Monday, 6 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 06.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत प्रारंभ झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी, तसंच मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ कमी करण्यासाठी अनेक योजना राबवल्या असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली असून, ही एक लोकचळवळ बनली असल्याचं ते म्हणाले. आधार कार्ड जोडणी सर्व क्षेत्रात सुरु करुन डिजिटल व्यवहाराला चालना देणारं, महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं ते म्हणाले. राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार आहे. या अधिवेशनात २३ प्रस्तावित तर तीन प्रलंबित विधेयकं सादर होतील. सात एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

****

भारतीय स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवणाऱ्या तसंच वापरात नसलेल्या खात्यांवर आता शुल्क द्यावं लागणार आहे. एक एप्रिलपासून ही आकारणी करण्यात येणार असून, एटीएमच्या वापरावर तसंच बॅंकांमधील व्यवहारांवरही शुल्क आकारणी करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. यानुसार खातेदारांना एका महिन्यात केवळ तीन वेळा विनाशुल्क पैसे भरता येणार असून, त्यापुढच्या व्यवहारांवर ५० रुपये अधिक सेवाकर भरावा लागणार आहे. खात्यामध्ये किमान रक्कम न ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांच्या शहरानुसार शुल्क आकारणी होणार असून, ग्रामीण भागासाठी कमी दर आकारण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जगातली सर्वाधिक काळ सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका आय एन एस विराट आज नौदलातून निवृत्त होत आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थित मुंबईत या युद्धनौकेला समारंभपूर्वक निरोप दिला जाणार आहे. १९८७ मध्ये आय एन एस विराट नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यापूर्वी ती ब्रिटनच्या नौदलात कार्यरत होती. ब्रिटनच्या नौदलातून ती निवृत्त झाल्यानंतर भारतानं ती विकत घेतली होती.

****

भारतीयांवर अमेरिकेत होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताचे अमेरिकेतले राजदूत नवतेज सरना यांनी अमेरिकेच्या प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्याची तसंच भारतीय समुदायाचं संरक्षण करण्याची गरज त्यांनी ट्विटरवरील संदेशात व्यक्त केली. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं दिल्याचं सरना यांनी सांगितलं.

****

संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांच्या संवर्धनाला केंद्र सरकारतर्फे प्राधान्य देण्यात येत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. रामटेक इथल्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेखाली मंत्रालयातर्फे अंकीय प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असून, राष्ट्रीय शैक्षणिक अभिलेख संकलन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर बनावट वा अयोग्य कागदपत्रांची समस्या राहणार नाही, असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.

****

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

****

बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, याच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या दोन ठिकाणच्या स्थावर मालमत्तेचा, उद्या बँकेतर्फे जाहीर लिलाव होणार आहे. यात मुंबईतलं किंगफिशर हाऊस आणि गोव्यातल्या किंगफिशर व्हिलाचा समावेश आहे. या आधीही या दोन्ही मालमत्तांचा लिलाव झाला होता, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं आता त्यांच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. ९०० निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आणखी ५५० कर्मचारी नियुक्त करणार असल्याचं ते म्हणाले.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आजच्या तिसऱ्या दिवशी, भारतीय गोलंदाज रविंद्र जडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर संपुष्टात आला. जडेजानं सहा, रविचंद्रन अश्विननं दोन तर इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा एक बाद ६५ धावा झाल्या होत्या.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...