Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पाकिस्तानच्या
सर्वोच्च न्यायालयानं पनामा पेपर प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी
पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या पाच न्यायाधीशाच्या पीठानं पनामा
पेपर प्रकरणी शरीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे, तसंच त्यांच्या आणि कुटुंबीयांविरुद्धची
प्रकरणं संबंधित न्यायालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान शरीफ हे संसद
आणि न्यायालयाप्रती प्रामाणिक नसल्याचं, तसंच पदावर राहण्यास पात्र नाहीत, त्यांच्याविरूद्ध
भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात गुन्हा दाखल करुन तो सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेशही
न्यायालयानं दिले आहेत. शरीफ यांना यापुढे निवडणूक लढवण्यास कायमची बंदी देखील न्यायालयानं
घातली आहे. पंतप्रधानपदावर असताना शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती
गोळा केल्याचं गेल्यावर्षी पनामा पेपर मधून उघडकीस आलं होतं.
****
बिहारचे
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्य विधानसभेत १३१ विरूद्ध १०८ मतांनी विश्वासदर्शक
ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष
युतीला १२२ मतांची गरज होती. राष्ट्रीय जनता दलासोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडून नितीशकुमार
यांनी भारतीय जनता पार्टीसोबत नव्यानं युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केलं आहे.
या सरकारला दोन दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते.
****
३०
पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातल्या १३ हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा
निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. शिक्षण हक्क
कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे, तसंच
राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतराच्या आत शाळा देणं बंधनकारक असल्याचं ते म्हणाले.
मात्र सरकारच्या नव्या आदेशामुळे विद्यार्थ्यांना १५-१५ किलोमीटर दूर जावं लागणार आहे,
यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.
****
मुंबईतल्या
भायखळा इथल्या ऑर्थर रोड कारागृहातली कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी खोटा अहवाल
देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ.
रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. प्राथमिक अहवालानुसार याप्रकरणी महिला तुरुंगाधिकारी,
अधीक्षक तसंच पाच महिला शिपाई यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले.
याप्रकरणी राज्य महिला आयोगामार्फत सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निवृत्त
पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकत्याचा समावेश असलेली चौकशी समिती गठित करण्यात आली
असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच राज्यातल्या ६४२ जामीन मिळालेल्या कैद्यांना सुटकेसाठी
शासनस्तरावर निधी आणि अर्थ सहाय्य करण्यात येईल, असंही ते म्हणाले.
****
नाशिक
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसानं जोर धरला असून गंगापूरसह काही धरणांमधून
नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी तीन हजार २१४ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीला पूर आला
आहे. या पूरामध्ये नाशिक शहरातल्या रामकुंडजवळ उत्तर प्रदेशातल्या पर्यटकांची उभी असलेली
रिकामी खासगी बस वाहून गेली.
दरम्यान,
पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची
सूचना प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली आहे.
नांदूर
मध्यमेश्वर धरणातून २४ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं, दारणा धरणातून सहा हजार ६१०,
पालखेड धरणातून तीन हजार ४००, कडवा धरणातून दोन हजार ६५८ आणि आळंदी धरणातून दोन हजार
७१६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.
****
अभिनेते
इंदर कुमार यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ४४ वर्षांचे
होते. इंदर यांनी मासूम, कुंवारा, बागी, गजगामिनी, कहीं प्यार ना हो जाये, मा तुझे
सलाम, तुम को ना भूल पायेंगे, पेइंग गेस्ट आणि वॉन्टेड यासह अनेक हिंदी चित्रपटातून
विविध भूमिका साकारल्या आहेत.
****
पदमश्री
विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज
अहमदनगर इथं करण्यात आली. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार
साहित्यिक डॉ गणेश देवी यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार ‘उजव्या सोंडीच्या
बाहुल्या’ या कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना, कला गौरव पुरस्कार अशोक हांडे यांना,
समाज प्रबोधन पुरस्कार सत्यपाल महाराज यांना, तर नाट्य सेवा पुरस्कार अतुल पेठे यांना
जाहीर झाला आहे. येत्या सात ऑगस्टला प्रवरानगर इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष डॉ अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
No comments:
Post a Comment