Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** कर्जाचं पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
** पीक विमा योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची
तातडीनं बैठक बोलावण्याचे विधानसभा अध्यक्षांचे
सरकारला निर्देश
** कंपनी कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
आणि
** श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची मजबूत पकड;
श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत
****
जुन्या कर्जाचं
पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून त्यांचंही दीड लाखांरुपयांपर्यंतचं कर्ज माफ
करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या दोन्ही
सभागृहात सांगितलं. कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल विधानसभेतल्या अभिनंदन प्रस्तावाला
उत्तर देताना ते काल बोलत होते. यामुळे ८२ टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल
असं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना सध्याच्या कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर काढून
त्यांना संस्थात्मक कर्जरचनेत परत आणणं हा कर्जमाफी योजनेचा उद्देश असल्याचं
त्यांनी सांगितलं. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नियमित कर्ज परतफेड
करणाऱ्यांसाठी भविष्यातही नव्याने विचार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. पुरवणी
मागण्यांद्वारे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० हजार कोटीं रुपयांची तरतूद
करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. वस्तु आणि सेवाकरामुळे शेतकऱ्यांवर बोजा वाढल्याचं
म्हणणं चुकीचं असून शेती उपयोगी वस्तू करमुक्त असल्याचं ते म्हणाले. कर्जमाफी योजनेच्या संपूर्ण
प्रक्रियेचं संनियंत्रण करण्यासाठी विधीमंडळाची समिती तयार करण्याची सूचनाही
मुख्यमंत्र्यांनी केली.
****
कर्जाचं पुनर्गठन
झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाचा
निर्णय म्हणजे काँग्रेसच्या लढ्याचं यश आहे, असं मत प्रदेश काँग्रेस
समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी
व्यक्त केलं आहे. कर्जाचं पुनर्गठन
झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात शासनानं सतत दिशाभूल
केली तसंच खोटी माहिती दिली असा आरोप त्यांनी केला. या संदर्भातला सरकारचा खोटेपणा काँग्रेस पक्षानं जनतेसमोर आणल्याचं
सांगून संपूर्ण कर्ज माफी होईपर्यंत
काँग्रेसचा लढा सुरुच राहणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी
दिला आहे.
****
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण
सदस्य अनर्हता सुधारणा विधेयकास काल विधानसभेत मंजुरी देण्यात आली. ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषदा
आणि नगरपालिकेतल्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आल्यानंतर
त्याविरूद्ध राज्य शासनाकडे दाद मागण्याची तरतूद या विधेयकात आहेत. आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी
अपात्र ठरवल्यानंतर या सदस्यांना ३० दिवसाच्या आत राज्य सरकारकडे अपील करण्याची संधी
या विधेयकामुळे मिळणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
आमदार अमरसिंह पंडित यांनीही साखर, कांदा तसंच टोमॅटोला
अत्यावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्याची मागणी केली.
आदिवासी विकास विभागातल्या गैरव्यवहाराबाबतच्या प्रश्नावर
संबंधित खात्याचे मंत्री विष्णू सावरा समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे सभापती
रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवला.
चार हेक्टर क्षेत्र
असलेल्या शेतकऱ्यांनाही आता सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती उर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी अटी शिथिल करण्यात आल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
पीक विमा योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळवून
देण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीनं बैठक बोलवावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी काल सरकारला दिले. काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा विधानसभेत
उपस्थित केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, राज्यातल्या
शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सामावून घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी विशद केल्या. या योजनेसाठी
सरकारनं जाचक नियम आणि अटी घातल्यानं अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याचा
आरोप त्यांनी यावेळी केला.
****
कंपनी कायदा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं.
कंपन्यांचा व्यवस्थापन दर्जा अधिक मजबूत करणं, बेकायदेशिर कंपन्याविरूद्ध कडक कारवाई
करण तसंच देशात सुलभपणे व्यवसाय करण्यासाठी सुधारणा करण्याकरता आवश्यक तरतुदी या विधेयकात
करण्यात आलेल्या आहेत. कंपनी व्यवहार राज्यमंत्री
अर्जुन मेघवाल यांनी हे विधेयक सभागृहात मांडल होतं. आवाजी मतदानानं संमत झालेल्या
या विधेयकात ४०हून अधिक सुधारण करण्यात आल्या आहेत.
****
मानवी तस्करी हा समाजासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत राज्य महिला आयोगानं आयोजित
केलेल्या महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत
होते. मानवी तस्करी, विशेषकरुन लहान मुलांची तस्करी रोखण्यासाठी राज्य शासन उपाययोजना
करत असून, शासनाच्या मुस्कान या प्रकल्पाच्या मदतीनं बालकांच्या तस्करीचा दर ४० टक्क्यांवरुन
पाच टक्यांवर आला असल्याचं ते म्हणाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सहाय्यानं आपण
महिला तस्करीचं कायमचं उच्चाटन करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य सरकारनं पिक विमा भरण्यासाठी सुरू केलेलं केंद्र
इंटरनेट जोडणीअभावी बंद पडल्यामुळे तसंच बँकांनी विम्याचा हप्ता घेण्यास नकार दिल्यामुळे
नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर इथं दोन हजार शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. आंदोलन
करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी जखमी
झाले आहेत. नांदेड शहरातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाला
घेराव घातला.
परभणी जिल्ह्यातही बोरी इथल्या परभणी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत विम्याचे अर्ज घेण्यास विलंब लागत असल्याच्या
कारणावरून शेतकऱ्यांनी परभणी- जिंतूर महामार्गावर
बोरी इथं रस्ता रोको आंदोलन केलं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेवर दगडफेक केली. त्यातून
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. ३१ जुलै ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे
****
समृद्धी
महामार्गासाठी औरंगाबाद तालुक्यातल्या बेंदेवाडी गावामधल्या दोन शेतकऱ्यांप्रमाणे इतर गावातील शेतकरीही लवकरच आपल्या जमिनी देतील असा विश्वास विभागीय आयुक्त
डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समृध्दी महामार्गांसंदर्भात
दस्त हस्तांतरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या दोन शेतकऱ्यांनी आपली जमीनी दिल्यामुळे खऱ्या अर्थांने या प्रकल्पास सुरुवात झाली असं भापकर
यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा
कसा होईल यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर
भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. काल दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या पाच बाद १५४ धावा
झाल्या असून, फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून २४६ धावांची गरज आहे.
ऊपुल थरंगा ६४ धावा आणि अँजेलो मॅथ्यूजनं नाबाद ५४ धावा करत श्रीलंकेचा डाव सावरला.
भारताकडून मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक बळी
घेतला. तत्पूर्वी भारतानं सर्वबाद ६०० धावा केल्या. यामध्ये चेतेश्वर पुजारा १५३, अजिंक्य
रहाणे ५७, हार्दिक पंड्या ५० तर रविचंद्रन अश्विननचा ४७ धावांचा वाटा आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा इथलं जिल्हा रुग्णालय ३०
नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
राज्य सरकारला दिले आहेत. या रुग्णालयासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठका आणि घोषणांवर
न्यायालयानं असमाधान व्यक्त केलं. रुग्णालयासाठी आवश्यक रुग्णवाहीका, इतर साधने, तसंच
कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे रुग्णालयाचं कामकाज कसं चालवणार, असा सवालही न्यायालयानं
केला आहे.
****
जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी समाजातील सर्व गोरगरीब,
मागास, वंचित, पीडित, दलित, परिवर्तनवादी, समाजवादी, डावे यांनी आपसातील मतभेद बाजूला
ठेवून एकत्र येण्याचं आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केलं आहे. ‘पुरोगामी,
डाव्या आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हानं’ या विषयावर औरंगाबाद इथं झालेल्या व्याख्यानात
ते बोलत होते. सद्य राजकीस स्थिती पाहता लोकशाहीचं भवितव्य धोक्यात आलं असल्याची भितीही
त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment