Tuesday, 21 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 21.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      वस्तू आणि सेवा कराच्या चार पुरवणी विधेयकांना, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांचं रजा आंदोलन

·      राज्यातल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी आज निवडणूक

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरूद्धचा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित

****

वस्तू आणि सेवा कर - जी एस टीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चार पुरवणी विधेयकांना, केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. नुकसान-भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासीत वस्तू सेवा कर आणि एकात्मिक वस्तू सेवा कर अशी ही विधेयकं आहेत. ही वित्त विधेयकं संसदेसमोर संमतीसाठी सादर होतील. संसदेच्या मंजुरीनंतर प्रत्येक राज्य विधिमंडळात ही विधेयकं सादर केली जातील.

****

शेतकरी कर्ज मुक्तीचा मुद्दा संसदेत काल पुन्हा उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत शून्य प्रहरात खासदार रजनी पाटील यांनी शेतकरी कर्ज मुक्तीची मागणी केली. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानीपासून बचावासाठी विमा संरक्षण असावं, असं खासदार पाटील म्हणाल्या.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात किल्ले रायगडसह महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचा, जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची ग्वाही दिली.

****

निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ काल राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांनी रजा आंदोलन केलं. धुळे, नाशिक, सायन पाठोपाठ रविवारी रात्री औरंगाबाद इथंही निवासी डॉक्टरवर हल्ल्याची घटना घडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात रुग्ण व्यवस्था विस्कळीत झाली होती.

लातूर इथं डॉक्टरांनी गांधी चौकात आंदोलन केलं. या आंदोलनाला आय एम ए, निमा, आय डी ए, होमिआपॅथी डॉक्टर संघटनेसह, औषध विक्रेता संघटनेनंही पाठिंबा दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं. आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केलं. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं, निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं.

या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात अकराशे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असं आश्वासन देत, आंदोलन मागे घेण्याचं आवाहन डॉक्टरांना केलं.   

मार्ड या निवासी डॉक्टर संघटनेचे राज्य सचिव डॉ. पराग नारखेडे यांनी या आंदोलनाशी मार्ड या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचं, स्पष्ट केलं आहे. असुरक्षेच्या भावनेतून निवासी डॉक्टरांनी वैयक्तिकरित्या काम बंद ठेवलं असल्याचं, डॉ नारखेडे म्हणाले. राज्य भरातले चार  हजार डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, आंदोलनकर्त्या डॉक्टरांना, ताबडतोब कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाची याचिका, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

****

राज्यातल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी आज निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं असून, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, सांगली आणि कोल्हापूर इथं, शिवसेनेच्या निर्णयावर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणार आहेत. भारतीय जनता पक्षाला लातूर, वर्धा, आणि चंद्रपूर जिल्ह्यात, तर शिवसेनेला, रत्नागिरी जिल्ह्यात बहुमत मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुणे आणि साताऱ्यात, तर काँग्रेस पक्षाला, सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेत बहुमत प्राप्त झालं आहे. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला बहुमत मिळालं आहे. अन्य सर्व जिल्हा परीषदांमध्ये आघाड्या, किंवा युतीच्या निर्णयावर, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचं भवितव्य अवलंबून आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

पैठण इथल्या नाथषष्ठी महोत्सवाची काल सांगता झाली. बाहेरच्या नाथमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर संत एकनाथ महाराजांचे वंशज, रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वितरीत करण्यात आला. या तीन दिवसीय सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले होते.

****

निम्न दुधना धरणामधून परभणी शहराला पिण्यासाठी उद्यापासून १ हजार २०० दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. निम्न दुधना प्रकल्प ते रहाटी तसंच, पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत हे पाणी पोहचण्यासाठी सुमारे १०० तासांचा कालावधी लागणार असून, नदीकाठच्या गावातल्या लोकांनी या कालावधीत नदीपात्रात प्रवेश करू नये, जनावरांना मोकळं सोडू नये. तसंच नदी पात्रात आपली काही मालमत्ता असल्यास, त्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी हलवण्याची दक्षता घ्यावी, असं आवाहन परभणी जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

लातूर महानगर पालिकेचे ३ विद्यमान नगरसेवक आणि प्रतिष्ठीत उद्योजकांनी काल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेश स्वामी, स्नेहलता अग्रवाल आणि  कॉंग्रेसच्या वनिता काळे यांचा यामध्ये समावेश आहे, याशिवाय उद्योजक शिवकुमार गवळी, जगदीश बिडवे, शिवकुमार खेकडे यांनीही भाजपात प्रवेश केला.
****

भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेतला रांची इथला सामना काल अनिर्णित राहिला. काल सामन्याच्या पाचव्या दिवशी, ऑस्ट्रेलियानं कालच्या दोन बाद २३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांना बाद करण्यास भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियानं सहा बाद २०४ धावा केल्या. मालिकेत द्विशतक झळकावणारा, चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरीत आहेत. मालिकेतला अखेरचा चौथा सामना येत्या शनिवारपासून धर्मशाला इथं खेळला जाणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर रुई इथं, दादाराव कराड यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, दिपक कराड या मल्लानं, ‘महाराष्ट्र कुस्ती महावीर २०१७’ हा किताब पटकावला. बीड इथला मल्ल, गोकुळ आवारे याचा पाच - चार अशा गुणांनी पराभव करुन, कराड यानं ही स्पर्धा जिंकली. ५१ हजार रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक आणि तलवार देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. आवारेला उपविजेतेपद, तर पुणे इथला मल्ल, अनिल जाधव यानं, या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ५२५ मल्ल सहभागी झाले होते.

****

आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय अण्णा बोराडे असतील. या चर्चासत्रात मराठवाड्यातलं वृक्ष आच्छादन वाढवण्यासाठी आराखडा, रेशीम शेती, बांबू लागवड, यासह अन्य विषयांवर चर्चा होणार आहे.

****

चिमण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहरातल्या वन कर्मचारी वसाहतीसह नागपूरचं सेमिनरी हिल्स, मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूरचं रामबाग वन वसाहत इथं हे कृत्रिम प्रजनन केंद्र उभारलं जाणार आहे. कालच्या जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवणं, कोनाडे, तसंच वळचणी उपलब्ध करणं, खाद्य उपलब्ध करणं आदी उपाययोजना या अंतर्गत करण्यात येणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यात आरोग्य खात्यानं केलेल्या तपासणीत १०९ बोगस डॉक्टर आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतंही वैद्यकीय ज्ञान नसतांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी दिले आहेत.

या डॉक्टरांवर कारवाईसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. १०९ पैकी, ८१ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जावेद अतहर यांनी यावेळी सांगितलं.

//*******//

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...