Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं पंतप्रधान नवाज शरीफ यांना
पदावर कायम राहण्यास अपात्र ठरवलं आहे. न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं आज
हा निर्णय सुनावला. शरीफ यांच्यासंदर्भातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्याचे
आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्य विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी
प्रस्ताव सादर केला आहे. नितीश कुमार यांनी आधीच १३२ आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना दिलं आहे.
दरम्यान, बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या बिहार विधानसभेच्या विशेष अधिवेशनात
राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली
आहे. राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप
प्रत्यारोपांमुळे विधानसभेत गदारोळ सुरू असून,
या गोधळांतच मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर केला.
नितीश कुमार यांच्या सत्तास्थापनेला
आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी पाटणा उच्च्
न्यायालयानं सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे
****
येत्या आठ ऑगस्टला गुजरातमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या
निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री
स्मृती इराणी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात
आला होता. तर
इराणी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या
१८ ऑगस्टला पूर्ण होत
आहे.
****
दरम्यान गुजरातच्या मुद्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या
गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज बारावाजेपर्यंत तीन वेळा स्थगित करावं लागलं. गुजराथमध्ये
पोलिसांनी काँग्रेसच्या आमदारांचं कथित अपहरण केल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी
सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे सदनाचं कामकाज वारंवार बाधित झालं.
लोकसभेत शून्यकाळात कोल्हापूरचे खासदार धनंयज महाडिक गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींवर लागणारा वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याची मागणी केली.
तर हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या
अडचणी तसंच इतर मुद्यांकडे सदनाचं लक्ष वेधत विम्याचा हप्ता भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
करावी, अशी मागणी केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हुंडा प्रकरणांमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तसंच त्यातील तथ्य समोर येत
नाही तोपर्यंत कोणतीही अटक किंवा कारवाई करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला
आहे. हुंडा छळ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कुटुंब कल्याण समिती
गठीत करण्यासही न्यायालयानं
सांगितलं आहे. हुंडा प्रकरणांमध्ये परस्पर सामंजस्यानं
प्रकरण सोडवलं गेलं पाहिजे असं मतही
न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे
आदेश महापालिकेला दिले असून, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी विभागीय आयुक्त
पुरूषोत्तम भापकर यांची भेट घेवून या बाबत प्रशासनानं पुढाकार घेवून या वास्तू नियमात
बसवाव्यात अशी मागणी केली आहे. तर एमआयएमनेही या विषयावर महापालिकेत विशेष सभा बोलावण्याची
मागणी केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव तेजीत आले असून, सरासरी
अडीचशे रुपयांनी वाढले आहेत. नाशिक मधल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव
एक हजार २५० रुपये प्रति क्विंटल इतके झाले आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशातला कांदा संपुष्ठात आल्यानं देशांतर्गत बाजार पेठेत नाशिकच्या
कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जायकवाडी धरणातला पाणी साठा चाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या
पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात सुमारे १८ दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली असून, धरणातला जिवंत
पाणी साठा ८७० दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. हे प्रमाण धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या
४० पूर्णांक अकरा टक्के आहे. धरणात सध्या सात हजार क्युसेक घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक सुरू आहे, नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं,
पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या सर्व बाद २९१
धावा झाल्या. रविंद्र जडेजानं तीन, मोहम्मद शमीनं
दोन तर उमेश यादव,
रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. भारत
३०९
धावांनी आघाडीवर आहे.भारताची फलंदाजी सुरुझाली आहे.
****
No comments:
Post a Comment