Monday, 20 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चार पुरवणी विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. नुकसान-भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासीत वस्तू सेवा कर, आणि एकात्मिक वस्तू सेवा कर अशी ही विधेयकं आहेत. ही धन विधेयकं संसदेसमोर संमतीसाठी सादर होतील. संसदेच्या मंजुरीनंतर प्रत्येक राज्य विधिमंडळात ही विधेयकं सादर होतील.

****

शिक्षण संस्थांमध्ये आवश्यकता असल्यास, ६५ वर्षे वयानंतरही शिक्षकांची पाच वर्षासाठी करारावर नेमणूक करता येईल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. लोकसभेत त्यांनी ही माहिती दिली. पद रिक्त असेल आणि शिक्षक शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच ही नियुक्ती केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

कर्णबधीरांसाठी तयार करण्यात आलेल्या चिन्हांकित भाषेला जगभरात मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीदिव्यांग सबलीकरण विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. या परिषदेच्या माध्यमातून चिन्हांकित भाषा प्रमाणित करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले.      

****

णिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी विश्वासमत ठराव जिंकला आहे. ३२ आमदारांनी बिरेन सिंग यांच्या बाजुने मतदान केलं. काँग्रेस वगळता इतर पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपनं सत्ता स्थापन केली आहे.   

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १२६व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं आज आढावा घेतला. कुपरेज गार्डन इथल्या आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्राँझची छत्री बसविण्यासंदर्भात तसंच इतर सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या. इंदू मिल जागेवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम येत्या दोन महिन्यात सुरू होणार असून, येत्या काही दिवसात या जागेचं हस्तांतरण पत्र राज्य शासनाला मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

चिमण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहरातल्या वन कर्मचारी वसाहतीसह नागपूरचं सेमिनरी हिल्स, मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूरचं रामबाग वन वसाहत इथं हे कृत्रिम प्रजनन केंद्र उभारलं जाणार आहे. आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसविणं, कोनाडे तसंच वळचणी उपलब्ध करणं, खाद्य उपलब्ध करणं आदी उपाययोजना या अंतर्गत करण्यात येणार आहेत.

****

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नाराणगावकर जीवनगौरव पुरस्कार राधाबाई खोडे- नाशिककर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वाशी इथं उद्या प्रदान करण्यात येणार आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर इथं आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांची पालकमंत्री संभाजीपाटील निलंगेकर यांनी भेट घेऊन, निवेदन स्विकारलं. डॉक्टरांच्या सरंक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं भगवानराव देशमुख आणि प्रभाकर मांगुळकर यांच्या स्मरणार्थ मोफत कॅन्सर निदान आणि जनजागृती मोहीमचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या एक आणि दोन एप्रिल रोजी रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत लाईफ केयर हॉस्पिटल, उदगीर इथं कॅन्सर संबंधी सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष पदांसाठी उद्या निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

****

पैठण इथं सुरू असलेल्या नाथषष्ठी महोत्सवाची आज सांगता होत आहे. सायंकाळी नाथमंदिरात नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्याहस्ते दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वितरित केला जाईल. या तीन दिवसीय महोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झाले आहेत.

****

भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत रांची इथला सामना अनिर्णित राहिला. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियानं कालच्या दोन बाद २३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांना बाद करण्यास भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. मालिकेत द्विशतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****

No comments: