Thursday, 27 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 27.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** बिहारमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी; राष्ट्रीय जनता दलासोबतची युती संपुष्टात आणत नितीशकुमार आज भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री होणार

** तीस वर्ष जुन्या इमारतींचं संरचनात्मक परीक्षण होणं आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

** औरंगाबाद शहरातल्या भूमिगत गटार योजनेमधल्या अनियमिततेची चौकशी करण्याचं सरकारचं आश्वासन

आणि

** श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या तीन बाद ३९९ धावा

****

बिहारमध्ये काल सायंकाळी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी रात्री नितीशकुमार यांना पुन्हा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. त्यांना दोन दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासदेखील सांगण्यात आलं आहे.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भ्रष्टाचारप्रकरणी राजीनामा देत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काल नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षासोबतची युती संपुष्टात आणली. सद्य परिस्थितीत सरकार चालवणं शक्य नसल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

त्यानंतर काही तासातच नितीशकुमार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांची बैठक झाली, या बैठकीनंतर दोघांनी राज्यपाल त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांनी १३२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं. नितीशकुमार आज सकाळी १० वाजता बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

 दरम्यान, यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचं सांगितलं.

****

ंसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज काल वारंवार तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत घोषणाबाजी केली. जेटली यांचं संबंधित विधान वगळण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं सदनाचं कामकाज साडे बारावाजेपर्यंत तीन वेळा तहकूब करावं लागलं.

लोकसभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजप सदस्यानं केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खुलासा करत, संबंधित चर्चेची दृष्य तपासताना आक्षेपार्ह उल्लेख आढळला नसल्याचं नमूद केलं. मात्र विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.

दरम्यान, लोकसभेत दुपारच्या सत्रात, काँग्रेसच्या सहा सदस्यांचं निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

ाज्य विधानसभेचं कामकाजही घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्यावरून तीन वेळा तहकूब झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी या प्रकरणी स्थगन प्रस्ताव देत, प्रश्नोत्तराचा तास रद्द करत चर्चेची मागणी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, ही घटना गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन, प्रत्यक्ष पाहणी केल्याचं सांगितलं.

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव स्वीकारला, मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी फेटाळून लावत, या मुद्यावर दुपारी चार वाजता चर्चा घेणार असल्याचं सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांना कामकाज प्रथम दोन वेळा दहा मिनिटांसाठी तर तिसऱ्या वेळेस १५ मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं

तीस वर्ष जुन्या इमारतींचं संरचनात्मक परीक्षण होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानसभेत दुपारच्या सत्रात घाटकोपर दुर्घटनेसंदर्भात निवेदन करताना, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात महनगरपालिका आयुक्तांना १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या भूमिगत गटार योजनेंतर्गत काही अनियमितता झाली आहे काय, तसंच वापरलं गेलेलं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं काय, याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यात दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधानपरिषद सदस्य सुभाष झांबड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री काल बोलत होते. २०१२ मध्ये भूमिगत गटार योजनेसाठी ३६५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. काम सुरु करण्यास विलंब झाल्यानं २०१४ मध्ये काम सुरु करताना या योजनेचा खर्च ३० टक्क्यांनी वाढून तो सहाशे चौसष्ठ कोटी रूपये इतका झाला. सध्या या प्रकल्पाचं ७० टक्के काम पूर्ण झालं असून येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

राज्यातल्या, विशेषतः मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, आणि माध्यमिक शाळांच्या धोकादायक इमारतींच्या नुतनीकरणासाठी बृहद्आराखडा तयार करण्यात येणार असून, येत्या पाच वर्षात  या इमारतींचं बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल  विधानपरिषदेत दिली. आमदार  अमरसिंह पंडित यांनी  बीड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या धोकादायक इमारतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या शाळांच्या बांधकामासाठी, सर्व शिक्षा अभियानातून तीन कोटी १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, सं त्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

अठराव्या कारगिल विजय दिनानिमित्त काल देशभरात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. मुंबईत या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी, देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं सांगितलं.

पाटील यांच्या हस्ते यावेळी १६  शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आर्थिक मदत आणि ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला. युद्धात अपंगत्व आलेल्या ११  अधिकारी आणि जवानांना आर्थिक मदत देऊन त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आलं तर ७ शौर्यपदक धारकांनाही पदकनिहाय आर्थिक मदत देण्यात आली.

औरंगाबाद इथल्या कारगिल स्मृतीवन इथं जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं काल शहीदांना अभिवादन, वृक्षारोपण तसंच माजी सैनिकांचा मेळावा असे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींचा गौरव करण्यात आला.

उस्मानाबाद इथं काल कारगिल विजय दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. महाविद्यालीन विद्यार्थी विद्यार्थीनी या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चीनी बनावटीच्या वस्तू वापरण्याऐवजी स्वदेशी  वस्तू वापरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

लातूर तालुक्यात १५ हजार स्वच्छता गृहांचं काम पूर्ण करण्याच्या उद्देशानं, काल आठ हजार २३० खड्डे खोदण्यात आले. हा एक विक्रम असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

यापूर्वी तेलंगणा राज्यात आठ हजार खड्डे खोदण्याचा विक्रम केला होता. याविषयी अधिक माहिती देत आहेत. आमचे वार्ताहर

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गेले तीन दिवस देशव्यापी आंदोलन करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून काल औरंगाबाद पुणे महामार्गावर लिंबे जळगाव इथं रास्ता रोको करण्यात आल. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कालपासून श्रीलंकेतल्या गाल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर तीन गडी बाद ३९९ धावा केल्या. शिखर धवननं १९० धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १४४ धावांवर खेळत आहे तर अजिंक्य रहाणे ३९ धावांवर नाबाद आहे. श्रीलंकेकडून नुआन प्रदीपनं तीन बळी घेतले.

****

केंद्र शासनानं औरंगाबाद शहरातल्या जालना रोड तसंच बीड बायपाससाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे. गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी या २ रस्त्यांच्या विकास कामांसाठी ९०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा औरंगाबाद इथं केली होती.

****

फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदच्या वतीनं आज औरंगाबाद इथं  संघर्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते होईल. दलित-बहुजन-मुस्लिमांवर विविध प्रकारची बंदी लादली जात आहे. बहुजनांसमोर प्रतिगाम्यांनी प्रतिक्रांतीचं आव्हान उभं केलं आहे. या प्रश्नांसंदर्भात संघर्ष परिषदेत विचारमंथन होणार आहे.

****


No comments: