Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ उद्या संपत असून, संसदेतर्फे त्यांना
आज निरोप देण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह संसदेचे सर्व
सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मंगळवारी राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची राष्ट्रपती भवनात तयारी सुरू
आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा बलाच्या जवानांनी आज दहशतवाद्यांचा
घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. याठिकाणी
अद्यापही चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसीनं रेल्वेत पुरवण्यात
येणाऱ्या खाद्य सेवेच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नियंत्रक आणि महालेखा
परिक्षक - कॅगनं या सेवेवर ताशेरे ओढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नव्या धोरणात रेल्वेच्या खाद्य सेवा आणि पँट्री
कारच्या कंत्राटाबाबतही नव्यानं करार करण्यात येणार आहे.
****
शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी या महिन्याच्या शेवटी लागू केल्या
जातील, असं आश्वासन केद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.
नवी दिल्ली इथं अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळानं जावडेकर यांची
भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा ३४वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी
नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या
नि:शुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएससीशी संलग्न शाळा, केंद्रीय विद्यालय
संघटन आणि नवोदय विद्यालयांमध्ये स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजना- एनएसएस आणि राष्ट्रीय कॅडेट कोर- एनसीसीचं एक केंद्र स्थापन
करण्याची सूचना केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी दिली. यासंदर्भात संबंधित संस्थांना
पत्र लिहिण्यात आल्याचं ते म्हणाले. ते नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबई इथं सुरु होत आहे. शेतकऱ्यांना
जाहीर केलेली कर्जमाफी आणि त्याची अंमलबजावणी, तूर खरेदी, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतला
गैरव्यवहार, समृद्धी महामार्ग यासह विविध मुद्यावर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता
आहे.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून, अनेक धरणांमधून पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं
गोदावरी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा
देण्यात आला आहे.
गंगापूरसह दारणा, कडवा आणि नांदूर मधमेश्वर या धरणांतूनही जायकवाडीत ४६ हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या २६ पूर्णांक ८६ टक्के
इतका पाणीसाठा आहे.
****
नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा
तपास अद्याप लागला नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे
२० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान 'जवाब दो' आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. यानिमित्त आज
औरंगाबाद शहरात निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यात समितीच्या कार्याध्यक्षांसह
राज्याच्या सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,
तसंच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार डी. टी. सोनटक्के यांनी टिळकांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात अंतिम सामना होणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होईल
दरम्यान, महिला संघानं या स्पर्धेत केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक
मंडळ - बीसीसीआयनं महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ५० लाख रुपयांचं बक्षीस
जाहीर केलं आहे.
****
कॅलिफोर्नियाच्या अनहेम इथं सुरु असलेल्या यूएस ओपन ग्रां प्री बॅडमिंटन स्पर्धेत
भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि पी. कश्यप अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या दोघांमध्ये
अंतिम सामना आज होणार आहे.
****
No comments:
Post a Comment