Monday, 31 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचं काल रात्री पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. जयपूर इथं बाबा बहराम खां डागर यांच्या निवासस्थानाजवळ दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. स्वामी हरिदासजी यांच्यापासूनची परंपरा असलेल्या डागर घराण्याच्या विसाव्या पिढीतले ते गायक होते. त्यांच्या संगीत साधनेबद्दल पंडित जानोरीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

****

प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नसल्याचं प्राप्तीकर विभागाच्या सत्रांनी म्हटलं आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनं विभागाकडे दाखल झाली आहेत. ई फायलिंग करताना विभागाच्या संकेतस्थळाबाबत किरकोळ अडचणी निर्माण झाल्याच्या काही तक्रारी होत्या, मात्र त्या तातडीनं सोडवण्यात आल्याचं विभागानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या धार्मिक स्थळं निष्काषित करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचं खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. ते औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. धार्मिक स्थळावर होणारी कारवाई ही चुकीच्या पद्धतीनं, कुठलीही पूर्वकल्पना न देता आणि चुकीचे निकष लावून होत असल्याचं ते म्हणाले. या निर्णयास आव्हान देऊन पुनर्विलोकन याचिका आणि हस्तक्षेप याचिका आज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठात दाखल करणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा भागात महानगरपालिकेची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा भागातल्या चौधरी कॉलनीत महापालिकेची परवानगी न घेता मुख्य जलवाहिनी फोडून नळजोडणी घेण्यात आली असल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात आलं, या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडनजीक पाझर तलावात बुडून दोन मुलांचा काल मृत्यु झाला. कन्नड जवळच्या हिवरखेडा गौताळा इथल्या पाझर तलावात ही मुलं पोहण्यासाठी गेली होती.

****


No comments: