Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा
आज औरंगाबाद इथं केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर
यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन पवार यांचा
गौरव करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब
दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल
तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर
मान्यवर उपस्थित होते. देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या शारदाबाई पवार
मुलींच्या वसतीगृहाचा कोनशिला समारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं
३०४ धावांनी जिंकला. भारतानं पहिल्या डावातल्या ६०० आणि दुसऱ्या डावातल्या २४० धावांच्या
बळावर श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी ५५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा
संघ २४५ धावात सर्वबाद झाला. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन,
तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात १९० धावा करणारा
शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत
एक शून्यनं आघाडी मिळवली आहे. या मालिकेतला दुसरा सामना तीन ऑगस्टपासून कोलंबो इथं
सुरु होणार आहे.
****
उत्तर
प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या दोन आणि बहुजन समाज पक्षाच्या एक विधान परिषद सदस्याने
सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. हे तीन आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याची शक्यता
असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. समाजवादी पक्षाचे बुक्कल नवाब आणि यशवंत सिंग आणि
बसपाचे जय वीर सिंग अशी या राजीनामा दिलेल्या आमदारांची नावं आहेत. दरम्यान, भाजपचे
अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत लखनऊमध्ये हे सदस्य भाजपमध्ये प्रवेश करण्याची
शक्यता आहे.
****
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करत असून, या मंत्र्यांचा पटण्यामध्ये राजभवनात शपथविधी सध्या सुरु आहे. या नव्या मंत्रीमंडळात ३५ आमदार शपथ घेत आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
येत्या
हंगामात येणारं सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी होणार नसल्याची माहिती कृषीमूल्य
आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत
होते. सोयाबीनचे भाव स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आतापासूनच प्रयत्न
सुरु असल्याचं ते म्हणाले. सोयाबिनला चांगला भाव देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयातीवर
आयात शुल्क वाढवून, आयात शुल्क आणि ग्राहकांना मिळणारा दर याचा सुवर्णमध्य साधण्याचा
प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या जोडवाडी इथले शेतकरी मंचक इंगळे यांचा आज सकाळी
उजनी पाटीजवळ अपघाती मृत्यू झाला, ते पीकविमा भरण्यासाठी घाटनांदूरकडे निघाले होते.
दरम्यान,
संथ वेबसाईटमुळे पीकविमा भरताना खूप अडचणी येत आहेत, सर्व कामं सोडून दिवसरात्र संगणक
केंद्राच्या बाहेर थांबावं लागत असल्यानं, शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरु असून मंचक इंगळे
यांच्या मृत्यूस प्रशासनाची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला
आहे.
****
पीक
विमा भरताना शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हा
दाखल करण्याचा इशारा बीड जिल्हा प्रशासनानं दिला आहे. शेतकऱ्यांचे पीक अर्ज दाखल करताना
आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून वीमा रकमेव्यतिरिक्त आणखी रक्कम मागितली जात असल्याच्या
पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा इशारा दिला आहे. या अर्जासाठी प्रती अर्ज २४ रुपये हे
अनुदान शासनामार्फत देण्यात येत आहे.
****
जायकवाडी
धरणातला पाणीसाठा ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात
सुमारे २० दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली असून, धरणातला जिवंत पाणी साठा ९१२ दशलक्ष घनमीटर
वर पोहोचला आहे. हे प्रमाण धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ४२ पूर्णांक चार टक्के आहे.
धरणात सध्या ४४ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment