Wednesday, 1 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

प्रसिद्ध गुजराथी लेखक पद्मश्री तारक मेहता यांचं आज अहमदाबाद इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या चित्रलेखा या गुजराथी साप्ताहिकातून मार्च १९७१ मध्ये स्तंभलेखक म्हणून तारक मेहता यांचा लेखनप्रवास सुरू झाला. मुंबईत माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत चित्रपट विभागासाठी त्यांनी संहितालेखक म्हणून काम केले. मेहता यांची ८० पेक्षा अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 'दुनिया ने उंधा चश्मा' या त्यांच्या लोकप्रिय गुजराथी स्तंभावर बेतलेली दूरचित्रवाणी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' दर्शकांमध्ये लोकप्रिय आहे. साहित्य क्षेत्रात मेहता यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं होतं.

****

शिवसेनेनं राज्यसरकारचा पाठिंबा काढल्यास विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. मात्र शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता अगदी कमी असल्याचंही या पक्षानं म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून सत्तेत सहभागी असूनही विरोधकांप्रमाणे वागणाऱ्या शिवसेनेनं आता सत्तेतून बाहेर पडायला हवं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, अविश्वास ठराव आणण्यासह इतरही सर्व पर्याय आपल्या पक्षासाठी खुले असल्याचं, काँग्रेसचे नेते मोहंमद आरीफ नसीम खान, यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कॉंग्रेस पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी, या तटकरे यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर खान बोलत होते

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत, राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये, राज्यसरकारला या नागरी संस्थेवर देखरेख ठेवण्याचा आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचा अधिकार आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीमध्ये रस्ते बांधणीच्या कामात बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे प्रतिपादन केलं. सरकारकडून या पालिकेला काही निधी मिळतो का आणि किती निधी खर्च झाला यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सरकारकडे आहे का, याबाबत सरकारनं अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

वैद्यकीय गरज नसतानाही, अनेक महिलांवर गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारांना नोटिस बजावल्या आहेत. कर्नाटकमधल्या कलबुर्गी जिल्ह्यात तसंच महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा भागात मोठ्या प्रमाणात या शस्त्रक्रिया होत असल्याच्या, माध्यमांच्या अहवालाची स्वतःहून दखल घेत, आयोगानं या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना येत्या चार आठवड्यात उत्तर द्यावं, असं आयोगानं या राज्यांना सांगितलं आहे. या भागातली रूग्णालयं आणि डॉक्टर्स, या शस्त्रक्रिया निष्काळजीपणे करत असून, यामुळे या गरीब महिलांच्या जीवनाच्या आणि वैद्यकीय काळजी घेतली जाण्याच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारनं २०१५ मध्ये एक समिती स्थापन केली होती, मात्र अहवाल मिळाल्यानंतरही काहीही कार्यवाही केली नाही, असंही आयोगानं म्हटलं आहे.

****

२०२२ पर्यंत भारताला “मोतीबिंदू-मुक्त” करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सातशे छपन्न कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून येत्या पाच वर्षांत सुमारे सात कोटी मोतीबिंदू रुग्णांवर उपचार करण्यात येतील. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनीही आपल्या ट्विटमध्ये हे नमूद केलं आहे. या योजनेनुसार, मोती बिंदूच्या प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच, या शस्त्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या रूग्ण, डॉक्टर्स आणि इतर सर्व घटकांमध्ये सुसंवाद राहण्याच्या दृष्टीनं एक मोबाईल ॲपही विकसित केलं जाणार आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेचाच हा एक भाग असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. ही यात्रा २९ जूनला सुरू होऊन,  ७ ऑगस्ट ला पूर्ण होणार आहे. यासंदर्भातली सगळी माहिती डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्रीअमरनाथजी श्राईन डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

//****//

No comments: