहिक नमाज पठण करत असल्याबद्दल
कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं जणांविरुद्ध गावभाग पोलिस ठाण्यात काल गुन्हा
नोंदवण्यात आला. हे नागरिक दोन ठिकाणी एकत्र जमून नमाज पठण करत असल्याबद्दल पोलिसांनी
ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
नांदेड जिल्ह्यात हातावर पोट असलेले बाहेरच्या राज्यातले अनेक कुटुंब अडकून पडले आहेत.
गरीब मजूर, तसंच रस्त्यावर पाल टाकून राहत असलेल्या निराश्रितांना आधार देण्यासाठी
भोकर तालुक्यातलं व्यापारी मंडळ, सावली प्रतिष्ठान, सेवा समर्पण यासारख्या अनेक सेवाभावी
संस्था पुढे आल्या आहेत.
माहूर इथल्या रेणूकादेवी
संस्थाननं देखील आपली मदत किराणा मालाच्या स्वरूपात दिली. ६२ निराधार कुटुंबांना या
मदतीचं वाटप काल भोकरचे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
अमरावतीच्या खासदार नवनीत
राणा यांनी आपल्या खासदार निधीतून केंद्र सरकारला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
एक कोटी रूपयांची मदत आणि आपलं एक महिन्याचं वेतन दिल आहे.
****
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बसलेल्या
भाजीपाला विक्रेत्यांना महानगर पालिकेच्या आधिकाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला
विकण्याचे निर्देश दिले. नागरिकही याचं पालन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे..
****
No comments:
Post a Comment