आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय
अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतूदींची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी अनेक निर्देश
दिले आहेत. तसंच सद्यस्थितीत या कायद्याच्या अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्याचं
न्यायालयानं याबाबत म्हटलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण प्रणाली
विभागाच्या सचिवांनी ३१ ऑगस्टपूर्वी बैठका घेऊन सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये
या कायद्याच्या अंमलबजावणीबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही न्यायालयानं
दिले आहेत. संसदेनं पारित केलेला कायदा हा सामाजिक जबाबदारीचा भाग असून त्याचा योग्य
तो आदर राखला जायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान वय वंदना योजनेला काल पासून प्रारंभ
झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत या योजनेला प्रारंभ केला.
६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी असलेल्या या विशेष निवृत्ती योजनेअंतर्गत
ठेवीदारांना वर्षाकाठी आठ टक्के परतावा मिळण्याची हमी आहे.
****
जनभावनेनुसार प्रत्येक कायद्यात
बदल, सुधारणा होत असतात, त्यामुळे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीत सर्व व्यापाऱ्यांनी
योगदान द्यावं, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. ते काल
औरंगाबाद इथं वस्तू आणि सेवा कर कायद्यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयोजित
कार्यक्रमात बोलत होते.
****
गोरक्षकांवर आवर घाला आणि
कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद इथं मजलीस-ए-इत्तेहाद- उल-मुसलमीन - एमआयएमतर्फे
मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आझाद चौक इथून निघणार्या या मोर्चात एमआयएमचे
खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती असून, रात्री जाहीर सभा होणार आहे.
****
उत्तराखंड मध्ये केदारनाथ
इथं एक बस दरीत कोसळून औरंगाबाद इथल्या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक
जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या पाडळी आणि निधोना इथले हे
भाविक आहेत. बद्रीनाथहून केदारनाथला जाताना कर्णप्रयाग जवळ हा अपघात झाला.
****
नांदेड ते बंगळुरु एक्सप्रेस
मध्ये एक द्वितीय श्रेणी शयनयान डबा वाढवण्यात आला आहे. हा बदल कायम स्वरुपी असेल,
असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment