Thursday, 20 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 20.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०१ दुपारी .००वा.

****

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी कृषिविषयक समस्या उपस्थित करत गदारोळ केला. यामुळे अध्यक्षांना कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं. या मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी लाऊन धरली. तर शेतकऱ्यां

च्या प्रश्नांवर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांनी केला. विरोधकांचा गदारोळ आणि घोषणाबाजी वाढतच गेल्यानं कामकाज दिवस भरासाठी तहकुब झालं.

राज्यसभेतही शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

****

राष्ट्रपती पदासाठी १७ तारखेला झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. संध्याकाळपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात ही निवडणूक होत आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात थाथ्री इथं झालेल्या ढगफुटीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी आहेत. चिखलात अडकलेल्या पाच जणांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अजुनही ही मोहीम सुरु असून, आज दोन जणांचे मृतदेह सापडले. या ढगफुटीनंतर आलेल्या पूरामुळे काही घरांचं नुकसानही झालं आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांतल्या कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्यां वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या वेतन आयोगानं १५ टक्के वाढीची शिफारस केली होती. वाढीव वेतन एक जानेवारी २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावानं मिळणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमामुळे आकाशवाणीला गेल्या दोन वर्षात दहा कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

****

महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

राज्यात सुरु असलेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

****

असंघटीत कामगारांच्या संरक्षणासाठी राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केलं जाणार असून, या मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार असल्याचं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. मुंबई इथं वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या मंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या तीन कोटी ६५ लाख असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

****

राज्यातल्या परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या सरकारनं पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या नऊ ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं दिला आहे. सोलापूर इथं झालेल्या फेडरेशनच्या अठराव्या परिषदेत सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसोबत प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी बँकांनी सकारात्मक राहून कर्जदार, बिगर कर्जदार, बिगर खातेदार शेतकऱ्यांची पीक विमा नोंदणी, पीक कर्ज वाटप तातडीनं करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. चालु खरीप हंगामातली प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत येत्या ३१ जुलै पर्यंत असून, शेतकऱ्यांच्या सोईसाठी सामान्य सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसंच, बँकांमार्फत गावपातळीवर पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

****

महावितरणनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या थकबाकी असलेल्या एक हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजानंची वीज जोडणी बंद केली आहे. या योजनेसाठी मूळ थकबाकी रक्कम भरून व्याज आणि दंड माफ करण्याची योजना जाहीर केली होती, मात्र ग्रामपंचायतींनी या योजनेची दखल घेतली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही माहिती दिली.

****

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडमधल्या डर्बी इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवून इंग्लंडचा संघ याआधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे.

****


No comments: