Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 6 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत
प्रारंभ झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं
अधिवेशनाची सुरूवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यानंतर त्यांनी चार अध्यादेश आणि तीन शासकीय विधेयकं मांडली. विधानसभेतल्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला अनुमोदन दिलं.
दरम्यान, राज्य विधान परिषदेचं कामकाज कागदरहित करण्यात येणार असून, सदस्यांना टॅबलेट देण्यात येणार असल्याचं, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. या टॅबलेटच्या माध्यमातून सर्व सदस्य तारांकीत प्रश्न, समितीचे अहवाल पाहू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाकडे, ही एक वाटचाल असल्याचं निंबाळकर म्हणाले.
****
राज्याच्या सीमा भागात
अवैधरीत्या गर्भपात करुन, स्त्री
भ्रूण हत्या करणाऱ्या वैद्यांचा शोध घेण्यासाठी, राज्य सरकार
कर्नाटक सरकारसोबत संयुक्त मोहिम राबवणार
आहे. आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी
बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या
म्हैसाळ गावात, एका रुग्णालयाच्या परिसरात १९ मृत अर्भकं सापडल्यानंतर, सीमेपलिकडे अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
म्हैसाळ इथं गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, त्याठिकाणी
अवैध गर्भपात होत असल्याचं समोर आलं. या प्रकरणातला
आरोपी डॉक्टर फरार असून, त्याचा शोध पोलिस
यंत्रणा घेत आहे.
****
विमुद्रीकरणामध्ये
बंदी घालण्यात आलेलं चलन भारतीय रिझर्व्ह बँक नियमानुसार जमा करून घेत नसल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली
आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली असून, बंद करण्यात आलेलं हे चलन ३१ मार्चपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक जमा करून घेईल, असं सरकारनं जाहीर
केलं होतं. मात्र प्रत्यक्षात बँक हे चलन जमा करून घेत नसल्याची तक्रार, या याचिकेत करण्यात आली आहे. यावर न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला
आपलं म्हणणं दाखल करण्यास सांगितलं आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र - दहावीच्या परीक्षेला उद्यापासून
सुरूवात होत आहे. यंदा या परीक्षेला राज्यातल्या २१ हजार सहाशे शहाऐंशी शाळांमधून, १७
लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी बसले आहेत. यासाठी चार हजार सातशे अठ्ठावीस परीक्षा
केंद्र निश्चित करण्यात आले असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे
यांनी, आज पुणे इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. परीक्षा काळात
गैरव्यवहार रोखण्यासाठी २५० भरारी पथकं नेमण्यात आल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली, त्याचा
पोलिसाच्या सायबर विभागामार्फत तपास सुरू असून यापुढे अशा बाबतीत परीक्षा केंद्रांवर उशिरा
येणाऱ्या विद्यार्थ्यांवरही
नजर ठेवली जाणार असल्याचं म्हामणे
यांनी सांगितलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसरा दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात चार गडी बाद
२१३ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ७९ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे शहात्तर धावांवर संपुष्टात आला असून, सध्या भारत १२६ धावांनी आघाडीवर आहे.
****
पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर इथं झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं प्रथम क्रमांक पटकावला. आज झालेल्या अंतिम फेरीत नांदेड विद्यापीठाच्या संघानं मुंबई विद्यापीठाच्या संघाचा दोन गुणांनी पराभव केला. नांदेड संघानं सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
संशोधनासाठी गणित हा विषय महत्वाचा असल्याचं, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात
आयोजित, आंतरराष्ट्रीय गणित परिषदेचं उद्घाटन
आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत, देश विदेशातले जवळपास २७० प्रतिनिधी सहभागी झाले
आहेत.
यावेळी दक्षिण कोरियाचे डॉक्टर जे.एम.किम यांनी, ही परिषद गणितातल्या संशोधनासाठी भविष्यकाळात अत्यंत
महत्वाची आणि उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते, मराठवाड्यातल्या बालाघाट मॅथेमॅटीक
सोसायटीचे जेष्ठ सदस्य बी सी ढगे आणि जे एन साळुंके यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेच्या निमित्तानं आलेल्या शोध
निबंधाच्या स्मरणिकेचं प्रकाशनही
यावेळी करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment