Thursday, 1 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. राज्यभरात या संपाचा परिणाम दिसून येत आहे.
नवी मुंबईच्या वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या संपाचा परिणाम जाणवत नसला तरी संप सुरू राहिल्यास उद्या शेत मालाची आवक होणार नसल्याची माहिती व्यापारी प्रतिनिधींनी दिली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
नांदेड इथं शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर फेकून आंदोलन केलं.
धुळे इथंही शेतकरी रस्त्यावर उतरले असून, शहरात जाणारा भाजीपाला रोखण्यात आला आहे.
लातूर इथंही विविध संघटनांच्या वतीने संप पाळण्यात येत आहे. औसा तालुक्यातल्या काजोळे चिंचोली इथं शेतकऱ्यांनी दुध आणि भाजीपाला गावात मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाशिम जिल्ह्यात मात्र शेतकरी संप किंवा आंदोलन झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
नाशिक इथं या संपाला हिंसक वळण लागलं असून, येवला इथं शेतकऱ्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसंच अश्रृधुराचा वापर केला. या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी ५४ हजार कोटी रुपयांचं पीककर्ज मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत आहेत. बँकर्स समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. जास्तीत जास्त शेतकर्यांना कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं. या संपातून शेतकऱ्यांचंच अधिक नुकसान होत असल्याचं ते म्हणाले.  
तर, शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, तसंच हिंसेचा मार्ग स्वीकारु नये, असं आवाहन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 

****

केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षात अर्थ मंत्रालयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आपल्या मंत्रालयानं अनेक उपाययोजना राबवल्याचं त्यांनी सांगितलं. एकूण देशांतर्गत उत्पन्न सात ते आठ टक्के वाढणं, ही सकारात्मक बाब असल्याचं ते म्हणाले.

****

भारतानं पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना कमी झाल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सीमा सुरक्षा बलाच्या एका समारंभात बोलत होते. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवायांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. सीमेवर सीमा रक्षक दल एकत्र करणं, संपर्काचं जाळं निर्माण करणं, आणि जवानांची संख्या वाढवणं, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.   

****

नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदवणं सोपं जावं यासाठी राज्य निवडणूक आयोग येत्या एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे. उपसचिव आणि सहनिवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसंच युवा वर्गात मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावं या उद्देशानं भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबवण्यात येणार आहे.

****

रुग्णांना वेळेवर आणि चांगले उपचार मिळणं आवश्यक असून, त्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तत्परतेनं सुरु करावी, असं औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय शहरी अभियानाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन करताना ते आज बोलत होते. शिवाजी नगरच्या वॉर्ड क्रमांक ११२ इथं हे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, चिकलठाणा इथलं शासकीय रुग्णालय लवकरच सुरु करणार असल्याचं कदम यावेळी म्हणाले.
****

No comments: