Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** ३० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा
परिषदेच्या १३ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द
** खासगी शिकवणी वर्गांकडून चालवले जाणारे
इंटीग्रेटेड अभ्यासक्रम जून २०१८ नंतर बाद करण्यात येणार
** पद्मविभुषण खासदार
शरद पवार यांचा आज औरंगाबाद इथं नागरी सत्कार
आणि
** जायकवाडी धरणातला पाणी साठा चाळीस टक्क्यांवर
****
राज्यातल्या ३० पेक्षा कमी
पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या १३ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत असल्याची
घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अनधिकृत शाळांवर कारवाई करून त्यातल्या
विद्यार्थ्यांचं समायोजन नजीकच्या अधिकृत शाळांत करण्यात येणार असल्याचं तावडे यांनी
सांगितलं.
राज्यात
खासगी शिकवणी वर्गांकडून चालवले जाणारे इंटीग्रेटेड अभ्यासक्रम जून २०१८ नंतर बाद करण्यात
येणार असल्यानं, अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत, असं आवाहन तावडे
यांनी केलं. अकरावी तसंच बारावी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ -सीबीएसईच्या धर्तीवर तयार करण्यात येणार असल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय
पातळीवरील परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीनं अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात
तसंच मूल्यमापनात आवश्यक बदल करणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.
****
राज्यात पर्यटक तसंच प्रवाशांच्या
सुरक्षेसाठी सर्व टॅक्सी तसंच ऑटो रिक्षांवर जीपीएस यंत्रणा बसवणार असल्याचं,
गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितलं. भायखळा कारागृहातल्या
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी खोटा अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं, पाटील यांनी
सांगितलं.
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि संचालक मंडळानं
बारा हजार शेतकऱ्यांच्या नावे विविध बँकांमधून ३२८ कोटी रुपये कर्ज उचलल्याची माहिती
पाटील यांनी सभागृहाला दिली.
****
हृदय
शस्त्रक्रियेशी संबंधित वैद्यकीय
उपकरणांची कायद्यानुसार किंमत निश्चीत करण्यात येणार असून,
त्यांच्या पुनर्वापराला प्रतिबंध करण्यात येणार आहे. अन्न आणि
औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. अशा उपकरणांचा
पुनर्वापर करणाऱ्या सात मोठ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य सेवा संचालनालय आणि वैद्यकीय शिक्षण
संचालक यांच्याकडून शासकीय रुग्णालयांमध्ये या उपकरणांचा
छापील किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत पुरवठा केला जाणार असल्याचं, राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितलं. या संदर्भातला केंद्राचा कायदा
१ जानेवारी २०१८ पासून राज्यात अमलात येणार आहे.
****
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मोलाची कामगिरी करणाऱ्या भारतीय
महिला संघातल्या पूनम राऊत, स्मृती मंधाना आण मोना मेश्राम तीन खेळाडूंना मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी ५० लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. काल विधानसभेत
मुख्यमंत्र्यांनी मांडलेला महिला क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्तावही एकमतानं मंजूर
करण्यात आला.
****
राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत मिळणार असल्याचं
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. काल विधान भवनात यासंदर्भात आयोजित
बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या चार हजार २५२ ग्रामपंचायतींना स्वत:च्या
इमारती नाहीत, या सर्व ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत
आणि महिला सक्षमीकरण अभियानांर्गत इमारती देण्याचं धोरण ठरवणार असल्याचं मुंडे यांनी
सांगितलं.
****
वादग्रस्त
मुस्लीम धर्मप्रचारक जाकीर नाईक याला राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं फरार घोषीत
केलं आहे. जाकीर याची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश एनआयएनं दिले
असून, याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
****
चित्रपट
अभिनेते इंदर कुमार यांचं काल पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते
४४ वर्षांचे होते. इंदर यांनी मासूम, कुंवारा, बागी, गजगामिनी, कहीं प्यार ना हो जाये,
मा तुझे सलाम, तुम को ना भूल पायेंगे, पेइंग गेस्ट, तसंच वॉन्टेड या सह अनेक हिंदी चित्रपटातून विविध
भूमिका साकारल्या आहेत.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
संसदीय कारकीर्दीला
५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज
औरंगाबाद इथं नागरी
सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार
होणार असून, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद
शहरातल्या देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात,
दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० जुलैला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार काल अहमदनगर
इथं जाहीर करण्यात आले. साहित्य जीवन गौरव पुरस्कार साहित्यिक डॉ गणेश देवी यांना,
राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 'उजव्या सोंडीच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी
प्रवीण बांदेकर यांना, कला गौरव पुरस्कार अशोक हांडे यांना, समाज प्रबोधन पुरस्कार
सत्यपाल महाराज यांना, तर नाट्य सेवा पुरस्कार अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. येत्या
सात ऑगस्टला प्रवरानगर इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.
****
जायकवाडी
धरणातला पाणी साठा चाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात
सुमारे १८ दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली असून, धरणातला जिवंत पाणी साठा ८७५ दशलक्ष घनमीटर
वर पोहोचला आहे. हे प्रमाण धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ४० पूर्णांक ३२ टक्के एवढं
आहे. धरणात सध्या सात हजार क्युसेक घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे,
नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २४ हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या इतर धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात
विसर्ग सुरू असल्यानं, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
****
परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या बँकांमध्ये पीकविमा भरण्यासाठी
आजपासून तीन स्वतंत्र खिडक्या सुरू केल्या जाणार आहेत. तहसीलदार बाबूराव मेडके यांनी
ही माहिती दिली. बँकांकडून पीकविम्याचे हप्ते स्वीकारले जात नसल्यानं, काल शेतकऱ्यांनी
पालम-लोहा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा उद्या रविवारीही
सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना पिकविमा भरणं सोयीचं व्हावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं,
बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी सांगितलं.
औरंगाबादसह मराठवाड्यात इतर जिल्हयातही पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी
बँकांमधून रांगा लावल्याचं दिसून येत आहे.
****
युवक कल्याण शिबीराचं मंजूर अनुदान तसंच व्यायामशाळा प्रस्ताव मंजूर करुन देण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना बीड इथला जिल्हा क्रीडा अधिकारी
एन एम बस्सी याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून रंगेहाथ अटक
केली. या प्रकरणी बीड इथं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक रंजना कावळे यांना काल
तेरा हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. मयत महिलेच्या नावे असणारा रॉकेल
विक्रीचा परवाना वारसाहक्काने नावे करण्यासाठी या महिला कर्मचाऱ्यानं २६ हजार रुपये
लाच मागितली होती.
****
गोरक्षेच्या नावाखाली होणारा हिंसाचार थांबवण्याच्या मागणीसाठी
काल औरंगाबाद इथं महाराष्ट्र मुस्लीम आवामी कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment