Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
राज्यातले शेतकरी मध्यरात्रीपासून
संपावर; शेतकऱ्यांनी
संपात सहभागी न होण्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आवाहन
·
पेट्रोल आणि डिझेलच्या
दरांमध्ये वाढ
·
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर - पुण्याची विश्वांजली गायकवाड राज्यात प्रथम
·
हरिनाम सप्ताहाचा निधी पाणलोट
क्षेत्र विकासासाठी वापरण्याचा ठराव सहाव्या संत साहित्य संमेलनात मंजूर
आणि
·
जलयुक्त शिवार योजना आणखी प्रभावीपणे
राबवण्यासाठी लोकसहभाग आवश्यक - विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचं प्रतिपादन
****
राज्यातले शेतकरी मध्यरात्रीपासून संपावर गेले
आहेत. भाजीपाला तसंच दुधाची विक्री शेतकऱ्यांनी बंद केली असून, शहरं तसंच महानगरांकडे
जाणारा शेतमाल आज सकाळपासून थांबवला जाणार आहे. बाजार समित्या तसंच अनेक दूध संकलन
केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांशी निगडित ४० हून अधिक
संघटना या संपात सहभागी झाल्या असल्याचं ‘किसान क्रांती’ समन्वय समितीकडून सांगण्यात
आलं आहे.
दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री
सातारा इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे दूध वाहून नेणाऱ्या एका टँकरची
तोडफोड केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, दूध
आणि भाजीपाला या नाशवंत वस्तू असल्यानं, त्यांची विक्री केली नाही तर शेतकऱ्यांचं
नुकसान होणार आहे. त्यामुळे आजच्या संपात शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याचं आवाहन कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. या संपामुळे दूध आणि भाजीपाला
बाजारात विक्रीस आला नाही तर सामान्य माणसांचे हाल होऊ नयेत यासाठी पर्यायी व्यवस्था
केली असल्याचं, फुंडकर यांनी सांगितलं.
****
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाच्या विरोधात शिवसेनेच्या
वतीनं औरंगाबाद इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलक शिवसैनिकांनी औरंगाबाद
जालना मार्ग तसंच औरंगाबाद नाशिक मार्ग काही काळ रोखून धरला. या आंदोलनामुळे दोन्ही
मार्गांवरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
पेट्रोल प्रतिलिटर एक रूपये २३ पैसे तर डिझेल प्रतिलीटर ८९ पैसे महाग झालं आहे. मध्यरात्रीपासून
हे नवे दर लागू झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं, ही
दरवाढ केल्याचं, तेल कंपन्यांकडून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं
मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेचा शासन निर्णय काल
जारी करण्यात आला. औरंगाबाद इथल्या
जल, आणि भूमि
व्यवस्थापन संस्था - वाल्मी च्या परिसरात हे आयुक्तालय स्थापन करण्यात येत असून, वाल्मीच्या स्वायत्ततेला बाधा न आणता, ही संस्था
मृद आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारित आणण्यात आली आहे.
मृद आणि जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर जलसंधारण आणि
मृदसंधारण या दोन स्वतंत्र यंत्रणा मंजूर करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत यासह
विविध निर्णय घेण्यात आले. त्यानुसार टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमार्फत राज्यातल्या
सुमारे सहा हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास तसंच क्षमता बांधणीसाठी केलेल्या करारास
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं मान्यता दिली. वीज पडून मृत्युमुखी
पडणाऱ्या व्यक्तींच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आता मदत देता येऊ शकेल.
राज्यात ३४ जिल्ह्यात तीन हजार ४०० शाळांमध्ये
‘महाराष्ट्र राज्य शालेय सुरक्षा कार्यक्रम’ राबवण्यास प्राधिकरणानं मान्यता दिली.
****
महाराष्ट्र राज्य शिक्षण तंत्रज्ञान
संस्था अर्थात बालचित्रवाणी ही संस्था कालपासून बंद करण्यात आली. शैक्षणिक कार्यक्रम
निर्माण करणाऱ्या या संस्थेची जागा आता ई-बालचित्रवाणी ही संस्था घेईल आणि एका विशेष
वेबपोर्टलवर व्हर्च्युअल अर्थात आभासी वर्ग आणि दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची
निर्मिती करेल. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी ही नवीन संस्था
काम करणार आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीच्या
२०१६ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. पुण्याची विश्वांजली गायकवाड
राज्यात प्रथम तर देशात अकरावी आली आहे. औरंगाबादचा नितीन बगाटे यानं देशातून ६७३ वा
आणि आणि अनिल भगुरे यानं एक हजार ७ वा क्रमांक
पटकावला. राज्यभरातून ८० तर देशभरातून १ हजार १९ उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं
चौंडी इथलं जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू,
असं आश्वासन केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्य मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलं
आहे. अहिल्याबाईंच्या दोनशे ब्याण्णवाव्या जयंती निमित्त अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड
तालुक्यातल्या चोंडी या त्यांच्या जन्मगावी
विशेष अभिवादन सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अहिल्याबाई होळकर यांना
काल राज्यात सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री
अतिथीगृहात अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. औरंगाबाद
इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयासह विभागात सर्वच शासकीय कार्यालयांमधून अहिल्याबाईंच्या
स्मृतींना अभिवादन करण्यात आलं.
****
महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या वारकऱ्यांच्या
हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करुन तो निधी पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा
ठराव सहाव्या संत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशात मंजूर करण्यात आला. लातूर इथं
आयोजित या तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. भारतीय
संस्कृती टिकवण्यात मोलाची भूमिका बजावणारा वारकरी हा महाराष्ट्राचा श्वास असल्याचं
मत गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी समारोपाच्या भाषणात व्यक्त केलं. लातूर जिल्ह्याच्या
सर्व तालुक्यांमधे वृक्षलागवड करुन लातूर जिल्हा वृक्षमय करण्याचा ठरावही या संमेलनात
मंजूर करण्यात आला. राज्याबाहेर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल
बीडचे अमृत महाराज जोशी यांना ‘विठ्ठल’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. गहिनीनाथ
ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांना वारकरी विठ्ठल पुरस्कारानं गौरवण्यात
आलं. दिंडी स्पर्धेत अव्वल ठरलेल्या दिंडीकरांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जलयुक्त शिवार योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी
लोकसहभाग आवश्यक असल्याचं, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन
ऑफ इंडस्ट्रिजच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित ‘दुष्काळ प्रवण
ते दुष्काळमुक्त’ या एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटनपर भाषणात ते काल
बोलत होते. राज्यात जलसाठ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वॉटस्कॅन हे तंत्रज्ञान सीआयआय नं विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उपग्रहाच्या माध्यमातून औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, आणि लातूर सह राज्यातल्या तेरा जिल्ह्यातल्या जलसाठ्यांचा आढावा घेता येणार असल्याचं त्रिवेणी पाणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कपिल नरुला यांनी यावेळी सांगितलं.
****
कृषी विद्यापीठांनी सेंद्रीय आणि यौगिक शेतीवर
संशोधन करण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.राम
खर्चे यांनी यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा काल समारोप
झाला, त्यावेळी
ते बोलत होते. कृषी विद्यापीठांचं संशोधन
प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहचवण्याचं काम कृषी विभागानं करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या तीन दिवसीय बैठकीत विविध पिकांची ३० नवीन वाणं, तेरा कृषी अवजारं आदींसह २४४ शिफारशींना मान्यता देण्यात
आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पाच लाख चौदा हजार मृदा
आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं आहे. या आरोग्य पत्रिका ऑनलाईनही पाहता येणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …..
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या ७३६ गावातल्या ८४ हजार २३० जमीनींच्या माती नमुन्यांची सन-२०१५-१६ आणि
१६-१७ यावर्षात जिल्हा मृदसर्व्हेक्षण आणि चाचणी कार्यालयानं तपासणी केली.त्यात सेंद्रीय
कर्ब, स्फूरद, लोह, जस्त या अन्न द्रव्यांची कमतरता आढळून आली. या अन्न द्रव्यांची
कमतरता भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा आणि इतर खतांचा वापर वाढवण्याची
शिफारस या पाचलाख १४ हजार जमीन आरोग्य पत्रीका ऑनलाईनही पाहता येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या
शेतमाल लागवडीत बचत होवून शेती उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा
मृद सर्व्हेक्षण आणि चाचणी अधिकारी श्री ए.एस.गुंदेचा यांनी आकाशवाणीला दिली.
//********//
No comments:
Post a Comment