Friday, 2 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.06.2017 1.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जून २०१ दुपारी .००वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज फ्रान्सची राजधानी पॅरीस इथं पोहोचणार आहेत. उद्या ते फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ईमॅन्यूएल मॅकरोन यांची भेट घेणार आहेत. या चर्चेदरम्यान दहशतवाद आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

****

भारतानं आज स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेल्या आणि परमाणु सक्षम असलेल्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची ओडीसामधल्या चांदीपूर बेटावरुन यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करु शकतं. या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली असून, एक उद्दीष्ट सफल झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

****

      कर्जमाफीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. नवी मुंबईतल्या इथल्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज या संपाचा परिणाम दिसून येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातून एकही गाडी आज बाजारात आली नाही. भाज्यांचे दर तीस ते चाळीस टक्के वाढले आहेत.

नाशिक शहराच्या ग्रामीण भागात संपाचे पडसाद उमटले असून, सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल न आणल्यानं शुकशुकाट आहे. येवला तालुक्यातल्या धूळ गाव इथं तसंच निफाड इथं शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. नाशिक तालुक्यात सिद्ध पिंपरी इथं दुधाचा टँकर अडवून रस्त्यावर रिकामा करण्यात आला. संपामुळे शहरात आज दूध आणि भाजीपाला अल्प प्रमाणात आल्यानं नागरिकांचे हाल झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

इयत्ता पाचवी आणि आठवीतल्या विद्यार्थ्याला उत्त्तीर्ण करायचं की नाही याचे अधिकार शिक्षण मंडळालाच असतील, त्यात सरकारचा हस्तक्षेप नसेल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. यासंदर्भातलं विधेयक संसदेत मांडणार असल्याचं ते  म्हणाले. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठीच्या समितीची लवकरच घोषणा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

****

गोहत्येवर बंदी आणण्यासंदर्भात समाजात अनेक गैरसमज असल्याचं केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. आगरताळा इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं निर्देशित केल्याप्रमाणे गोहत्या बंदीसंदर्भातले नियम तयार करण्यात आले असून, हे नियम सर्वच प्राण्यांच्या क्रूरतेनं हत्या करण्याविरोधात असून, कत्तलखान्याच्या व्यवसायाविरोधात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.  

****

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभुषण जाधव प्रकरणी वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्ताननं आता नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे. जाधव यांच्या दयेच्या याचिकेवरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांना फाशी देणार नसल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते नफीज सईद यांनी याबाबत एक निवेदन सादर केलं आहे.

****

हरीयाणामध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास भूकंप झाला. पाच रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. हरियाणासह दिल्ली आणि उत्तर भारतात काही ठिाकणी भूकंपाचे धक्के जाणवले. यात आतापर्यंत कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परिक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी जुलै महिन्यात फेर परिक्षा होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंडळानं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासाठी पाच जून ते १५ जून दरम्यान अर्ज भरता येणार आहे, तसंच १५ ते १९ जून दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

****

बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावांच्या सर्वांगिण विकासाला अत्यंत महत्व असून, यासाठी जिल्हा परिषद आणि त्यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजना हे प्रभावी माध्यम असल्याचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या विकास योजनांचा आढावा मुंडे यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचा कारभार विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त असण्यावर भर द्यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

****

जर्मनीच्या डुसेलडॉर्फ इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि मौमा दास यांची जोडी उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठणारी ही पहिली भारतीय जोडी आहे. 

****

लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल.



//**********//

No comments: