Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
ठळक बातम्या
** २०१७ संकल्प वर्ष बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
**
शेतमालाची साठवणूक करण्यासाठी रेल्वे विभागाच्या मदतीनं शीतगृहांची साखळी; राज्यात
५२ शीतगृह उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
** पीक विमा भरण्याचा
आजचा शेवटचा, कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर बँकेत थांबण्याचे कृषी आयुक्तांचे
आदेश
** आयकर विवरण पत्र भरण्याचाही आजचा शेवटचा दिवस
आणि
** मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी राज्य शासनानं उच्च न्यायालयात नव्यानं
शपथपत्र दाखल करण्याचं जलतज्ञ या. रा. जाधव यांचं आवाहन
****
आता सविस्तर बातम्या
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी २०१७ हे वर्ष संकल्प वर्ष बनवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी क्रांतीचा महिना
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑगस्ट महिन्यात अस्वच्छता- भारत छोडो, गरीबी - भारत छोडो,
भ्रष्टाचार- भारत छोडो,
दहशतवाद - भारत छोडो, जातीयवाद - भारत छोडो, संप्रदायवाद - भारत छोडो, असे संकल्प करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमात
काल ते बोलत होते. देशाला आज 'करेंगे या मरेंगे' या घोषणेची नव्हे तर नव्या
भारताच्या संकल्पाशी जोडून घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी
येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी संकल्पापासून त्याच्या सिद्धतेपर्यंतचं महाअभियान
चालवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सामाजिक अर्थशास्त्राचं महत्त्व विशद करत
पंतप्रधान मोदी यांनी येत्या रक्षाबंधनाच्या सणाला घरगुती तयार करण्यात आलेल्या
राख्यांची तर गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणपती
खरेदी करण्याचं आवाहन केलं. यामुळे देशातल्या शेकडो लोकांना रोजगार मिळतो,
त्यांचं कुटुंब यावर चालतं असं ते म्हणाले.
****
बाजारात योग्य दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता यावी, तोपर्यंत
शेतमालाची साठवणूक करण्यासाठी सरकारनं रेल्वे विभागाच्या मदतीनं देशभरात शीतगृहांची
साखळी निर्माण करण्याचं ठरवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं भारतीय रेल्वे आणि लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री
संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी काल ते
बोलत होते. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशात अशा प्रकारचे २२७ शीतगृह उभारण्यात येणार असून त्यापैकी ५२ शीतगृह महाराष्ट्रात
उभारली जाणार असल्याचं ते म्हणाले. या ५२ शीतगृहांपैकी २५ शीतगृह लवकरात लवकर बांधून
पूर्ण होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
नाशिक इथल्या मेळा बस स्थानकाचं विमान तळाच्या धर्तीवर बस पोर्टमध्ये रूपांतर
करण्यात येणार असून त्याचंही भूमिपूजन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. नाशिकच्या या
बसपोर्टच्या धर्तीवर राज्यातल्या प्रत्येक शहरात असं बसपोर्ट उभारण्यात येईल, असं त्यांनी
यावेळी जाहीर केलं.
****
शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमांचं उद्घाटन तसंच साईनगर शिर्डी ते मुंबई
साप्ताहिक अतिजलद गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल करण्यात
आला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना
आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात
रेल्वेच्या विकासासाठी एक लाख, २६ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू
असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक साईबाबांच्या
दर्शनासाठी शिर्डीला येत असतात, त्यांच्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी इथं अनेक
सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
पीकविमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं
बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना
पीक विमा भरण सुलभ व्हावं यासाठी बँकांनीही जास्तीत जास्त खिडक्या सुरू करण्याचं आवाहनही
त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, काल सुटी असूनही पिक विमा भरण्यासाठी
बँकांचं कामकाज सुरू होतं. शेतकऱ्यांनीही पिक विमा भरण्याकरता बँकांमध्ये गर्दी केली
होती. अनेक ठिकाणी बँकांची यंत्रणा कमी पडल्यामुळे शेतकरी विमा भरू शकले नाहीत. बीड
जिल्ह्यातल्या परळी इथं बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांनी
बँकेवर दगडफेक केली. यामध्ये एका महिला शेतकऱ्यांसह दोन जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात
पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. जालना जिल्ह्यातही
जामखेड इथं पिक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडल्यानंतर
पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. परभणीत जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात पिक विमा
बँकांमध्ये शेतकऱ्यांनी भरला.
विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी
मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विम्याचा
हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ देण्याकरता केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असल्याचं बुलडाणा
इथं बोलतांना सांगितलं. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना
पिक विमा भरण्याची मुदत वाढवण्याबाबत गांभिर्यानं विचार केला जात असल्याचं सांगितलं.
****
आयकर विवरण पत्र सादर करण्याचीही आजची शेवटची तारीख असून या पार्श्वभूमीवर आयकर
विभागानं` ‘आयकर सेतू ॲप’ काल सुरू केलं. या ॲपच्या मदतीनं आयकर विवरण पत्र सादर करणं,
पॅनकार्डसाठी अर्ज, पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करणे आणि उद्गमस्थानी झालेल्या
कर कपातीची माहिती मिळू शकेल. गुगल स्टोअरवरून हे ॲप प्राप्त करता येऊ शकेल किंवा या
ॲपची लिंक मिळवण्यासाठी ७३०६५२५२५२ या क्रमांकावर मिस्ड कॉल करण्याची सुविधा देण्यात
आली आहे.
दरम्यान, आयकर विवरण पत्र भरण्यास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय
प्रत्यक्ष कर विभागानं स्पष्ट केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धरणं बांधली गेल्यामुळे
गेल्या ४१ वर्षात हे धरण फक्त चार वेळाच भरलं, कायद्याची अंमलबजावणी झाल्यास मराठवाड्याला
हक्काचं पाणी मिळेल यासाठी राज्य शासनानं उच्च न्यायालयात नव्यानं शपथपत्र दाखल करावं असं आवाहन जलतज्ञ या. रा. जाधव यांनी केलं आहे.
औरंगाबाद इथं काल घेण्यात आलेल्या जायकवाडी पाणी परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेत जाधव यांनी लिहीलेल्या ‘जायकवाडीचे पाणी: न्यायालयीन निकाल आणि पुढे’
या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर ज्येष्ठ विचारवंतांनी
यावेळी आपले विचार व्यक्त केले. परिषदेला विधानसभा
अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर भुजंगराव कुलकर्णी,
कमलकीशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी
खानदेश आणि मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम करण्यासाठी पार आणि दमणगंगा
खोऱ्यातून गोदावरी नदीच्या खोऱ्यात पाणी आणण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं.
यामुळे नाशिकसह मराठवाड्यातला पाण्याचा वाद संपुष्टात येईल.
****
राज्य परीवहन महामंडळानं श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ
काल औरंगाबाद मधल्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतल्या कामगारांनी कार्यशाळेसमोर निदर्शनं
केली. यावेळी कामगारांनी महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातल्या दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती
कार्यशाळेतल्या कामगारांचे २०० श्रमिक तास कमी करण्याचे परीपत्रक महामंडळाच्यावतीनं
नुकतेच जारी करण्यात आले आहे. एका तज्ञ समितीनं या श्रमिकांचे तास कमी करण्याची शिफारस
केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरातले सर्व लिलाव
यापुढे ऑनलाइन पद्धतीनं केले जाणार आहेत. यासाठी तुळजापूर मंदिर संस्थानातल्या सर्व
कर्मचाऱ्यांना उस्मानाबादच्या राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण
देण्यात आलं. राज्य सरकारनं एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या
लिलावासाठी ई- लिलाव प्रणालीचा वापर एक जानेवारी २०१५ पासून बंधनकारक केला आहे.
****
No comments:
Post a Comment