Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
कायद्याचं
उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या रक्षणकर्त्यांना संरक्षण न देण्याचे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. गोरक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची
मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना
गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसक घटनांबद्दल उत्तर देण्यासही सांगितलं आहे. न्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत केंद्रानं, कायदा
आणि सुव्यवस्था संबंधित राज्यांचा प्रश्न असून, केंद्र सरकार कोणत्याही प्रकारच्या
बेकादेशीर कृत्यांना समर्थन देत नसल्याचं तसंच आपण हिंसेच्या विरोधात असल्याचं सांगितलं.
****
जमावाद्वारे
होत असलेल्या हिंसेवर राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जे वक्तव्य केलं, त्यानंतर
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप आज राज्यसभेत विरोधी
पक्ष सदस्यांनी केला आहे. भाजपच्या युवा शाखेच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर
गोंधळ केला असल्याचं, समाजवादी पक्षाचे खसदार नरेश अग्रवाल यांनी सांगितलं. यासंदर्भात
कारवाई करण्याची सूचना उपसभापतींनी सरकारला केली आहे.
लोकसभेत
आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली. कॉंग्रेस
सदस्यांनी कृषीविषयक मुद्यांवर चर्चेची मागणी लाऊन धरली. या गोंधळातच लोकसभेचं कामकाज
पार पडलं.
****
मुंबई
लातूर एक्सप्रेसचा बिदरपर्यंत विस्तार रद्द करण्याची मागणी लातूरचे खासदार डॉ. सुनिल
गायकवाड यांनी केली आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. तसंच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात
घेता उदगीर मुंबई या मार्गावर दोन नवीन गाड्या सुरु करण्याची मागणीही त्यांनी यावेळी
केली.
****
राम
मंदिर - बाबरी मशिद जमीन विवाद प्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
देणाऱ्या याचिकांची सुनावणी अग्रक्रमाने घेण्यावर विचार करु, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी हे प्रकरण सुनावणीसाठी आगोदर घेण्याचं
मत व्यक्त केलं होतं. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी मुख्य याचिका
गेली सात वर्ष प्रलंबित आहे. लखनऊ खंडपीठानं दोन पूर्णांक ७७ एकर विविवादीत जागेचे
तीन भाग करावे, असं म्हटलं होतं.
****
मुंबई
-नागपूर समृध्दी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली
इथं तीन ते पाच नोव्हेंबर २०१७ दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७चं आयोजन करण्यात आलं
आहे. या जागतिक स्तरावरच्या प्रदर्शनामध्ये राज्यांनी सहभागी व्हावं, यासाठी या क्षेत्रातल्या
गुंतवणूकदारांना माहिती देण्याकरता मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत
होते. समृध्दी महामार्गामुळे २४ जिल्हे एकमेकांशी जोडली जाणार असून, कृषी प्रक्रिया
उद्योगांची साखळीच या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला
बाजारपेठ मिळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगाचा हातभार लागणार असल्याचं ते म्हणाले.
****
औषधाची
ऑनलाईन विक्री करण्यास इच्छुक उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना केंद्र सरकारच्या
ई पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली
आहे. केंद्र सरकार लवकरच हे पोर्टल सुरु करणार असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं.
औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर सरकारचं काय नियंत्रण आहे, अशी विचारणा न्यायालयानं केल्यावर
सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. याप्रकरणी पुढची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
****
राज्यात
आज काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली, तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. साताऱ्यात
पावसाची उघडीप असून, तब्बल आठ दिवसांनी सूर्यदर्शन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले
चार दिवस कोसळत असलेला पाऊस अज थांबल्यानं काही भागातली पूर परिस्थिती पूर्वपदावर येत
आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीवरच्या राजाराम बंधार्यानं धोक्याची पातळी
ओलांडली आहे.
मराठवाड्यात
औरंगाबाद शहर आणि परिसरात आज दुपारच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
****
बीड
जिल्ह्यातल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य आणि पुरवठा होणं गरजेचं असल्याचं
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा दक्षता समितीच्या आढावा बैठकीत त्या
आज बोलत होत्या. पात्र लाभार्थी धान्य पुरवठ्यापासून वंचित राहत असेल तर अशा दुकानदारांची
तत्काळ तपासणी करुन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
****
शेतकरी
संघटनांच्या सुकाणू समितीनं आज सोलापूरमध्ये किसान क्रांती मोर्चाचं आयोजन केलं होतं.
शहरातल्या चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरु झालेल्या या मोर्चात जिल्ह्यातले शेतकरी
सहभागी झाले होते. संपूर्ण कर्जमाफीची मागणी यावेळी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment