Sunday, 30 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१ दुपारी .००वा.

****

अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचं होणारं मोठं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पीक विमा दावे त्वरित मंजूर होण्यासाठी विमा कंपन्यांना अधिक कार्यतत्पर करण्याची योजना तयार केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या ३४व्या भागात ते आज बोलत होते.

देशात लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर कायदा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करत असल्याचं ते म्हणाले. ही केवळ एक कर सुधारणा नसून, प्रामाणिक संस्कृतीला बळ देणारी आणि सामाजिक सुधारणा करणारी गोष्ट असल्याचं ते म्हणाले.

असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनाचा प्रारंभ तसंच देशाची स्वातंत्र्यप्राप्ती, अशा महत्वाच्या ऐतिहासिक घटना ऑगस्ट महिन्यात घडल्यानं हा क्रांतीचा महिना असून, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक भारतीयानं एक एक संकल्प करावा आणि २०२२ साली साजरा होणाऱ्या ७५व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत तो पूर्ण करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

यंदा आपण भारत छोडो आंदोलनाचं ७५वं वर्ष साजरं करणार आहोत, असं सांगत, भारत छोडो हा नारा डॉ. युसुफ मेहर अली यांनी दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. यानिमित्त नरेंद्र मोदी ॲप वर तरुणांसाठी भारत छोडो प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणात कोणते मुद्दे समाविष्ट असावेत याबद्दलची सूचना पाठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

ऑगस्ट महिन्यापासून भारतात अनेक सण सुरु होतात, त्यामुळे हा आनंदाचा काळ असतो, मात्र आपले सण सामाजिक सुधारणेचं माध्यम बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्वांनी मातीच्या गणेश मूर्ती आणाव्यात आणि गणेश उत्सव साजरा करताना सामाजिक एकता, जागरुकता आणि संस्कार रुजवण्याच्या दृष्टीनं लोकमान्य टिळकांचे याबाबतचे विचार पुढे न्यावे, असंही पंतप्रधान म्हणाले.

****

दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय धोका असल्यानं कोणत्याही देशानं त्याचा माध्यम म्हणून, तसंच आपल्या राष्ट्रीय रणनीतीसाठी वापर करु नये, असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी केलं आहे. `यूएन ग्लोबल काऊंटर टेरेरिजम स्ट्रॅटेजी’ या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. दहशतवादाचा माध्यम म्हणून वापर केला जाऊ नये, यासाठी त्या देशांवर दबाव निर्माण करण्याचं धोरण अधिक तीव्र केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या तहाब इथं दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. काल रात्रीपासून जवानांनी या भागात शोधमोहीम सुरु केली होती. आज पहाटे दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्यानंतर ही चकमक झाली.

****

राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय मध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून, पुढच्या वर्षापासून या अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं झालेल्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शिकाऊ उमेदवारी कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, राज्यातल्या युवकांना जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळवून देण्यात महाराष्ट्रानं आघाडी घेतली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण होत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचं राजीव प्रताप रुडी यावेळी म्हणाले.

****

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस खात्यानं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कामाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरातले सर्व लिलाव यापुढे ऑनलाइन पद्धतीनं केले जाणार आहेत. यासाठी तुळजापूर मंदिर संस्थानातल्या सर्व कर्मचाऱ्यांना उस्मानाबादच्या राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य सरकारनं एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या लिलावासाठी ई- लिलाव प्रणालीचा वापर एक जानेवारी २०१५ पासून बंधनकारक केला आहे.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातला जिवंत पाणी साठा ९८३ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. धरणात सध्या ४० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात सध्या ८२ पूर्णांक ५४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...