Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 22 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
विमुद्रीकरणामुळे
काळ्या पैशाची आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाची हेराफेरी रोखण्यास मदत झाली असल्याचं,
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत ‘दिल्ली आर्थिक
परिषद-२०१७’ मध्ये बोलत होते. वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे कर व्यवस्थेत अधिक पारदर्शकता
येईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उद्घाटनपर भाषणात सिंगापूरचे
उपपंतप्रधान थरमन षण्मुगरतनम यांनी भारतीय अर्थव्यवस्थाही अगदी योग्य दिशेने पुढे जात
असल्याचे उद्गार यावेळी काढले. चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी राजकीय पाठिंब्याची गरज त्यांनी
यावेळी व्यक्त केली.
****
कॅन्सरसारख्या
आजारांवर पारंपारिक औषधांचा शोध घेणं आणि त्यांचा विकास करण्यासाठी भारत हा अमेरिकेशी
सहकार्य करार करत असल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली
आहे. पहिल्यांदाच भारत या पारंपारिक औषधांचा विकास करण्यासाठी अमेरिकेबरोबर यशस्वीरित्या
काम करत असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ उद्या संपत असून, संसदेतर्फे उद्या त्यांना निरोप देण्यात
येणार आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र
मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह संसदेचे सर्व सदस्य या कार्यक्रमाला
उपस्थित राहणार आहेत.
नवनिर्वाचित
राष्ट्रपती रामनाथ कोविंद २५ जुलैला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.
****
नवी
दिल्ली इथं राज्य सरकारांच्या प्रतिनिधींसह कार्यरत पत्रकार आणि बिगर पत्रकारांसाठीच्या
मजिठिया वेतन मंडळाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा केंद्रातर्फे आढावा घेण्यात आला. श्रम
आणि रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, वेतन मंडळाच्या
शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या १९ तारखेला सर्वोच्च न्यायालयानं
मजिठिया वेतन मंडळाच्या शिफारशी पूर्णत: लागू करण्यात आल्याचं सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर
ही आढावा बैठक घेण्यात आली.
****
कर्जमाफीमुळे
राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण त्यामुळे विकासकामे थांबणार नाहीत, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं एका खासगी वृत्त वाहीनीच्या कार्यक्रमात
बोलत होते. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी वेगळं धोरण आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्जमाफीनंतर शेती क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ थांबायला नको, हे सरकारपुढे एक आव्हान
असल्याचं ते म्हणाले. खोरे आणि उपखोरे यांचा एकात्मिक आराखडा तयार करून शेतीला शाश्वत
सिंचन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
दरम्यान,
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी मंत्री आणि माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या निधनानं
सहकार चळवळीचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पाटील
यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवाजीराव पाटील यांचं आज पहाटे मुंबई इथं निधन
झालं, ते ९२ वर्षांचे होते.
पाटील
यांच्या पार्थिव देहावर परवा सोमवारी धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
राज्य
शासनानं केलेल्या दारूबंदी कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा
निर्णय घेतला असून, पहिला दल अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करणार असल्याचं राज्य उत्पादन
शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी
बोलत होते. महाराष्ट्र व्यसनमुक्त करावा तसंच राज्यातली अवैध दारूविक्री बंद करावी
यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य शासनाला अशा ग्रामरक्षक दलाची स्थापना
करण्याची सूचना केली होती. ३० ऑगस्टपर्यंत या दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
****
राज्यात
आज मुंबईसह अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरु असून,
अनेक भागात पाणी साचलं आहे. तसंच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
कोल्हापूर
इथं पावसाचा जोर कायम असून, पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातले
८५ बंधारे पाण्याखाली गेले असून, राधानगरी धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच
नद्यांना पूर आला असून, नागरिकांनी पूराचा धोका पत्करु नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
नाशिक
जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूर मधमेश्वर आणि होळकर पूल
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नांदूर
मधमेश्वर कालव्यातून जायकवाडी धरणात ३१ हजार ५१० घनफूट प्रतिसेकंद, तर नागमठाण इथून
गोदावारी नदीत २८ हजार ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी
धरणात एकूण १८ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणात २४
पूर्णांक ५१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
औरंगाबाद
शहर आणि परिसरात आज सकाळपासून संततधार सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment