Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जून २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा राज्यभरात संमिश्र परिणाम; काही ठिकाणी
संपाला हिंसक वळण
·
शेतकऱ्यांच्या संपाआडून हिंसाचार घडवण्याचा राजकीय
डाव सुरु असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप
·
येत्या खरीप हंगामासाठी ५४ हजार कोटी रुपये पीककर्ज
मंजूर
· राज्य निवडणूक आयोगाची
येत्या एक जुलै ते ३१ जुलै या दरम्यान
नवयुवकांसाठी विशेष मोहिम
आणि
· मराठवाड्यात विविध
रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू
****
शेतकऱ्यांनी कालपासून पुकारलेल्या संपाचा राज्यभरात संमिश्र
परिणाम दिसून आला. कोल्हापूर, वाशिम, यासह काही जिल्ह्यांमध्ये दूध तसंच भाजीपाला वितरणावर
संपाचा परिणाम दिसून आला नसल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
राज्यात इतरत्र मात्र, संपाचा संमिश्र परिणाम दिसून आला.
नाशिक इथं संपाला हिंसक वळण लागलं. येवला इथं काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला
पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्यबळाचा तसंच अश्रुधुराचा वापर करावा लागला. राज्यात अनेक
ठिकाणी शेतमाल वाहतुक करणारी वाहनं अडवून, दूध तसंच भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात
आला.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी
भाजीपाला आणि दूध बाजारात आणलं नाही, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमसह, नांदेड, बीड,
जालना, औरंगाबादसह अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं.
औरंगाबाद इथं बाजार समितीत बंद पाळण्याचं आवाहन करणाऱ्या शेतकऱ्यांना
काही व्यापाऱ्यांनी मारहाण केली, यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
लातूर इथंही विविध संघटनांच्या वतीने संप पाळण्यात येत
आहे. औसा तालुक्यात काजोळे चिंचोली इथं शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाल्याचं गावात मोफत
वाटप करून, अभिनव पद्धतीनं आंदोलन केलं.
****
शेतकऱ्याला सन्मानानं जगण्याच्या हक्कासाठी संपावर
जाण्याची वेळ यावी, ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवी बाब असल्याचं,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने
उभी असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
हे सरकार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक
चव्हाण यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा
शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं. सरकारने चुकीची धोरणे राबवून
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
****
शेतकरी संपाला भारतीय कृषक समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचं
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं
आहे. कोणाच्याही मध्यस्थीने किंवा केवळ आश्वासनावर हा संप मागे घेतला जाणार नाही, असं
या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
येत्या खरीप हंगामासाठी ५४ हजार कोटी रुपयांचं पीककर्ज
मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत
पत्रकार परिषदेत बोलत होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न
असल्याचं ते म्हणाले
आज राज्यातल्या बँकर्सची बैठक झाली, स्टेट लेव्हल बँकिंग कमिटी
जी या खरीपाच्या हंगामाकरता क्रेडिट प्लान तयार करते आणि ही कर्जाच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी
ही डिसाईड करते, त्याची बैठक होती, त्या बैठकीमध्ये या वर्षाकरता १७-१८ चा जो खरीप
सिजन आहे, त्या करता ५४ हजार कोटी रुपये पीक कर्ज आणि २३ हजार कोटी रुपये टर्म लोन
अशा प्रकारचा क्रेडिट प्लान हा मंजूर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या संपाआडून हिंसाचार घडवण्याचा राजकीय डाव
सुरु असल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केला. सरसकट कर्जमाफी देणं कोणत्याही
सरकारला शक्य नाही, या प्रश्नी सरकार सकारात्मक असलं, तरी शेतकऱ्यांमध्ये चुकीची भावना
निर्माण करु नये असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. हमीभावापेक्षा कमी भाव देणं गुन्हा ठरेल अशी तरतूद
करणारं विधेयक, येत्या पावसाळी
अधिवेशनात मांडणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
****
शेतकऱ्यांचा
संप हा
गेल्या १५ वर्षात सत्ताधिकाऱ्यांच्या चुकीच्या
निर्णयांचा परिपाक असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
विद्यमान सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतानाच, गेल्या १५वर्षांत
निर्माण झालेले प्रश्न अडीच वर्षात कसे संपणार, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
मुंबई नागपूर समृध्दी
महामार्गाची कामं निवडक ठेकेदारांनाच
मिळावीत, यासाठी निविदा प्रक्रियेत बदल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी
केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या कथित भ्रष्टाचाराच्या
पार्श्वभूमीवर काँग्रेसनं राज्य रस्ते विकास महामंडळाकडे स्पष्टीकरण मागितल्याचं,
सावंत यांनी सांगितलं.
****
अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज शिवशाही
बस लवकरच परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. एस टीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वयंचलित दरवाजे, आरामदायी आसनव्यवस्था, वायफाय, एलईडी स्क्रीन, आदी सुविधा असलेल्या
सुमारे दोन हजार बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती रावते यांनी दिली.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदवणं सोपं जावं यासाठी
राज्य निवडणूक आयोग येत्या एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबवणार
आहे. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश
अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्ज देण्यात येणार आहे. उपसचिव
आणि सहनिवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती
दिली. या मोहिमेत १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांकडून भविष्यातला मतदार
म्हणून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येणार असल्याचं, वळवी यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल अपघातांच्या तीन घटनांमध्ये सहा जणांचा
मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जालना
इथं अंबड-मंठा चौरस्त्यावरील रेवगाव फाटा इथं टॅंकर आणि कार यांच्यात धडक होऊन कारमधील
तीन जण ठार तर तिघे जखमी झाले. काल
पहाटेपूर्वी औरंगाबादकडे येणाऱ्या कारला नांदेडकडे डिझेल
वाहून नेणाऱ्या टॅंकरनं धडक दिल्यानं
हा अपघात झाला.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड नजिक पडेगाव पाटीजवळ काल सकाळी
बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार झाले. चंद्रपूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसची
विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीशी धडक झाल्यान, हा अपघात झाला.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल पहाटे झालेल्या
अपघातात उदयोन्मुख अभिनेत्री अस्मिता मोरे हिचा मृत्यू झाला. ती १७ वर्षांची होती.
आगामी चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळावरून परतत असताना, कारचं टायर फुटून कार रस्ता दुभाजकावर
आदळल्यानं हा अपघात झाला.
****
रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावी,
यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रं तत्परतेनं सुरु करावीत, असं औरंगाबादचे पालकमंत्री
रामदास कदम यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
इमारतीचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते. औरंगाबाद शहरालगत असलेल्या हर्सुल तलाव परिसरात विकसित केल्या
जात असलेल्या जांभूळवनाची कदम यांनी काल पाहणी केली. या परिसरात मसाला पिकं घेण्यात
यावीत, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं ते म्हणाले. औरंगाबाद शहरातल्या
नालेसफाई कामांची त्यांनी काल पाहणी केली.
****
घाटनांदूर-श्रीगोंदा आणि परळी- बार्शी या रेल्वे मार्गासाठी
जनाग्रह अंबाजोगाई रेल्वे विकास समितीच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असल्याचं, खासदार
डॉ प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. समितीच्यावतीनं उद्या तीन जून रोजी रेल्वे मंत्री
सुरेश प्रभू यांना निवेदन देण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर समिती सदस्यांनी काल
परळी इथं मुंडे यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केलं, त्यावेळी खासदार मुंडे बोलत
होत्या.
****
परभणी जिल्ह्यात मानवत इथं तहसील कार्यालयातील आधिकारी-कर्मचाऱ्यांनी
काल सामुहिक रजा आंदोलन केलं. तहसीलदाराच्या वागणुकीविरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आलं
आहे.
****
कोल्हापूर इथल्या महालक्ष्मी मूर्तीच्या अर्ध्या भागावरच
रासायनिक प्रक्रिया झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी ही रासायनिक
प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मूर्तीवर पांढरे डाग दिसत
असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान
व्यवस्थापन समितीची भेट घेतली, त्यावेळी ही बाब समोर आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत पहिला राष्ट्रीय गोपाल
रत्न पुरस्कार धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या दोंडाइचा इथले
विक्रांतसिंह रावल यांना काल दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आला. पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्यातल्या ‘वृंदावन थारपरकर देसी काऊ क्लब’ला ‘राष्ट्रीय कामधेनु पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. तीन लाख
रूपये आणि स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
****
No comments:
Post a Comment